सिद्धरामय्यांचा राजीनामा; डी.के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार
राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Published : May 28, 2026 at 4:02 PM IST
|Updated : May 28, 2026 at 4:08 PM IST
बंगळुरू : कर्नाटकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारमधील नेतृत्वबदलाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी (दि.28) आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, राज्यपाल थावरचंद गेहलोत लोक भवनात उपस्थित नसल्यामुळं त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांच्या सचिवांकडे सादर केला.
डी.के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार : याबाबत कर्नाटकच्या राज्यपालांचे विशेष सचिव प्रभू शंकर यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "मला सिद्धरामय्या यांचा (मुख्यमंत्रीपदाचा) राजीनामा प्राप्त झाला आहे. परंतु राज्यपाल परतल्यानंतरच ते तो स्वीकारू शकतात." दरम्यान, राज्यपाल थावरचंद गेहलोत हे संध्याकाळपर्यंत बंगळूरला परततील. आता डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Bengaluru: " i have submitted my resignation to the governor's office. the governor is not here; he is returning tonight. so, i submitted the resignation to his office," says karnataka cm siddaramaiah pic.twitter.com/K48kn6Vjww
— ANI (@ANI) May 28, 2026
राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाजे सिद्धरामय्या? : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले की, "हायकमांडनं मला आधी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर, मी आज माझा राजीनामा सादर केला आहे. मला खात्री आहे की, राज्यपाल जेव्हा येतील तेव्हा ते तो स्वीकारतील, कारण ते संविधानानुसारच असायला हवे... आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळं, मुख्यमंत्र्यांना (सरकार स्थापन करण्याची) परवानगी देणं हे घटनात्मक आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो."
राजीनाम्यापूर्वी ब्रेकफास्ट बैठक : सिद्धरामय्या यांनी गुरुवारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना ब्रेकफास्ट बैठकीला पाचारण केलं. त्यानंतर बैठकीदरम्यान सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. तसंच सिद्धरामय्या यांनी दिल्लीत हायकमांडसोबत झालेल्या बैठकीबद्दल काही माहिती देखील मंत्र्यांना सांगितल्याचं म्हटलं जात आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सहकारी या ब्रेकफास्ट बैठकीला उपस्थित होते.
Karnataka CM and Deputy CM, Siddaramaiah and DK Shivakumar, respectively, share a hug at the CM residence in Bengaluru at the breakfast meeting. Deputy CM DK Shivakumar also touched the feet of CM Siddaramaiah.
— ANI (@ANI) May 28, 2026
(Pics: CMO Karnataka) pic.twitter.com/qIATmAwj8a
सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांची गळाभेट : तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे सिद्धरामय्या यांच्या 'कावेरी' या निवासस्थानी पोहोचले होते. ब्रेकफास्ट बैठकीदरम्यान सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांना नमस्कार केला. याआधी शिवकुमार यांच्या समर्थकांनी बंगळूरमधील त्यांच्या घरी भेट देऊन मिठाईचं वाटप केलं. दरम्यान, मंत्री एच. के. पाटील हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
हेही वाचा :
- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा निर्णय : ब्रेकफास्ट मिटींगमध्ये मंत्रिमंडळाला म्हणाले दुपारी तीन वाजता . . . .
- बकरी ईदनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदींसह देशातील नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
- सेव्हिंग द लास्ट प्लेग्राऊंड : 'ऑपरेशन विमुक्त'द्वारे उद्यानं पुन्हा सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांची मोहीम

