भाडेकरूनं घरमालकिणीच्या नावावर काढले 18 कोटी रुपयांचे कर्ज, सूत्रधाराला अटक
घरमालकिणीच्या कागदपत्रांचा गैरवापर करून जवळपास 18 कोटी रुपयांचे बँक कर्ज घेतल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं एकाला अटक केली आहे

Published : June 30, 2026 at 8:22 PM IST
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं एका फसवणुकीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. घरमालकिणीच्या कागदपत्रांचा गैरवापर करून जवळपास 18 कोटी रुपयांचे बँक कर्ज घेतल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं एकाला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजीव दीक्षित याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचा मेहुणा आणि प्रमुख साथीदार सचिन अद्याप फरार आहे. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.
दोन नवीन फ्लॅट्स भाड्याने देण्याचा निर्णय : जून 2012 मध्ये पूर्व दिल्लीतील विवेक विहार (ब्लॉक डी) इथं राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेनं आपले दोन नवीन फ्लॅट्स भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सचिन आणि संजय नावाच्या दोन व्यक्तींनी तिच्याकडे येऊन, तातडीचं काम असल्याचं सांगून ते फ्लॅट्स भाड्यानं घेतले. सचिननं स्वतःची ओळख 'जगदंबा मेटल्स' या धातू व्यापार कंपनीचा मालक म्हणून करून दिली. सचिननं दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट दरमहा 47,000 रुपयांना भाड्यानं घेतला. तर संजयनं तिसऱ्या मजल्यावरील लहान फ्लॅट दरमहा 17,000 रुपयांना भाड्यानं घेतला.
मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस : दरम्यान, पोलिसांच्या तपासात असे समोर आलं आहे की, सचिनचा तिथं राहण्याचा कधीच हेतू नव्हता. त्याला केवळ भाडेकराराच्या माध्यमातून ती मालमत्ता आणि घरमालकीण उषा राणी यांचा वैयक्तिक माहिती मिळवायची होती. दरम्यान, काही दिवसानंतर दोन्ही आरोपींनी कोणालाही न कळवता फ्लॅट रिकामा केला. एप्रिल 2013 मध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे दोन वकील घरमालकिणीच्या घरी आले, तेव्हा घरमालकिणीला या मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
18 कोटी रुपयांचे कर्ज : वकिलांनी तिला सांगितलं की, तिनं तिच्या फ्लॅट्सवर पंजाब अँड सिंध बँकेकडून 70 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, परंतु त्याचे हप्ते भरण्यात आले नाहीत. त्यानंतर घरमालकिणीनं पोलिसांशी संपर्क साधला, तेव्हा तपासात एक धक्कादायक सत्य समोर आले. आरोपींनी तिचं नाव आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून विविध कंपन्यांच्या नावावर एकूण 18 कोटी रुपयांचे लोन, गहाण आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळवल्या होत्या. ही रक्कम 11 बनावट कंपन्यांमार्फत वळवण्यात आली आणि रोख स्वरूपात काढण्यात आली होती.
पॅन कार्डवर घरमालकिणीचे नाव, पण... : पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की, आरोपींनी ही फसवणूक करण्यासाठी अत्यंत धूर्त पद्धतीचा वापर केला. आरोपींनी घरमालकिणीच्याच नावाच्या ओडिशातील दुसऱ्या एका महिलेचे पॅन कार्ड मिळवलं, जिचा दिल्लीतील घरमालकिणीशी काहीही संबंध नव्हता. पॅन कार्डवरील नाव घरमालकीण उषा राणी यांचं होतं, परंतु फोटो आणि सही दुसऱ्याच कोणाची तरी होती. तसंच उपनिबंधकाच्या पडताळणी प्रणालीला चकमा देण्यासाठी, आरोपींनी उषा राणी असल्याचं भासवून दुसऱ्याच एका महिलेला पाठवलं. फेब्रुवारी महिन्यात, ही बनावट महिला कार्यालयात गेली आणि तिनं आरोपी सचिनच्या नावे विक्रीपत्र (मालकी हक्क) हस्तांतरित करणारी कागदपत्रे सादर केली.
सूत्रधाराला अटक : दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कागदपत्रांची बारकाईनं पुन्हा तपासणी केली. यावेळी तपासात असं उघड झाले की, सचिन, त्याचा मेहुणा संजीव दीक्षित याच्यासोबत या संपूर्ण योजनेमागे होता, जो अनेक टोपणनावं वापरत होता. संजीव दीक्षितवर 2011 मध्ये सीबीआयनं फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणांसह इतर 10 प्रकरणांमध्येही सामील होता. 2017 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्यानंतर, संजीवला न्यायालयात नेत असताना तो कोठडीतून पळून गेला होता. देशभरातील विविध शहरांमध्ये जवळपास एक दशक लपून राहिल्यानंतर सीबीआयनं त्याला जानेवारीमध्ये पुन्हा अटक करून तिहार तुरुंगात पाठवलं. 25 जून रोजी संजीव दीक्षितला या प्रकरणात अधिकृतपणे अटक करण्यात आली. पोलीस सध्या दुसरा आरोपी सचिनचा शोध घेत आहेत, तर तिसरी व्यक्ती संजयची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा :

