'सकाळी कुत्र्यांची मनस्थिती कशी असते, हे कोणालाही माहित नसते'- सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
प्राणी चावणार की नाही, कोणालाही प्राण्याच्या मनातलं कळू शकत नाही, अशी भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायलयानं टिप्पणी केली आहे.

Published : January 7, 2026 at 5:47 PM IST
नवी दिल्ली-सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत आज सुनावणी केली. लोकांना चावू नका, असा कोणीतरी कुत्र्यांना सल्ला द्यायला पाहिजे. कुत्र्याची चावण्याची मनस्थिती आहे की नाही, हे कोणीही जाणू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठानं भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत आज सुनावणी घेतली. यावेळी न्यायाधीश नाथ म्हणाले, जेव्हा एखादी व्यक्ती दुचाकी किंवा सायकलवर असतो, तेव्हा कुत्रे एखाद्याला चावू शकतात. अथवा त्याचा पाठलाग करू शकतात. त्यामुळे ती व्यक्ती पडू शकते अथवा अपघात होऊ शकतो.
न्यायाधीश नाथ यांनी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांना विचारले, दुचाकी आणि सायकलींसाठी भटके कुत्रे धोकादायक असतात. तुम्ही दुचाकी कधी चालविली आहे का? त्यावर सिब्बल यांनी करियरच्या सुरुवातीला चालविल्याचं सांगितलं. केवळ कुत्रे चावणे ही समस्या नाही. कुत्रे हे सायकलींच्या पाठीमागे लागतात. त्यावर सिब्बल यांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, प्रत्येक कुत्रा असे करत नाही. त्यासाठी ओळख पटविणं महत्त्वाचं आहे. त्यावर न्यायाधीश नाथ म्हणाले, सकाळी कोणता कुत्रा कोणत्या मनस्थिती आहे, हे तुम्ही कसे ओळखणार? सर्व कुत्र्यांना निवारागृहात पाठविणे हे समस्येवरील उत्तर आहे का, असे सिब्बल यांनी युक्तीवाद करताना विचारले. हे ठरविण्यासाठी गल्ली अथवा रस्ते कुत्र्यांपासून मुक्त होण्याची गरज आहे, असे खंडपीठानं म्हटलं आहे.
कुत्र्यांना गोळी मारावी, असे कुणीही म्हणत नाही- कुत्रे कंपाउंड आणि विद्यापीठात राहतात. विद्यापीठात असताना कुत्रे चावले नव्हते. जेएनयूमध्ये अनेक कुत्रे होते, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं. त्यावर न्यायाधीश मेहतांनी सांगितलं की सिब्बल यांच्याकडील माहिती जुनी आहे. एनएलएस बंगळुरूमध्ये अनेकदा कुत्र्यांनी हल्ले केल्याचे रिपोर्ट आहेत. कुत्रे चावण्याचे प्रमाण कमी होण्याची गरज आहे. रस्त्यावरून कमी प्रमाण होण्याकरिता कुत्र्यांना गोळी मारावी, असे कुणीही म्हणत नाही.
परिसर कुत्र्यांनी मुक्त कसे होणार?- भटक्या कुत्र्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वैज्ञानिक उपाय करावा, असे सिब्बल यांनी म्हटलं. त्यावर न्यायाधीश मेहता यांनी म्हटलं, केवळ कुत्र्यांचे समुपदेशन करणं बाकी राहिलं आहे. त्याचा अर्थ तसा नसावा, तुम्ही खेळीमेळीत म्हटलं असावं असे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं. विद्यापीठ आणि न्यायालयाच्या आवारात कुत्र्यांची काय गरज आहे? कुत्र्यांना त्याच परिसरात सोडल्यानंतर संस्थांचे परिसर कुत्र्यांनी मुक्त कसे होणार? त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडावे का? असा प्रश्न खंडपीठानं उपस्थित केला. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरुच राहणार आहे.
- 8 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयानं विविध संस्थांच्या परिसरातील कुत्र्यांना निवारागृहात सोडण्याचे निर्देश दिले होते. दिल्लीमध्ये कुत्रे चावल्यामुळे मुलांमधील रेबीजचे प्रमाण वाढल्याच्या वृत्ताची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं स्वयंदखल घेतली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येत आहे.
हेही वाचा-

