राम मंदिर देणगी अपहार प्रकरण : सर्व आठ आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणी आठ आरोपींना सोमवारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Published : June 29, 2026 at 5:28 PM IST
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील सर्व आठ आरोपींना सोमवारी (29 जून) न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गेल्या शुक्रवारी आरोपींना रिमांड मॅजिस्ट्रेट न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर आज न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Ayodhya Ram Temple donations alleged embezzlement case | A court in Ayodhya remands all accused to 14 day judicial custody
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 29, 2026
राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणात पोलीस देखील सातत्यानं कारवाई करत आहेत. काल पोलिसांनी अयोध्येतील सर्व आरोपींच्या घरांवर छापे टाकले आणि त्यांच्या कुटुंबीयांची संबंधित चौकशी केली. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अंदाजे 80 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 305 A, 306, 317 (2) 317(5) 316(5) 61(2) A, 3(5) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13(1)A, 13(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#WATCH | UP | Ram Mandir donations alleged embezzlement case | Accused Tinnu Yadav's son, Ravi Yadav, and Manish Yadav's brother, Shani Yadav, arrive at Ayodhya District Jail to meet their kin who are lodged here in connection with the case
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 29, 2026
(Visuals: District Jail) pic.twitter.com/0bV2w3KOYy
दरम्यान, मंदिरातील देणग्यांबाबत निर्माण झालेल्या वादामुळं 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'चे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस कारवाई तीव्र झाली आहे.
आठ आरोपी कोण आहेत? ते जाणून घ्या...
- रामशंकर यादव उर्फ टिन्नू : रामशंकर यादव हे अयोध्या धामच्या स्वर्ग द्वार परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर दानपेट्यांची देखरेख करणे आणि त्या तळघरात पोहोचवण्याची जबाबदारी होती. दानपेट्यांमधून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसंच त्यांनी अयोध्या आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मालमत्ता मिळवली आहे.
- अनुकल्प मिश्रा : कोतवाली नगर पोलीस स्टेशन हद्दीत कौशलपुरी कॉलनीमध्ये राहणाऱ्या अनुकल्प मिश्रा यांच्यावर हिशोब खोलीत पैसे मोजण्याची जबाबदारी होती. त्यांच्यावर देणगी चोरून ते पैसे बाथरूममध्ये लपवल्याचा आरोप आहे. तसंच त्यांनी लाखो रुपयांची संपत्ती जमवल्याचा आरोप आहे.
- लवकुश मिश्रा : रुदौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाकुराईन खागोशोली येथील लवकुश मिश्रा हे रहिवासी आहेत. ते रोकड मोजणी विभागात कार्यरत होते. देणग्या चोरून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या घरातून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
- सुभाष चंद्र श्रीवास्तव : सुभाष चंद्र श्रीवास्तव हे कोतवाली नगरमधील बँक कॉलनी, अंजनीपुरम येथील रहिवासी आहेत. ते बँकेतून सेवानिवृत्त असून कामगार संघटनेचे नेतेही होते. त्यांच्यावर राम मंदिरातील रोकड मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखरेख करण्याची जबाबदारी होती. त्यांच्यावर रोकड देखरेखीत निष्काळजीपणा केल्याचा आणि देणगीच्या पैशांच्या चोरीत सामील असल्याचा आरोप आहे.
- मनीष यादव : मनीष यादव हे स्वर्गद्वार इथं राहतात. मंदिरातील दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या देणग्या मोजण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्यावर मंदिरातील देणग्या चोरल्याचा आरोप असून, त्यांच्या घरातून 36 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
- करुणेश पांडे : खंडासा पोलीस ठाण्याचा परिसरातील जयराजपूरमधील रहिवासी असलेले करुणेश पाडे यांची जबाबदारी खोलीत देणग्या आणून त्यांची मोजणी करण्याची होती. त्यांच्यावर देणगीचे पैसे चोरल्याचा आरोप असून त्यांनी अयोध्येच्या आसपास मालमत्ता खरेदी केली आहे.
- अविनाश शुक्ला : कोतवाली नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौशलपुरी येथील रहिवासी असलेले अविनाश शुक्ला यांच्यावर देणगीची रक्कम खोलीत आणून मोजण्याची जबाबदारी होती. त्यांच्यावर अयोध्या परिसरात फसवणूक करून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे.
- रामशंकर मिश्रा : अयोध्या येथील कोतवालीतील नया घाटावरील प्राचीन सीताराम मंदिराजवळील रहिवासी असलेल्या रामशंकर मिश्रा यांच्यावर दानपेट्या मोजणी कक्षात आणणे आणि देखरेख ठेवणे ही जबाबदारी होती. त्यांनी आरोपींसोबत संगनमत करून देणगीचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
हेही वाचा :

