ETV Bharat / bharat

परदेशात अडकलेल्या प्रवाशांना दिलासा, भारत सरकारची आज 58 उड्डाणांची घोषणा

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. भारत सरकारनं आज 4 मार्च रोजी 58 उड्डाणं चालवण्याची योजना आखली आहे.

West Asia Conflict
भारत सरकारची आज 58 उड्डाणांची घोषणा (Photo- IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 4, 2026 at 9:11 AM IST

|

Updated : March 4, 2026 at 9:18 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी आपल्या उड्डाण वेळापत्रकात संतुलित आणि टप्प्याटप्प्यानं बदल केले असून आज बुधवारी (4 मार्च) 58 उड्डाणं चालवण्याची योजना आखल्याची माहिती केंद्र सरकारने मंगळवारी दिली.

मंत्रालयानं काय सांगितलं? : नागरी उड्डयन मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, 'भारतीय विमान कंपन्या 4 मार्च रोजी एकूण 58 उड्डाणांचे नियोजन करत आहेत. त्यामध्ये 30 उड्डाणं इंडिगोकडून, तर 23 उड्डाणं एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस कडून चालवली जाणार आहेत. भारत आणि खाडी प्रदेशादरम्यान उड्डाणं करणाऱ्या परदेशी विमान कंपन्याही हवाई क्षेत्र आणि संचालनाच्या परिस्थितीनुसार मर्यादित सेवा देत आहेत.'

निवेदनात पुढे म्हटलं आहे की, अडकलेल्या प्रवाशांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. गरजेनुसार विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्था करत असून परदेशी विमान वाहतूक प्राधिकरणे आणि परदेशातील भारतीय दूतावासांशी समन्वय साधून प्रवाशांची सुरक्षित आणि सुव्यवस्थित वाहतूक सुनिश्चित केली जात आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, मंगळवारी (3 मार्च) 24 उड्डाणे चालवली गेली. याशिवाय मागील 24 तासांत खाडी देशांतून एमिरेट्स आणि एतिहाद एअरवेज यांनी 9 उड्डाणे चालवली आहेत. सरकारनं स्पष्ट केलं की, ती सतत विमान कंपन्यांच्या संपर्कात असून तिकिटांच्या दरांवरही लक्ष ठेवून आहे, जेणेकरून संकटाच्या काळात भाड्यात अनावश्यक वाढ होऊ नये. भारतीय विमान कंपन्यांनी लांब पल्ल्याच्या आणि अति लांब पल्ल्याच्या उड्डाणांना पर्यायी मार्गांद्वारे टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

4 मार्चची योजना काय? : सध्या बंद किंवा निर्बंधित हवाई क्षेत्र टाळून ही उड्डाणं चालवली जाणार आहेत. आज 4 मार्च रोजी एकूण 58 उड्डाणांची योजना असून त्यापैकी 30 उड्डाणं इंडिगो कडून, तर 23 उड्डाणं एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस कडून चालवली जाणार आहेत. भारत आणि खाडी प्रदेशादरम्यान परदेशी विमान कंपन्याही मर्यादित उड्डाणं चालवत आहेत. पश्चिम आशियात अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात वाढत्या तणावामुळे अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केलं असून त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर झाला आहे.

डीजीसीएची माहिती : नागरी विमान महानिर्देशालय (DGCA) यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांची 1,221 उड्डाणं आणि परदेशी विमान कंपन्यांची 388 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. केवळ मंगळवारीच भारतीय विमान कंपन्यांनी 104 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली. 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत तीन दिवसांत एकूण 1,117 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाली आहेत. सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांना वेळेवर आणि स्पष्ट माहिती द्यावी तसेच परतावा, पुनर्नियोजन आणि इतर मदतीसंदर्भातील नियमांचे पालन करावं, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

एअर इंडियाची भूमिका : दरम्यान, याबाबत एअर इंडियानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर माहिती देताना सांगितलं की, पश्चिम आशियातील परिस्थिती लक्षात घेऊन संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, इस्त्रायल आणि कतारसाठीची बहुतांश उड्डाणे 4 मार्च 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. कंपनीनं सांगितलं की, ते परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींनुसार निर्णय घेतला जाईल.

सरकारनं आश्वासन दिलं आहे की, विमान कंपन्या, विमानतळ प्राधिकरणं, नियामक संस्था आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या समन्वयाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सेवा हळूहळू पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Last Updated : March 4, 2026 at 9:18 AM IST