डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी ट्रम्प पतीसोबत जैसलमेरमध्ये दाखल, पर्यटन स्थळांना देणार भेट!
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विमानतळावर या व्हीव्हीआयपी पाहुण्यांचं स्वागत केलं.

Published : May 31, 2026 at 4:53 PM IST
जैसलमेर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी ट्रम्प रविवारी (दि.31) पती मायकल बोलस यांच्यासोबत विशेष विमानानं जैसलमेरमध्ये दाखल झाल्या आहेत. विमानतळावर त्यांचं जिल्हा प्रशासनानं पारंपरिक राजस्थानी पद्धतीनं स्वागत केलं. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विमानतळावर या व्हीव्हीआयपी पाहुण्यांचं स्वागत केलं. तसंच लोककलाकारांनी राजस्थानी संस्कृतीची झलक सादर केली आणि पाहुण्यांचं स्वागत पगडी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलं. विमानतळापासून हॉटेलपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
पर्यटन स्थळांना देणार भेट : टिफनी ट्रम्प आणि मायकल बोलस विमानतळावरून थेट सॅम रोडवरील प्रसिद्ध हॉटेल सूर्यगढकडे रवाना झाले, जिथं ते रात्रभर मुक्काम करणार आहेत. त्यांच्या आगमनासाठी हॉटेलच्या परिसरात विशेष तयारी करण्यात आली आहे. हॉटेल पारंपरिक सजावटीनं सजवण्यात आलं असून, सुरक्षा यंत्रणा सतत देखरेख ठेवून आहे. या दौऱ्यात टिफनी ट्रम्प आणि मायकल बोलस हे जैसलमेरमधील जगप्रसिद्ध सोनार किल्ला आणि पटवों हवेली यांसारख्या प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देतील. ते वाळवंटी संस्कृती आणि स्थानिक लोकपरंपरांचाही आनंद घेतील. दरम्यान, टिफनी ट्रम्प यांच्या जैसलमेरमधील आगमनामुळं पर्यटन उद्योगाशी संबंधित लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर हाय अलर्ट : जैसलमेर हा भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेला एक संवेदनशील सीमावर्ती जिल्हा आहे. त्यामुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलीच्या दौऱ्यादरम्यान कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. टिफनी ट्रम्प आणि मायकल बोलस यांना शासकीय अतिथीचा दर्जा देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पोलीस यांच्यात निकटचा समन्वय आहे. पर्यटन स्थळांपासून ते त्यांच्या हॉटेलपर्यंतच्या मार्गावर वाहतूक नियमन आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
ताजमहालला दिली भेट : जैसलमेरला पोहोचण्यापूर्वी टिफनी ट्रम्प आणि मायकल बोलस यांनी आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात नवी दिल्लीतून केली. शुक्रवारी त्यांनी दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट दिली आणि 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मंदिराच्या भव्यतेचे फोटो शेअर केले. त्यानंतर शनिवारी हे जोडपं आग्रा इथं पोहोचलं होतं. त्यांनी आग्र्यातील ताजमहालला भेट दिली आणि याठिकाणी फोटोशूट देखील केलं.
#WATCH | Jaisalmer, Rajasthan: Tiffany Trump, the younger daughter of U.S. President Donald Trump, arrived in Jaisalmer, aboard a private aircraft, along with her husband, Michael Boulos. Upon arrival at Jaisalmer's civil airport, they were welcomed with Rajasthani culture and… pic.twitter.com/jux2x3veg8
— ANI (@ANI) May 31, 2026
ट्रम्प कुटुंबाचे जैसलमेरशी जुनं नातं : ट्रम्प कुटुंबातील सदस्यानं या वाळवंटी प्रदेशाला भेट देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, नोव्हेंबर 2018 मध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मुलगी इव्हांका ट्रम्प यांचे पती आणि तत्कालीन वरिष्ठ व्हाईट हाऊस सल्लागार जेरेड कुशनर यांनी जैसलमेरला भेट दिली होती. तसंच त्यांनी सूर्यगढ हॉटेलमध्ये एका हाय-प्रोफाईल लग्नसमारंभाला हजेरी लावली होती. त्यावेळी अमेरिका आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्तपणे अभेद्य सुरक्षा व्यवस्था पुरवली होती.
हेही वाचा :

