शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना आज अटक होण्याची शक्यता; आश्रमाबाहेर वकिलांच्या टीमनं ठोकला तळ!
योगी विरुद्ध शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यातील वादाला उत्तर प्रदेशमध्ये वेगळं वळण लागलं आहे. प्रयागराज पोलीस आज वाराणसीमधील स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना आश्रमात जाऊन अटक करू शकते.

Published : February 23, 2026 at 1:51 PM IST
|Updated : February 23, 2026 at 2:19 PM IST
वाराणसी (लखनौ)- शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरोधात प्रयागराज येथे लैंगिक शोषण केल्याच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज पोलिसांचे पथक त्यांच्या वाराणसीमधील श्री विद्या मठात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शंकराचार्य यांच्या वकिलांची टीम ही मठाबाहेर पोहोचली आहे. कायदेशीर कारवाई थांबविण्यासाठी काय करता येईल, यासाठी वकिलांकडून तयारी सुरू आहे. शंकराचार्य आणि त्यांच्या शिष्यांवरील दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणात अटक होणं अटळ आहे. असे असले तरी शंकराचार्यांचे कायदेशीर टीम आपल्यापरीनं काम करत आहेत. शंकराचार्य यांचे वकील मदन मिश्रा यांच्या माहितीनुसार त्यांच्यावर पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. "आरोप केलेल्या मुलांचे पोलिसांनी जबाब घेतले नाहीत. अटक झाली तरी कायदेशीर लढा देणार आहोत. जे काही आहे, ते तपासात स्पष्ट होईल. हा खोट्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर जास्त बोलण्यात अर्थ नाही", असेही त्यांनी सांगितलं.
सत्य सर्वांसमोर येईन-शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं," आज वकिलांसोबत माझी बैठक झाली. याबाबत वकिलांकडून कायदेशीर मत विचारात घेतलं आहे. कदाचित आमची कायदेशीर टीम ही उच्च न्यायालयात जाऊन पुढील कारवाई करू शकते मी कुठेही पळून जाणार नाही. येथेच बसणार आहे. त्यामुळे अटकेचा प्रश्नच उपस्थित होत नाही. तरीही अटक होणार असेल तर पोलिसांना विरोध करणार नाही. तपासात पूर्ण सहकार्य करणार आहोत. जे काही सत्य समोर येईल, ते सर्वांना समोर दिसणार आहे".
वकिलांना बोलाविलेलं नाही-"जे कोणी येईल, त्यांचं स्वागत आहे. कोणताही तपास होत असेल तर आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत. पोलिसांना प्रकरण निकाली काढण्यात रस असतो, त्यापेक्षा आम्हाला जास्त रस आहे. जेणेकरून आमच्यावर लागलेला कलंक लवकरात लवकर दूर करता येईल. आम्ही कोणत्याही वकिलाला बोलाविलेलं नाही. अधिवक्ता न्यायालयात काम करतात. येथे त्यांची काही आवश्यकता नाही. काही वकील हे त्यांची श्रद्धा आणि भावनेनं येथे आले आहेत", असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं.
नकली हिंदुंचा पर्दाफाश होणार- रामचरितमानसमधील लंका कांडमधील उल्लेखानुसार बिभीषणनं रावणाला ढोंगीपणाचा एकदिवस शेवट होईल, असा इशारा दिला होता. त्याचा संदर्भ घेत शंकराचार्य यांनी नाव न घेता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं," रावणानं संन्याशाचा वेश घेऊन चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. मात्र, त्याचं पितळ उघड पडलं होतं. कालनेमीनंही संन्याशाचं रुप धारण केलं होतं. मात्र, हनुमानासमोर त्याचा अंत झाला. याचप्रकारे राहूनं देवतांचं रुप धारण करून अमृत पिण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा पर्दाफाश झाला होता. जे नकली हिंदू आहेत, त्यांचा पर्दाफाश होणार आहे. या प्रकरणाचा उत्तर प्रदेश पोलीस तपास करणार आहे. उत्तर प्रदेश पोलीस ही सरकारच्या अधीन आहे. सरकारकडून जे काही सांगण्यात येईल, ते पोलीस करेल. मात्र, कायद्यांतर्गत व्हावे, अशी माझी इच्छा आहे. हे प्रकरण लवकर निकाली लागो, अशी माझी इच्छा आहे".
हेही वाचा-

