ETV Bharat / bharat

दिल्लीत विश्व हिंदू परिषदेची निदर्शने, बांगलादेशी हिंदू तरुणाच्या हत्येवरून गोंधळ, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या संख्येने दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. निदर्शकांना काही अंतरावर दूर ठेवण्यात आलंय.

Vishva Hindu Parishad protests in Delhi
दिल्लीत विश्व हिंदू परिषदेची निदर्शने (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 23, 2025 at 3:11 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली: बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या छळ अन् अत्याचाराविरोधात विश्व हिंदू परिषद (VHP) मंगळवारी देशव्यापी निदर्शने करीत आहे. विशेष म्हणजे देशभरातील जिल्हा मुख्यालयांवर ही निदर्शने होताहेत. विश्व हिंदू परिषदेनं दिल्लीतील चाणक्यपुरी येथील बांगलादेशच्या उच्चायुक्तालयालाही घेराव घातलाय. बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या संख्येने दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. निदर्शकांना काही अंतरावर दूर ठेवण्यात आलंय.

बॅरिकेड्स आणि अतिरिक्त पोलीस, निमलष्करी दल तैनात : शेजारच्या बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या निदर्शनापूर्वी मंगळवारी येथील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती. बॅरिकेड्स आणि अतिरिक्त पोलीस, निमलष्करी दल तैनात करण्यात आलेत.

उच्चायुक्तालयाच्या इमारतीत निषेध करण्याची घोषणा : एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "निषेधाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सुरक्षा वाढवलीय. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून बॅरिकेड्स उभारण्यात आलेत आणि अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय." बांगलादेशातील हिंदूंवरील कथित अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने उच्चायुक्तालयाच्या इमारतीत निषेध करण्याची घोषणा केलीय. अनेक निदर्शक बॅनर आणि पोस्टर्स घेऊन दूतावासात घोषणाबाजी करताना दिसले.

दिपू चंद्र दास यांची जमावाकडून क्रूर पद्धतीनं हत्या : अखिल भारतीय हिंदी बंगाली संघटना, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचार आणि दिपू चंद्र दास यांची जमावाने केलेल्या क्रूर हत्याकांडाच्या विरोधात दुर्गाबाई देशमुख साऊथ कॅम्पस मेट्रो स्टेशनजवळ निदर्शने केली. गेल्या आठवड्यात बांगलादेशातील भालुका येथील कपड्याच्या कारखान्यातील कामगार दिपू चंद्र दास यांना जमावाने मारहाण केली आणि नंतर रस्त्यावर लटकवून जिवंत जाळले. या घटनेच्या व्हिडीओमुळे बांगलादेशच्या अंतरिम सरकार आणि त्यांचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्याविरुद्ध जगभरात संताप व्यक्त झालाय. युनूसच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत.