ETV Bharat / bharat

कुटुंबाला इम्प्रेस करुन लग्न करण्यासाठी घडवला प्रेयसीचा अपघात; प्रियकरावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकरानं तिचा अपघात घडवला. एखाद्या हिरोप्रमाणं तिला वाचवायचं आणि तिच्या कुटुंबीयांना इम्प्रेस करायचं असा त्याचा डाव होता. मात्र तो डाव उलटा पडला.

YOUTH PLANS GIRL FAKE ACCIDENT
प्रतिकात्मक छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 7, 2026 at 8:13 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

तिरुअनंतपूरम : कुटुंबीयांचा विश्वास संपादन करुन प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकरानं प्रेयसीचा अपघात घडवून आणला, या अपघातातून तिला वाचावण्याचा बहाणा केला. मात्र हे कुटील कांड प्रियकरानं रचल्याचं बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्यामुळे प्रेयसीशी लग्न करण्याचे मनात मांडे खाणाऱ्या प्रियकराच्या हातात प्रेयसीचा हात पडण्याऐवजी बेड्या पडल्या. रणजित राजन असं पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या प्रियकराचं नाव आहे. तर एजाज असं त्याला अपघातात मदत करणाऱ्या त्याच्या मित्राचं नाव आहे. एजाजनं प्रेयसीला धडक दिल्यानंतर रणजितनं एखाद्या चित्रपटातील नायकाप्रमाणं येऊन तिला वाचवण्याचा हा सीन पार पडणार होता. मात्र प्रेयसीनं संशय व्यक्त केल्यानं प्रियकराचा सगळाच डाव फसला.

YOUTH PLANS GIRL FAKE ACCIDENT
आरोपी प्रियकर आणि त्याचा मित्र (ETV Bharat)

प्रेयसीचा अपघात करण्याचा रचला बनाव : रणजित राजन आणि एजाज हे दोघं केरळमधील पतनमथिट्टा जिल्ह्यातील थाझाथ परंबिल इथले रहिवासी आहेत. यातील रणजितनं आपल्या प्रेयसीला एका रस्ते अपघातातून नायकाप्रमाणं वाचवल्याचं भासवण्यासाठी अपघाताचा कट रचला. या योजनेमागील उद्देश तिच्या प्रेयसीच्या कुटुंबाची सहानुभूती मिळवणं हा होता. तिचं कुटुंब प्रेयसीचं लग्न त्याच्याशी लावतील, असं त्याला वाटलं. मात्र त्याच्या प्रेयसीला या कटाबद्दल कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.

कारनं पाठलाग करुन घडवला अपघात : ही घटना 23 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी घडली. रणजितची प्रेयसी अडूर इथल्या कोचिंग सेंटरमधून स्कूटीवरून परत येत होती. एजाज एका कारमधून तिचा पाठलाग करत होता, तर रणजित दुसऱ्या वाहनातून त्याच्या मागं येत होता. जेव्हा स्कूटी वाझामुट्टम ईस्ट इथं पोहोचली, तेव्हा एजाजच्या कारनं मागून तिला धडक दिली. धडक बसताच रणजितची प्रेयसी खाली पडली. तिचा हात मोडून तिला गंभीर दुखापत झाली.

धडक देऊन एजाजनं काढला पळ : धडक दिल्यानंतर एजाज घटनास्थळी न थांबता पळून गेला. काही क्षणातच रणजित तिथं पोहोचला. आपण इकडून जात असताना अपघात पाहून घटनास्थळावर आलो, असं दाखवण्याचा त्यानं बहाणा केला. त्यानं जखमी मुलीला मदत करुन तिला रुग्णालयात दाखल केलं. घटनास्थळी जमलेल्या स्थानिकांना त्यानं तो तिचा पती आहे, असं सांगितलं. त्याच्या प्रेयसीच्या उजव्या कोपराला फ्रॅक्चर झालं, तर हाताची करंगळी मोडली. शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या.

जबाब देताना प्रेयसीनं व्यक्त केला संशय : रुग्णालयात जबाब देताना प्रेयसीनं अपघाताच्या परिस्थितीबद्दल शंका व्यक्त केली. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रस्ते अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी रणजितची घटनास्थळी तातडीनं हजेरी लक्षात घेतल्यावर संशय निर्माण झाला. नंतर सीसीटीव्ही फुटेजमधून स्कूटरला धडक देऊन पळून गेलेल्या कार कोणाची आहे, त्याचा तपास लागला. कॉल रेकॉर्डच्या तपासणीत रणजित आणि एजाज यांच्यात वारंवार संवाद झाल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांना त्यांचा संबंध असल्याचं सिद्ध करण्यास मदत झाली.

प्रेयसीच्या हत्येच्या प्रयत्नाचा दाखल झाला गुन्हा : चौकशीत मुलीच्या कुटुंबासमोर रणजितची नायकाची प्रतिमा निर्माण करण्यासाठी आणि लग्नासाठी त्यांची संमती मिळवण्यासाठी हा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणण्याची योजना आखण्यात आली होती, हे पोलिसांना समजलं. या निष्कर्षांच्या आधारे, पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पतनमथिट्टा पोलीस उपनिरीक्षक अॅलेक्स कुट्टी एस म्हणाले की, "पीडितेनं संशय व्यक्त केल्यानंतर हा कट उघडकीस आला आरोपींनी तरुणीच्या कुटुंबाची सहानुभूती आणि विश्वास मिळवण्यासाठी या घटनेची योजना आखली होती. सखोल तपासादरम्यान हे समोर आलं."

हेही वाचा :

  1. वडिलांनी जमीन विकून जमवलं लग्न: मुलगी भर मंडपातून प्रियकराबरोबर पळाली
  2. अधुरी एक कहाणी : प्रेमाला विरोध असल्यानं भाऊ आणि वडिलांनी केली प्रियकराची हत्या, प्रेयसीनं मृतदेहाशी केलं लग्न
  3. नवरा, मुलाला सोडून 'लिव्ह इन'मध्ये राहिली, लग्न ठरताच प्रियकरानं प्रेयसीचा काढला काटा, लग्नमंडपातून आरोपी अटकेत