दिल्लीचं जेएनयू पुन्हा वादात, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी
दिल्लीचं जेएनयू पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोमवारी रात्री विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह घोषणाबाजी झाल्याचं समोर आलं आहे.

Published : January 6, 2026 at 1:27 PM IST
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) पुन्हा चर्चेत आलं आहे. सोमवारी रात्री विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात कथित निदर्शनं आणि आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि देशद्रोहाचा आरोप असलेला शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ ही निदर्शनं आणि घोषणाबाजी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांनी 'मोदी आणि शाह यांच्यासह अंबानी आणि अदानी यांच्या विरोधातही घोषणा दिल्या, अशीही माहिती मिळत आहे.
शरजील आणि खालिद यांच्याविरुद्ध खटला सुरू : जेएनयूमध्ये सोमवारी रात्रीच्या वेळी साबरमती वसतिगृहाबाहेर विद्यार्थ्याच्या एका गटानं वादग्रस्त घोषणाबाजी केल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध घोषणाबाजी केली. सर्वोच्च न्यायालयानं उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज फेटाळला, यामुळे ही निदर्शनं केल्याचं सांगितलं जात आहे. निदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह घोषणा दिल्या. तर उमर खालिद आणि शर्जील इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, अभियोजन पक्षाच्या पुराव्यांवरून असं दिसून येतं की, उमर खालिद आणि शरजील इमाम 2020 च्या दिल्ली दंगलींसाठी "कारस्थान रचण्यात आणि धोरणात्मक दिशा देण्यात" सहभागी होते. न्यायालयानं कट रचल्याप्रकरणी त्यांच्या जामीन याचिका देखील फेटाळल्या. वादग्रस्त विधान केल्यामुळं शरजील इमामवर देशद्रोहाचा आरोप आहे. तर उमर खालिद दिल्ली दंगलीतील त्याच्या भूमिकेसाठी खटल्याला सामोरं जात आहे. उमर खालिद आणि शर्जील इमाम दोघंही सध्या तुरुंगात आहेत.
जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा काय म्हणाल्या? : सोमवारी रात्री झालेल्या आंदोलनाच्या कथित व्हिडिओनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. यावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा अदिती मिश्रा यांनी पीटीआयला सांगितलं की, दरवर्षी विद्यार्थी 5 जानेवारी 2020 रोजी कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन करतात. या आंदोलनात दिलेल्या सर्व घोषणा वैचारिक होत्या आणि त्या कोणावरही वैयक्तिक हल्ला करणाऱ्या नव्हत्या. तसंच, त्या कोणालाही उद्देशून नव्हत्या." दरम्यान, या घोषणांसंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
दिल्ली पोलिसांनी काय म्हटलं? : जेएनयूमध्ये देण्यात आलेल्या घोषणांबद्दल, दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना या प्रकरणाची माहिती आहे, परंतु कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित माहिती मागितली आहे आणि तपास सुरू केला आहे. दरम्यान, जेएनयू युनिटचे एबीव्हीपी उपाध्यक्ष मनीष चौधरी म्हणाले, "शरजील इमाम आणि उमर खालिद यांना जामीन नाकारल्यानंतर पंतप्रधानांविरुद्ध लावण्यात आलेल्या घोषणा योग्य नाहीत."
हेही वाचा

