हाफिज सईदनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कट रचला; NIA कडून आरोपपत्र दाखल
राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे

Published : July 6, 2026 at 5:37 PM IST
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. एनआयएनं सोमवारी याप्रकरणी पाकिस्तानी दहशतवादी आणि लष्कर-ए-तैयब्बा (LeT) चा संस्थापक हाफिज सईदविरुद्ध पुरवणी आरोपपत्र (Supplementary Chargesheet) दाखल केले आहे. तसंच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदच होता, असा ठपका एनआयएनं ठेवला असून त्याच्यावर भारताविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
एका अधिकृत निवेदनानुसार, जम्मू येथील एनआयए विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात वैयक्तिकरित्या हाफिज सईदचे तसंच बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयब्बा आणि त्याची सहयोगी संघटना 'द रेझिस्टन्स फ्रंट' याच्या प्रमुखाचे नाव आहे. दरम्यान, दहशतवादाचा सूत्रधार हाफिज सईदवर भारतीय दंड संहिता (बीएनएस), 2023 आणि बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
NIA has filed a supplementary chargesheet against Hafiz Saeed, naming him in both his individual capacity and as chief of the banned Lashkar-e-Taiba (LeT) and its proxy, The Resistance Front, in the Pahalgam terror attack case. Charged under the BNS and UAPA, he is accused of… pic.twitter.com/mwr4HNIZDd
— IANS (@ians_india) July 6, 2026
अधिकृत निवेदनात पुढं म्हटलं आहं की, एनआयएनं भारताविरुद्ध युद्ध पुकारणं आणि सीमेपलीकडून रचलेल्या कथित गुन्हेगारी कटाशी संबंधित आरोपही दाखल केले आहेत. दरम्यान, मूळ 1,597 पानांच्या आरोपपत्राच्या अनुषंगानं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात, पाकिस्तानचा कथित कट, हाफिज सईदची भूमिका आणि एनआयएनं वैज्ञानिक तपास व व्यापक प्रत्यक्ष पडताळणीद्वारे गोळा केलेल्या पुराव्यांचा तपशील देण्यात आला आहे.
एनआयएनं 15 डिसेंबर 2025 रोजी दाखल केलेल्या आपल्या पूर्वीच्या आरोपपत्रात पाकिस्तानी दहशतवादी सूत्रधार साजिद जट्ट तसंच जुलै 2025 मध्ये ऑपरेशन महादेवदरम्यान ठार झालेले तीन दहशतवादी आणि अटक केलेल्या दोन आरोपींची नावं घालण्यात आली होती. एनआयएनं बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयब्बा/द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेवरही हल्ल्याचे नियोजन, सुलभता आणि अंमलबजावणी करण्यात कथित भूमिकेबद्दल आरोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तान-समर्थित दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरुवातीला अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंद करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर, गृह मंत्रालयानं हा तपास एनआयएकडे सोपवला होता.
हेही वाचा :

