धावत्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडून प्रवाशानं मारली उडी, चेन्नई विमानतळावरील धक्कादायक प्रकार!
या घटनेमुळं संपूर्ण विमानतळ परिसरात मोठी खळबळ उडाली.

Published : May 3, 2026 at 4:44 PM IST
चेन्नई: टॅक्सीवेवर धावणाऱ्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा (इमर्जन्सी एक्झिट) एका प्रवाशानं उघडून बाहेर उडी मारली. या घटनेमुळं चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घबराट पसरली. सुदैवानं, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एअर अरेबियाचे 217 प्रवासी असलेलं हे विमान रविवारी (3 मे) पहाटे शारजाहहून चेन्नईला दाखल झालं होतं.
विमानतळ परिसरात मोठी खळबळ : ज्यावेळी विमान टॅक्सीवेवर, म्हणजेच धावपट्टी आणि टर्मिनलला जोडणाऱ्या मार्गावर जात होतं, त्यावेळी विमानात असलेल्या एका 34 वर्षीय व्यक्तीनं आपत्कालीन दरवाजा उघडून खाली उडी मारली. सुदैवानं, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानाच्या आपत्कालीन दरवाजातून उडी मारणाऱ्या या प्रवाशाचं नाव मोहम्मद निझामुद्दीन शरीफ असं आहे. तो पुदुक्कोट्टाई जिल्ह्यातील रहिवाशी आहे. दरम्यान, या घटनेमुळं संपूर्ण विमानतळ परिसरात मोठी खळबळ उडाली. परिणामी, विमान वेळेवर आपल्या निर्धारित पार्किंगच्या ठिकाणी पोहोचू शकलं नाही आणि टॅक्सीवेवरच अडकून राहिलं.
प्रवासी पोलिसांच्या ताब्यात : घटना लक्षात येताच वैमानिकानं तात्काळ विमान थांबवलं आणि अधिकाऱ्यांना सतर्क केलं. यानंतर घटनेची माहिती मिळताच, बॉम्ब निकामी करणारे पथक आणि सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान त्वरित घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, वैमानिकानं औपचारिक तक्रार दाखल केली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशाची चौकशी केली जात असून त्याच्या मानसिक स्थितीचं मूल्यांकन केलं जात आहे.
विमानतळाचे कामकाज काही काळ विस्कळीत : चौकशीदरम्यान मोहम्मद निझामुद्दीन शरीफनं परस्परविरोधी विधानं केली आणि दावा केला की, कोणीतरी आपल्याला ठार मारेल या भीतीनं आपण विमानातून उडी मारली. या वर्तनामुळं सुरक्षा अधिकाऱ्यांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर त्यांनी मोहम्मद निझामुद्दीन शरीफची खरी ओळख पटवण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळं विमानतळाचे कामकाज काही काळ विस्कळीत झालं होतं.
...त्यामुळं गंभीर समस्या निर्माण होऊ शकते : आपत्कालीन दरवाजे हे विमानातील विशेष दरवाजे असतात, जे केवळ आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित आणि जलद बाहेर काढण्यासाठी वापरले जातात. विनाकारण त्यांचा वापर करणं केवळ अयोग्यच नाही, तर त्यामुळं गंभीर समस्या आणि धोकाही निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा :

