ETV Bharat / bharat

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सीआर पाटील यांच्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल, वाचा काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत आणि आमदार सतेज पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

CR Patil Chhatrapati Shivaji Maharaj statement  controversy
संग्रहित- सी. आर. पाटील, संजय राऊत (Source- ETV Bharat Reporter/ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 6, 2026 at 4:46 PM IST

|

Updated : January 6, 2026 at 5:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्यावर शिवसेनेचे (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी कडाडून टीका केली. महाराष्ट्राचे आराध्यदैवत गुजरातला पळवायचे आहेत का, असा सवाल खासदार राऊत यांनी केला. महापुरुषांबद्दल जाणून-बुजून अशी वक्तव्य करायची, असे भाजपाचे कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला.

मला सांगायला आनंद होतोय की, छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, असे वादग्रस्त वक्तव्य गुजरातमधील भाजपा नेते तथा केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी केले होते. त्यांनी हिंदू स्वराज्य स्थापना करण्याचा यशस्वी करण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला, असेही भाजपाचे ज्येष्ठ नेते सी. आर. पाटील यांनी नुकतेच सुरतमधील एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत.

आमदार सतेज पाटील यांची भाजपावर टीका (Source- ETV Bharat Reporter)

खासदार संजय राऊत यांनी सी. आर. पाटील. यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे आणि हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत आहेत. आजवर अनेक युगपुरुषांना भाजपानं पळविण्याचा प्रयत्न केला. सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर यांना पळविण्याचा भाजपानं प्रयत्न करूनदेखील त्यांना फायदा झाला नाही. आता गुजरातला छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न सुरू आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. पळापळ करून दाणादाण केली होती. हे विसरू नका", असे सांगत खासदार राऊतांनी इतिहासाची भाजपाला आठवण करून दिली.

महान नेते जन्मालाच आलेले नाहीत का-खासदार राऊत- अरबी सुमुद्रातील शिवस्मारक अद्याप अपूर्ण आहे. त्याचा संदर्भ घेत राऊत म्हणाले,"आधी अरबी समुद्रातील शिवस्मारक पूर्ण करा. मग शिवाजी महाराजांची जात काढा. छत्रपती शिवाजी महाराजांना जात लावू नका. हे असे विषय काढून मराठी माणसासह महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार सुरू आहे. हा विषय काढण्याची आवश्यकता होती का? शिवसेना, राष्ट्रवादी पळविली. आता बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायला लागले आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुम्ही पळवत आहात. तुमच्याकडे काही दैवत नाही का, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्मालाच आलेले नाहीत का, म्हणून तुम्हाला आमची दैवतं पळवण्याचा बकासुरू आनंद घ्यायचा का", असा टोला त्यांनी भाजपा नेत्याला लगावला.

प्रतिमा मलीन करण्याचं हे कारस्थान- "महापुरुषांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने लोकांच्या समोर सांगायचा, हे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे. मागच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजपाकडून वक्तव्य झालं. यातून महापुरुषांच्या इतिहासाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत. तुम्ही-आम्ही पाठ्यपुस्तकातून इतिहास वाचला आहे. या पुढच्या पन्नास वर्षात डिजिटल पद्धतीनं इतिहास वाचला जाईल. महापुरुषांबद्दल जाणून-बुजून अशी वक्तव्य करायची. तेच डिजिटल फुटप्रिंटच्या माध्यमातून लोकांसमोर आणायचं. जेणेकरून लोकांना तेच खरं वाटलं पाहिजे, हे कारस्थान आहे. हा पुढील शंभर वर्षांचा प्लॅन आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा मलीन करण्याचं हे कारस्थान आहे", असा गंभीर आरोप विधान परिषदेमधील काँग्रेसचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला.

Last Updated : January 6, 2026 at 5:21 PM IST