ETV Bharat / bharat

Goa Casino Firing : गोव्यात 'मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो'च्या संचालकांवर गोळीबार, खंडणीचा संशय?

गोव्यातील पर्वरी येथील मॅजेस्टिक प्राईड कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री अचानक गोळीबार केला.

Shooting In Goa Majestic Pride Casino Director
गोव्यात 'मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो'च्या संचालकावर गोळीबार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 29, 2026 at 6:45 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पणजी : गोव्यातील पर्वरी येथील कॅसिनो मॅजेस्टिक परिसरात दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. या घटनेनंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी तब्बल सहा राऊंड गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या घटनेच्या वेळी 'मॅजेस्टिक प्राईड हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड'चे संचालक श्रीनिवास नायक आणि त्यांचे सुरक्षा रक्षक घटनास्थळी होते. हे दोघंही या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, हा प्रकार धमकावून खंडणी वसूल करण्याचा असावा, अशी चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8.45 वाजता पर्वरी येथील आपल्या हॉटेलबाहेर नायक थांबले होते. या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी कॅसिनो परिसरात येऊन अचानक गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात असून, हल्लेखोर कोणत्या दिशेनं आले आणि गोळीबारानंतर कोणत्या मार्गानं पसार झाले, याचा शोध घेतला जात आहे.

हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. श्रीनिवास नायक हे गोव्यातील कॅसिनो व्यवसायातील परिचित नाव असून, ते 'मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो' समूहाचे संचालक आहेत. त्यामुळे या गोळीबाराच्या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. नायक हे गोव्यातील कॅसिनो व्यवसायाशी संबंधित जुने उद्योजक आहेत. या समूहाकडून गोव्यातील 'कॅसिनो प्राईड' या ऑफशोअर कॅसिनो जहाजाचं संचालनही केलं जातं.

दरम्यान, गोळीबाराचं नेमकं कारण व्यावसायिक वाद, वैयक्तिक वैमनस्य की अन्य काही आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या गोळीबारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. "मी सुरक्षित असून माझी प्रकृती ठीक आहे," अशी माहिती श्रीनिवास नायक यांनी दिलीय. आपण या हल्ल्यातून सुखरूप बचावलो असल्याचं त्यांनी सांगितलं.

तपास सुरू- पोलीस महानिरीक्षक

"गोळीबाराच्या घटनेची माहिती आम्हाला मिळाली असून, या घटनेचा तपास सुरू आहे," असं पोलीस महानिरीक्षक केशवराम चौरासिया यांनी सांगितलं. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

काँग्रेसची सरकारवर टीका

या गोळीबाराच्या घटनेमुळं भाजप सरकारकडून कायदा-सुव्यवस्था अबाधित असल्याचं केले जाणारे दावे पोकळ ठरल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी केला. "गोव्यात बंदुकीचा वापर आणि गुन्हेगारी दहशतीच्या घटना चिंतेचा विषय बनत असताना, सामान्य नागरिकांनी सरकारकडून सुरक्षिततेची अपेक्षा तरी कशी ठेवायची?", असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

"प्रभावशाली व्यक्तीच सुरक्षित नसतील, तर सामान्य गोमंतकीयांचं काय? राजकीय संबंध असतानाही वैयक्तिक सुरक्षिततेची हमी मिळत नसेल तर गोवा कोणत्या दिशेनं चाललाय?", असा सवाल त्यांनी केला. तसेच हल्लेखोरांना तातडीनं अटक करण्याची मागणी त्यांनी केली. गोळीबारामागील नेमकं कारण काय, हल्लेखोर कोण आहेत आणि त्यांचा या घटनेमागील उद्देश काय होता, याचा तातडीनं छडा लावण्याची मागणी चोडणकर यांनी केली आहे. "तपासात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि दोषींवर कठोर कारवाई करावी," अशी मागणीही चोडणकर यांनी केली. "सरकारनं केवळ प्रसिद्धीपत्रकं आणि छायाचित्रांपुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या सुरक्षेकडं गांभीर्यानं पाहावं," असं चोडणकर म्हणाले.

कायदा-सुव्यवस्था कोलमडली - काँग्रेस

या गोळीबाराच्या घटनेमुळं गोव्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. "गोव्यात कायदा-सुव्यवस्था संपूर्णपणे कोलमडली असून, मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृह खात्याचंच हे अपयश आहे," अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. "पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच गुन्हेगारांना गोळीबार करण्याचं धाडस होत असेल, तर गोव्यात नेमकं नियंत्रण कोणाचं आहे? पोलिसांचं की गुन्हेगारांचं?" असा सडेतोड सवालही त्यांनी केला.

हेही वाचा -

  1. कौटुंबिक वादातून दुसरंच रॅकेट उघडकीस! बायकोशी नडणं नवऱ्याला पडलं महागात, चंद्रपुरात काय घडलं?
  2. कोल्हापुरात कुख्यात बिश्नोई गँगच्या म्होरक्यासह एकाला अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई