मुझफ्फरपूरच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अग्नितांडव; भीषण आगीत चौघांचा मृत्यू
मुझफ्फरपूर येथील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) लागलेल्या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक रुग्ण आगीत जखमी झाले आहेत.

Published : June 4, 2026 at 7:49 AM IST
|Updated : June 4, 2026 at 9:56 AM IST
मुझफ्फरपूर (पाटणा)- दिल्लीमधील रेस्टॉरेंटमध्ये भीषण आगीत 21 जणांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बिहारमधील रुग्णालयात भीषण आग लागली. ही आग मुझफ्फरपूरच्या ब्रह्मपुरा भागात स्थित असलेल्या 'प्रसाद हॉस्पिटल'च्या अतिदक्षता विभागात (ICU) बुधवारी रात्री उशिरा लागली. या घटनेत 20 हून अधिक रुग्ण गंभीररित्या भाजले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आगीच्या ज्वाळा आणि धूर वर येऊ लागला, त्या क्षणी संपूर्ण रुग्णालयात एकच घबराट उडाली. अनेकांनी भीतीनं किंकाळी फोडल्या. रुग्णालयातील कर्मचारी आणि जवळच्या रहिवाशांनी तात्काळ खिडक्या फोडून जखमी रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यामुळे अनेकांचे जीव वाचविण्यात मदत झाली.
घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या (फायर टेंडर्स) वेगाने घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या देखरेखीखाली बचावकार्य सुरू आहे. सर्व जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिकांच्या साहाय्यानं मुझफ्फरपूरमधील विविध रुग्णालयांमध्ये हलवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासकीय पथक मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम करत आहे. त्याच वेळी, रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि पोलीस विभाग अतिदक्षता कक्षातील झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज घेत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किट हेच आगीचे मुख्य कारण असावे असा अंदाज आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जिल्हा प्रशासनानं रुग्णालयातील आगीचा सविस्तर तपास करण्यासाठी एका उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. स्थानिक प्रशासनानं सर्व पीडितांना योग्य ती भरपाई आणि मदत पुरवण्याचं आश्वासन दिले आहे.
बिहार: मुजफ्फरपुर के प्रसाद अस्पताल के ICU में लगी भीषण आग के कारण कई लोगों की जान चली गई। घटनास्थल पर तुरंत पहुंची दमकल की टीमों ने आग पर सफलतापूर्वक काबू पा लिया है। अब तक मिली जानकारी के अनुसार, इस घटना में तीन लोगों की मौत हुई है। अधिक जानकारी की प्रतीक्षा है: सुब्रत कुमार…
— ANI_HindiNews (@AHindinews) June 4, 2026
मुझफ्फरपूरचे जिल्हा दंडाधिकारी सुब्रत कुमार सेन यांनी तिघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. काही रुग्णांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आग लागलेल्या इमारतीबाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र, 'अतिदक्षता विभागात' (ICU) आगीची भीषणता अधिक असताना अनेक रुग्ण धूर आणि आगीच्या ज्वाळांमध्ये अडकले.अग्निशमन विभागाचे अधिकारी राम निवास पांडे यांनी सांगितलं की, प्रशासन अद्यापही या घटनेच्या संपूर्ण व्याप्तीचा आणि परिणामांचा आढावा घेत आहे. अतिदक्षता विभागात पसरलेल्या धुरामुळे आणि गुदमरल्यामुळे (asphyxiation) काही रुग्णांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या घटनेशी संबंधित सर्व तपशील गोळा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत."
'प्रसाद हॉस्पिटल' ही उत्तर बिहारमधील अग्रगण्य खाजगी आरोग्य संस्थांपैकी एक मानली जाते. या रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालय प्रशासनाकडून वेळीच योग्य ती सुरक्षा पावले उचलली गेली नाहीत, असा रुग्णालयाच्या नातेवाईकांनी आरोप केला. या दुर्घटनेमुळे रुग्णालयाचे सुरक्षा नियम (प्रोटोकॉल्स) आणि आग प्रतिबंधक उपाययोजना यांबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
हेही वाचा-

