माजी आयजी अमरसिंग चहल यांनी आत्महत्येचा केला प्रयत्न; प्रकृती चिंताजनक
माजी आयपीएस अधिकारी अमरसिंग चहल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Published : December 22, 2025 at 8:34 PM IST
पटियाला (अमृतसर) - माजी आयपीएस अधिकारी अमरसिंग चहल यांनी सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. ते २०१५ च्या बेहबल कलान आणि कोटकपुरा गोळीबार प्रकरणातील आरोपी आहेत.
माजी पोलीस महासंचालक अमरसिंग चहल यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तथापि, घटनास्थळावरून चिठ्ठी सापडली आहे. ते आर्थिक फसवणुकीचे बळी ठरले होते, अशी प्राथमिक माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पटियालाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक वरुण शर्मा यांनी सांगितलं की, “आम्हाला घटनेची माहिती मिळताच पोलीस पथके त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, आयजी पदावरून निवृत्त झाल्यानंतर अमरसिंग चहल पटियालामध्ये राहत होते. पटियालाचे एसपी सिटी पलविंदर सिंग चीमा म्हणाले, "अमरसिंग चहल जखमी अवस्थेत आणि शुद्धीवर आढळले. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्णालयात सीटी स्कॅन आणि इतर अनेक चाचण्या केल्या जात आहेत. अहवाल आल्यानंतर डॉक्टर पुढील उपचाराची दिशा ठरवतील. घटनास्थळावरून अनेक सुसाइड नोट्स जप्त करण्यात आल्या आहेत. एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. सध्या पोलीस या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास करत आहेत".
- अतिरिक्त पोलीस महासंचालक एल. के. यादव यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकानं (एसआयटी) २४ फेब्रुवारी २०२३ रोजी फरिदकोट न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. यात चहल यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे होती.
टीप : आत्महत्या हा उपाय नाही : जर तुम्हाला आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल, किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच कोणीतरी आहे. स्नेहा फाउंडेशन - ०४४२४६४००५० (२४x७ उपलब्ध) किंवा आयकॉल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन ९१५२९८७८२१ वर कॉल करा (सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत उपलब्ध).

