मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला लगावल्या कानशिलात: पोलिसांनी ठोकल्या बेड्या, न्यायालयानं पाठवलं कारागृहात
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकाला शिक्षण विभागानं निलंबित केलं. मात्र पालकांच्या तक्रारीवरुन या मुख्याध्यापकाला अटक करुन त्याला कारागृहात पाठवण्यात आलं.

Published : December 1, 2025 at 6:32 PM IST
|Updated : December 1, 2025 at 7:04 PM IST
रायपूर : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला कानशिलात लगावणाऱ्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे. मुलाला मारहाण केल्याबद्दल शिक्षण विभागानं मुख्याध्यापकाला आधीच निलंबित केलं होतं. मात्र मुलाच्या कुटुंबानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली. मुख्याध्यापकाला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला कारागृहात पाठवलं. ही घटना छत्तीसगडमधील रामचंद्रपूर परिसरातील पालगी गावात घडली. उदय यादव असं न्यायालयानं कारागृहात पाठवलेल्या आरोपी मुख्याध्यापकाचं नाव आहे.
मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 296, 115(2) आणि बाल न्याय कायदा, 2015 च्या कलम 75 आणि 82 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासानंतर आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. - जवाहर तिर्की, एएसआय
विद्यार्थ्याला बेदम मारहाण : रामचंद्रपूर परिसरातील जवाखाडी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक उदय यादव यानं शुक्रवारी दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याला गणित सांगितलं. विद्यार्थ्यानं चूक केल्यामुळे उदय यादव संतापला. त्यानंतर त्यानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर गंभीर दुखापत झाली. जेव्हा मुलगा घरी परतला तेव्हा, त्यानं रडत रडत ही घटना त्याच्या कुटुंबाला सांगितली. मुलाची अवस्था पाहून त्याचं कुटुंब आणि गावकरी संतापले.
शिक्षण विभागानं केली निलंबनाची कारवाई : जवाखाडी येथील मुख्याध्यापक उदय यादव यानं एका निष्पाप विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात कुटुंबानं शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याकडं तक्रार केली. त्यानंतर या विद्यार्थ्याच्या पालकांनीपोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीवरुन मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक करुन न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं आरोपी मुख्याध्यापकाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडं शिक्षणाधिकारी एम. आर. यादव यांनी मुख्याध्यापकाला निलंबित केलं. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली.
हेही वाचा :

