ETV Bharat / bharat

'आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस'! बंगालमध्ये एकनाथ शिंदे पॅटर्नची चर्चा; ममतांच्या विरोधात 59 आमदारांचं बंड, टीएमसी फुटण्याच्या मार्गावर

पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यापासून, ममता बॅनर्जींना एकामागून एक धक्क्यांचा सामना करावा लागत आहे. सध्याची परिस्थिती पक्षातील फुटीच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.

Mamata Banerjee and Ritabrata Banerjee
ममता बॅनर्जी आणि ऋतब्रत बॅनर्जी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 3, 2026 at 1:38 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणूक 2026 नंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल दिसून येत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद तीव्र झाले असून पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरोधात उघडपणे बंड : तृणमूल काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरोधात उघडपणे बंड पुकारलं आहे. दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित करत स्वतंत्र भूमिका घेतली आहे.

या घडामोडींमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष वाढल्याची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात पक्षातील राजकीय समीकरणं आणखी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणावरून ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पक्ष नेतृत्वाकडून या घडामोडींवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी या प्रकरणामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

तृणमूल काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋतब्रत बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या 80 आमदारांपैकी सुमारे 60 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, ऋतब्रत बॅनर्जी आज काही वेळापूर्वी पश्चिम बंगाल विधानसभेत दाखल झाले. या घडामोडींमुळे विधानसभा परिसरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं असून राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय जाणकारांच्या मते, विरोधी गटातील ही कथित 'बंडखोरी' राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकते. आगामी काळात या घडामोडींचा पश्चिम बंगालच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऋतब्रत बॅनर्जींचं एकनाथ शिंदेंसारखं बंड : यापूर्वी 1 जून रोजी उलुबेरिया पूर्व मतदारसंघाचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि एंटालीचे आमदार संदीपन साहा यांना पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली तृणमूल काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आलं होतं. पक्षानं जारी केलेल्या निवेदनात सांगितलं की, दोन्ही नेते वारंवार पक्ष नेतृत्वाच्या निर्देशांचे पालन करत नसल्यानं आणि पक्षहिताला बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्यानं त्यांच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. यानंतर त्यांच्याकडील पक्षातील सर्व पदं आणि जबाबदाऱ्या तत्काळ काढून घेण्यात आल्या. दरम्यान, या राजकीय घडामोडींची तुलना महाराष्ट्रातील 'शिंदे पॅटर्न'शी केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

59 आमदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा : सूत्रांच्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाकडून ऋतब्रत बॅनर्जी यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पुढं केलं जात आहे. तसेच टीएमसीचे सुमारे 20 आमदार विधानसभेत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. हा घडामोडींचा क्रम ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांनी सध्या 59 आमदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला आहे. मात्र, या कथित बंडखोर आमदारांची नावं अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत.

बंगालमध्ये राजकीय भूकंप येणार? : ऋतब्रत बॅनर्जी यांच्यासोबतच एंटालीचे आमदार संदीपन साहा यांची भूमिकाही सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. 'बनावट स्वाक्षरी' प्रकरणाशी संबंधित एका वादात दोन्ही नेत्यांची नावं समोर आल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली होती.

मात्र, पक्षातून हकालट्टी केल्यानंतर संदीपन साहा किंवा ऋतब्रत बॅनर्जी यांनी अद्याप माध्यमांसमोर सविस्तर भूमिका मांडलेली नाही. असं असलं तरी आज विधानसभेतील ऋतब्रत बॅनर्जी यांची नाट्यमय उपस्थिती अनेक राजकीय संकेत देणारी ठरली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ऋतब्रत बॅनर्जी यांनी आपल्या हालचालींमधून संघर्षाची भूमिका स्पष्ट केली असून ते सहजपणे माघार घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा