TMC खासदार अभिषेक बॅनर्जींना एक्स दर्जाची सुरक्षा, शुभेंदू सरकारनं घेतला रातोरात निर्णय
राज्य सरकारनं त्यांना 'एक्स' दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत नेहमी तीन सुरक्षा कर्मचारी असतील.

Published : May 31, 2026 at 6:54 PM IST
|Updated : May 31, 2026 at 7:00 PM IST
कोलकाता: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे शनिवारी (दि.30) सोनारपूर दौऱ्यावर असताना त्यांच्यावर कथित हल्ला झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर काही तासांतच त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्य सरकारनं त्यांना 'एक्स' दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत नेहमी तीन सुरक्षा कर्मचारी असतील.
सरकार बदलल्यावर 'झेड-प्लस' सुरक्षा हटवली होती : तृणमूल काँग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जाणारे अभिषेक बॅनर्जी हे पक्षाचे प्रमुख रणनीतिकार आहेत. मागील राज्य सरकारच्या काळात त्यांना 'झेड-प्लस' सुरक्षा पुरवण्यात आली होती. दरम्यान, 2026 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलल्यावर या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी खासदार आणि इतर संरक्षित व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या आढाव्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांची 'झेड-प्लस' सुरक्षा काढून घेण्यात आली होती. यासोबत त्यांच्या हरीश मुखर्जी रोडवरील निवासस्थानाबाहेर तैनात असलेले पोलीस दलही हटवण्यात आलं होतं. त्यावेळी सरकारनं सांगितलं होतं की, निवडून आलेल्या खासदार असल्यानं अभिषेक बॅनर्जी यांना त्यांच्या पदाला अनुसरून सुरक्षा मिळत राहील. त्यानंतर, त्यांना दोन सुरक्षा कर्मचारी पुरवण्यात आले.
आतापर्यंत सहा जणांना अटक : शनिवारी अभिषेक बॅनर्जी यांनी सोनारपूरला भेट दिली. त्यावेळी तीच सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी कथित हल्ला झाल्याप्रकरणी तपास सुरू केला आहे. प्राथमिक अहवालानुसार, या घटनेप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सोनारपूर पोलिसांनी रात्रभर परिसरात शोधमोहीम राबवली आणि या घटनेत सहभागी असलेल्यांना ओळखण्यासाठी व्हिडिओ फुटेजची तपासणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, तपास अधिकाऱ्यांनी व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपींना ओळखले आणि त्यानंतर सहा जणांना अटक केली. या घटनेत सहभागी असलेल्या इतर आरोपींचा देखील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळं एक नवीन राजकीय वाद निर्माण झाला असून, राज्यातील वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरील चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
माजी आमदार असित मजुमदार यांच्यासह तृणमूलच्या 10 नेत्यांना अटक
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले. पोलिसांनी आता चिन्सुरा इथं माजी आमदार असित मजुमदार यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अटक केली आहे. रविवारी सकाळी चंदननगर पोलीस आयुक्तालयाने असित मजुमदार, चिन्सुरा नगरपालिकेचे अध्यक्ष सौमित्र घोष, उपाध्यक्ष पार्थ साहा आणि नगरसेवक रंजन राहा, निर्मल चक्रवर्ती व समीर सरकार यांच्यासह एकूण 10 तृणमूल नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. चंदननगर पोलीस आयुक्तालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रशासकीय कामात अडथळा येऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा :

