ETV Bharat / bharat

रामोजी एक्सलन्स अवॉर्ड 2025 ; 'या' दिग्गजांचा करण्यात आला रामोजी एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरव, दोन शब्दकोषांचं प्रकाशन

पद्मविभूषण रामोजी राव यांच्या जयंतीनिमित्त रामोजी एक्सलन्स अवॉर्ड 2025 सोहळा रामोजी फिल्मसिटीत रविवारी पार पडला. या सोहळ्यात अनेक दिग्गजांना सन्मानित करण्यात आलं.

RAMOJI EXCELLENCE AWARDS 2025
पद्मविभूषण रामोजी राव यांचं संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 16, 2025 at 10:52 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : रामोजी फिल्म सिटी इथं रविवारी रामोजी एक्सलन्स अवॉर्ड 2025 समारंभ सोहळा पार पडला. या सोहळ्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांचा रामोजी एक्सलन्स अवॉर्ड 2025 देऊन गौरव करण्यात आला. या दिग्गजांनी युवा वर्गाला प्रेरणा दिली आहे. पद्मविभूषण रामोजी राव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या रामोजी एक्सलन्स अवॉर्ड्सनं विविध क्षेत्रातील सात दिग्गजांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं. या समारंभाची सुरूवात उपस्थित मान्यवरांच्या भव्य स्वागतानं झाली. त्यानंतर विद्यार्थी आणि कलावंतानी भारताच्या विविधतेचं दर्शन घडवलं.

रामोजी शब्दकोशाचं प्रकाशन : भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते या कार्यक्रमात रामोजी फाउंडेशनच्या रामोजी शब्दकोशाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यानंतर रामोजी ग्रूपचे चेयरमन चेरुकुरी किरण यांनी समारंभात मान्यवरांचा सन्मान केला.

एक्सलन्स अवॉर्ड्स 2025 चे कोण आहेत विजेते : रामोजी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार : पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्टता पुरस्कार देऊन जयदीप हार्डीकर यांना गौरवण्यात आलं. जयदीप हार्डीकर हे एक प्रतिष्ठित पत्रकार आहेत. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ भारताच्या ग्रामीण वास्तवाचं वृत्तांकन केलं आहे. त्यांचं कार्य दुर्बल घटकांना न्याय मिळवून देते.

युथ आयकॉन पुरस्कार : श्रीकांत बोल्ला यांना युथ आयकॉन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्रीकांत बोल्ला हे बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष आणि एमआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी अतिशय कमी कालावधीत राष्ट्रीय पातळीवर आदर्श निर्माण केला आहे. शाश्वत विकासाला त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे.

कला आणि संस्कृती पुरस्कार : प्राध्यापक सथुपती प्रसन्ना श्री यांना कला आणि संस्कृतीतील उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी 19 आदिवासी भाषांसाठी लिपी तयार केली आहे. प्राध्यापक प्रसन्ना श्री यांनी भारताच्या स्थानिक साहित्यिक वारशाच्या जतनात क्रांती घडवून आणली आहे. आदिकवी नन्नया विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्या सांस्कृतिक आणि भाषिक सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील असतात.

ग्रामीण विकास पुरस्कार : ग्रामीण विकासातील उत्कृष्टता पुरस्कार अमला अशोक रुईया यांना देण्यात आला. "वॉटर मदर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुईया यांनी नाविन्यपूर्ण जलसंधारण उपक्रमांद्वारे दुष्काळग्रस्त गावांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे. आकार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्यामुळे ग्रामीण भारतातील महिलांना खूप मोठी मदत झाली आहे.

मानवसेवा पुरस्कार : मानवसेवा उत्कृष्टता पुरस्कार आकाश टंडन यांना प्रदान करण्यात आला. पेहचान - द स्ट्रीट स्कूलचे संस्थापक आकाश टंडन यांनी दिल्ली-एनसीआरमधील हजारो वंचित मुलांना शिक्षण देण्यासाठी एक चळवळ उभारली आहे. त्यांचं ध्येय उपेक्षित समुदायांसाठी प्रतिष्ठा, संधी आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते.

महिला अचिव्हर्स पुरस्कार : मानवी तस्करीविरुद्ध निर्भयपणे लढणाऱ्या पल्लवी घोष यांना महिला अचिव्हर्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांनी 10 हजारापेक्षाही महिला आणि मुलांची सुटका केली आहे. त्यांनी तब्बल 75 हजारापेक्षा अधिक लोकांचं जीवन सुधारलं आहे. इम्पॅक्ट अँड डायलॉग फाउंडेशनच्या माध्यमातून त्या मुलांच पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करत आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार : प्राध्यापक माधवी लता गली यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. बंगळुरू येथील आयआयएससी येथील एक आघाडीच्या भू-तंत्रज्ञान अभियंता आहेत. प्राध्यापक लता यांनी चिनाब रेल्वे पुलासह प्रमुख राष्ट्रीय पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये योगदान दिलं. सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षा म्हणून, त्या नवोपक्रमांना चालना देत आहेत.

कोण कोण होतं उपस्थित ? : पद्मविभूषण रामोजी राव यांच्या जयंतीनिमित्त (१६ नोव्हेंबर) आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमाला भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी, भारताचे माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, भारताचे माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचा समावेश होता.

हेही वाचा :

  1. Live : राष्ट्रसेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या दिग्गजांचा 'रामोजी एक्सलन्स अवार्ड'नं सन्मान, पाहा लाईव्ह
  2. 'रामोजी एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५'; उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार, उपराष्ट्रपतींसह मान्यवरांची राहणार उपस्थिती
  3. रामोजी फिल्म सिटीमध्ये 'द ग्रँड ग्लोब ट्रॉटर'चा शाही सेट तयार, चाहत्यांना महेश बाबू-राजामौली देणार मोठे सरप्राईज...