ETV Bharat / bharat

द्रौपदी मुर्मू यांची 'प्रचंड' गगनभरारी, फायटर हेलिकॉप्टरमधून को-पायलट म्हणून उड्डाण करणाऱ्या पहिल्याच राष्ट्रपती

राष्ट्रपती मुर्मू सायंकाळी 5 वाजता पोखरण फील्ड फायरिंग रेंज इथं होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या सर्वात मोठ्या युद्धाभ्यास 'वायु शक्ति-2026'ला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

President Droupadi Murmu
द्रौपदी मुर्मू यांची 'प्रचंड' गगनभरारी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 27, 2026 at 1:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

जैसलमेर (राजस्थान) : देशाच्या राष्ट्रपती आणि सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू यांनी आज शुक्रवारी (27 फेब्रुवारी) इतिहास घडवत स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर 'प्रचंड'मध्ये सह-पायलट म्हणून उड्डाण केलं. या अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये सह-पायलट म्हणून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.

'प्रचंड' हेलिकॉप्टरची माहिती घेतली : राष्ट्रपती सकाळी सुमारे 9:15 वाजता जैसलमेर वायुदल तळावर पोहोचल्या. त्या ठिकाणी त्यांनी 'प्रचंड' हेलिकॉप्टरच्या क्षमतांबाबत आणि मिशन प्रोफाइलबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर पायलटचा गणवेश परिधान करून त्या कॉकपिटमध्ये बसल्या आणि सकाळी सुमारे 10:15 वाजता ग्रुप कॅप्टन एन. एस. बहुआ यांच्यासोबत उड्डाण केलं. सुमारे 25 मिनिटांच्या या उड्डाणादरम्यान त्यांनी पाकिस्तान सीमेजवळील पोखरण फील्ड फायरिंग रेंज तसेच ऐतिहासिक 'शक्ती स्थळ' परिसराचं हवाई निरीक्षण केलं.

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निर्मित या आधुनिक कॉम्बॅट हेलिकॉप्टरमधून राष्ट्रपतींनी देशातील सर्वात मोठ्या फील्ड फायरिंग रेंज आणि अणुचाचणी स्थळाचा आढावा घेतला. उड्डाणादरम्यान त्यांनी हेलिकॉप्टरमधून सॅल्यूट करून उपस्थित जवान व अधिकाऱ्यांचं अभिवादन स्वीकारलं. या वेळी दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून वायुदल प्रमुख ए.पी. सिंह (एअर चीफ मार्शल) हेदेखील उपस्थित होते.

President Droupadi Murmu
द्रौपदी मुर्मू यांची 'प्रचंड' गगनभरारी (ETV Bharat)

'वायु शक्ति-2026'मध्ये राष्ट्रपती मुख्य अतिथी : द्रौपदी मुर्मू या सायंकाळी सुमारे 5 वाजता पोखरण फील्ड फायरिंग रेंज इथं होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या सर्वात मोठ्या युद्धाभ्यास 'वायु शक्ति-2026'ला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सीमावर्ती वाळवंटी भागात आयोजित या लाइव्ह फायर सरावामध्ये लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि इतर युद्धसज्ज प्लॅटफॉर्म आपली मारक क्षमता, अचूक लक्ष्यभेदन आणि समन्वित कारवाईचं प्रात्यक्षिक सादर करतील. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तसेच, लष्कर व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपतींनी यापूर्वीही रचला इतिहास : राष्ट्रपती मुर्मू यांनी यापूर्वीही लढाऊ विमानांमधून उड्डाण करून इतिहास घडवला आहे. 8 एप्रिल 2023 रोजी त्यांनी आसाममधील तेजपूर एअरबेसवरून सुखोई-30 एमकेआय (Sukhoi-30MKI) या लढाऊ विमानातून सुमारे 30 मिनिटांचं उड्डाण केलं होतं. या विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या.

त्यानंतर 29 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी अंबाला येथील 'गोल्डन एरोज' स्क्वॉड्रनच्या दसॉल्ट राफेल (Dassault Rafale) लढाऊ विमानातून उड्डाण करत नवा विक्रम प्रस्थापित केला. सुमारे 15 हजार फूट उंचीवर आणि ताशी सुमारे 700 किलोमीटर वेगानं उड्डाण करत त्यांनी वायुदलाची ताकद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. सुखोई आणि राफेल अशा दोन वेगवेगळ्या आधुनिक लढाऊ विमानांतून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.

President Droupadi Murmu
द्रौपदी मुर्मू यांची 'प्रचंड' गगनभरारी (ETV Bharat)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पायलटच्या विशेष गणवेशात : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पायलटच्या विशेष गणवेशात जैसलमेर एअरफोर्स स्टेशनवर दाखल झाल्या. तिथं वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांनी 'प्रचंड' हेलिकॉप्टरसमवेत फोटो काढले. तसेच, अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ग्रुप कॅप्टन एन. एस. बहुआ यांनी हेलिकॉप्टरचं संचालन केलं, तर राष्ट्रपती सह-पायलट आसनावर होत्या.

उड्डाणादरम्यान राष्ट्रपतींनी रेडिओच्या माध्यमातून देशवासियांना संदेश दिला. त्यांनी म्हटलं, 'मी आज 'प्रचंड' हेलिकॉप्टरमधून उड्डाण करत आहे. हे हेलिकॉप्टर भारताच्या आत्मनिर्भरतेचं प्रभावी प्रतीक आहे. सध्या मी जैसलमेरच्या प्रसिद्ध किल्ल्यावरून उड्डाण करत आहे. देशाच्या शूर सैनिकांना मी अभिमानानं धन्यवाद देते. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार, जय हिंद'.

संदेशानंतर त्या पुन्हा जैसलमेर वायुसेना स्थानकावर परतल्या. तिथं एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी त्यांचं स्वागत केलं आणि हेलिकॉप्टर उड्डाणाशी संबंधित स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला.

President Droupadi Murmu
द्रौपदी मुर्मू यांची 'प्रचंड' गगनभरारी (ETV Bharat)

गुरुवारी सायंकाळी आगमन झालं : राष्ट्रपती मुर्मू या गुरुवारी सायंकाळी सुमारे 7:30 वाजता जैसलमेर एअरफोर्स स्टेशनवर पोहोचल्या होत्या. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्या आर्मी स्टेशनकडे रवाना झाल्या. तिथंच त्यांनी रात्रीचा मुक्काम केला.

हेही वाचा