ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी यांनी नेतन्याहू आणि यूएईच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवरून साधला संवाद, भारतीयांच्या सुरक्षेवर दिला भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू आणि युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.

PM Modi
पंतप्रधान मोदी (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 9:20 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणकडून संपूर्ण मध्यपूर्वेत अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. इराणी क्षेपणास्त्रांचं लक्ष्य इस्रायलदेखील आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सध्याच्या परिस्थितीची माहिती घेतली.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले? : या संभाषणात पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच शत्रुत्व लवकरात लवकर संपवण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. एक्सवरील पोस्टमध्ये मोदींनी म्हटलं की, अलीकडील घडामोडींविषयी भारताच्या चिंता त्यांनी नेतन्याहू यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर भर दिला.

युएईच्या राष्ट्राध्यक्षांसोबत दूरध्वनीवर चर्चा : दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा केली. यूएईवरील अलीकडील हल्ल्यांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आणि जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं. कठीण काळात भारत यूएईसोबत एकजुटीने उभा असल्याचंही त्यांनी सांगितलं. यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. तसेच तणाव कमी करण्यासाठी आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा व स्थैर्याला पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरुद्ध संयुक्त लष्करी कारवाई सुरू केली. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढला आहे. अमेरिका आणि इस्रायलचे लढाऊ विमानं इराणवर सातत्याने बॉम्बहल्ले करत असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर आणि इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत.