नीट पेपरफुटी प्रकरण : कुलकर्णी, मोटेगावकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ!
न्यायालयानं आरोपी पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचं आदेश दिले आहेत.

Published : July 8, 2026 at 4:12 PM IST
नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं बुधवारी (8 जुलै) नीट पेपरफुटी प्रकरणातील दोन आरोपींची न्यायालयीन कोठडी 11 जुलैपर्यंत वाढवली आहे. न्यायालयानं आरोपी पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचं आदेश दिले आहेत. पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांची आज न्यायालयीन कोठडी संपत होती. त्यामुळं या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
आतापर्यंत 13 आरोपींना अटक : एका सरकारी अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे 12 मे रोजी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला होता. सीबीआयनं भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली हा एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर 3 मे रोजी होणारी नीट परीक्षा रद्द करून 21 जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात आली होती. तसंच केंद्र सरकारनं या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शुभम खैरवारला मुंबईतून अटक : मनीषा वाघमारे यांनी नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका धनंजय लोखंडे यांना दिल्या असा आरोप आहे. धनंजय लोखंडे यांनी नंतर त्या प्रश्नपत्रिका शुभम खैरवार यांना दिल्या. 14 मे रोजी न्यायालयानं पाच आरोपींना सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. 14 मे रोजी न्यायालयानं सीबीआय कोठडी सुनावलेल्या पाच आरोपींमध्ये नाशिकचा शुभम खैरवार, जयपूरचे मंगिलाल बिवल, विकास बिवल आणि दिनेश बिवल, तसंच गुरुग्रामचा यश यादव यांचा समावेश आहे. शुभम खैरवारला 13 मे रोजी मुंबईतून अटक करून दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला आणण्यात आलं होतं. शुभम खैरवार हा महाराष्ट्रातील नाशिकचा रहिवासी आहे.
हेही वाचा :
- मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची विमानं आमने-सामने, आपत्कालीन ब्रेकिंगमुळे अपघात टळला
- उत्तरकाशीतील पाखोटू बुग्यालमध्ये वीज कोसळल्याने 200 हून अधिक मेंढ्या आणि बकऱ्या ठार, 100 हून अधिक बेपत्ता
- वायनाड भूस्खलनात बेपत्ता झालेल्या पाच जणांचा शोध सुरूच, मृतांची संख्या तीनवर पोहोचली

