मार्गदर्शीच्या व्यवस्थापकीय संचालिका शैलजा किरण यांना 'प्रोफेसर जे. फिलिप लीडरशिप अवॉर्ड' प्रदान!
या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शैलजा किरण यांनी हा पुरस्कार आपले सहकारी, कर्मचारी आणि कुटुंबीय यांना समर्पित केला.

Published : August 29, 2026 at 8:29 PM IST
बंगळुरू: 'मार्गदर्शी चिट फंड प्रायव्हेट लिमिटेड'च्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण यांना शनिवारी (29 ऑगस्ट) बंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या व्यावसायिक कामगिरीबद्दल 'प्रोफेसर जे. फिलिप वुमन लीडरशिप अवॉर्ड' प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी हा पुरस्कार आपले सहकारी, कर्मचारी आणि कुटुंबीय यांना समर्पित केला. तसंच प्रत्येक यश हे सामूहिक प्रयत्नांचं फळ असतं, असं त्यांनी नमूद केलं.
'XIME बंगळुरू' इथं आयोजित 'असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स'च्या 37 व्या स्थापना दिनानिमित्त 'सन्माननीय अतिथी' म्हणून भाषण करताना शैलजा किरण म्हणाल्या की, "हा पुरस्कार विशेष अर्थपूर्ण आहे, कारण तो प्रोफेसर जे. फिलिप यांचं नाव धारण करतो. ते असे शिक्षणतज्ज्ञ होते, ज्यांचा असा विश्वास होता की शैक्षणिक संस्थांनी क्षमता, चारित्र्य आणि संवेदनशीलता असलेले नेतृत्व घडवले पाहिजे." दरम्यान, 'व्यवस्थापन शिक्षणाच्या भविष्यासाठी दूरदर्शी नेतृत्वाची भूमिका' या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थी एकत्र आले होते.
उपस्थितांना संबोधित करताना शैलजा किरण म्हणाल्या की, "एआय, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळं वेगानं बदलणाऱ्या जगासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी व्यवस्थापन शिक्षण हे केवळ पारंपरिक वर्गखोल्या आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे गेले पाहिजे." याचबरोबर, त्यांनी यावर भर दिला की, शैक्षणिक संस्था केवळ आपल्या भूतकाळातील यशावर अवलंबून राहू शकत नाहीत, तर त्यांना बदलत्या जागतिक गरजांनुसार सतत जुळवून घ्यावं लागेल. सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी डिजिटल परिवर्तन आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
"तंत्रज्ञानानं लोकांना सक्षम केलं पाहिजे, त्यांची जागा घेऊ नये. व्यवस्थापन शिक्षण संस्थांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करतानाच सहानुभूती, सचोटी आणि जबाबदारी यांसारख्या मानवी मूल्यांची जोपासना केली पाहिजे," असंही शैलजा किरण म्हणाल्या. दरम्यान, वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी 12 शाखा आणि 100 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक बनण्याबाबतचा आपला अनुभव सांगताना शैलजा किरण म्हणाल्या की, "कल्पकतेमुळे नेत्यांना अशा ठिकाणीही विकासाच्या संधी दिसतात, जिथं इतरांना केवळ मर्यादाच दिसतात."
"नैतिक निर्णय घेणारे, नाविन्यपूर्ण विचार करणारे, समस्यांवर उपाय शोधणारे, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते घडवणे हा व्यवस्थापन शिक्षणाचा उद्देश असायला हवा. आजचे विद्यार्थीच उद्याचे नेते बनणार आहेत आणि त्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांवर आहे," असे शैलजा किरण म्हणाल्या. यावेळी त्यांनी नमूद केलं की, "दूरदर्शी नेतृत्व म्हणजे केवळ एखादे पद भूषवणे नव्हे. त्यासाठी शक्यता ओळखण्याचे, प्रस्थापित पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे आणि भविष्यातील आव्हानांना गतिशीलपणे सामोरे जाण्याचे धैर्य लागते," असं त्यांनी सांगितलं.
एआयमुळं माहिती सहज उपलब्ध होत असताना, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचार करणे, विश्लेषण करणे, प्रश्न विचारणे, नवनिर्मिती करणे आणि नैतिक निर्णय घेणे शिकण्यास मदत केली पाहिजे, असं शैलजा किरण यांनी सांगितलं. तसंच वाढत्या पर्यावरणीय आपत्तींच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीच्या संरक्षणासाठी अधिक संशोधन आणि निर्णायक कृती करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. वर्गातील शिक्षण आणि उद्योगांच्या अपेक्षा यांमधील तफावत अधोरेखित करत शैलजा किरण यांनी शैक्षणिक संस्थांना इंटर्नशिप, प्रत्यक्ष प्रकल्प आणि उद्योगांकडून मिळणारे मार्गदर्शन यांचा विस्तार करण्याचं आवाहन केलं. भारताच्या स्टार्टअप चळवळीनं हे दाखवून दिलं आहे की, तरुण लोक साध्या कल्पनांचे रूपांतर व्यापक सामाजिक मूल्य असलेल्या उद्योगांमध्ये कसे करू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
ओमकार सिंग बत्रा, सॅम सांगी आणि अद्वैत ठाकूर यांसारख्या तरुण नवोन्मेषकांचा उल्लेख करत शैलजा किरण सांगितलं की, उद्योजकतेमध्ये धैर्य, चिकाटी आणि सर्जनशीलता हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसंच त्यांनी विनिषा उमाशंकरचाही उल्लेख केला. जिनं कोळशावर चालणाऱ्या इस्त्रीचा वापर करणाऱ्या धोब्यांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा अभ्यास केल्यानंतर सौरऊर्जेवर चालणारे फिरते इस्त्रीचे वाहन विकसित केले. "जेव्हा विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि नवनिर्मिती करण्यास प्रोत्साहित केले जाते, तेव्हा छोट्या समस्यांतूनही महत्त्वपूर्ण उपाय आणि शाश्वत व्यवसाय मॉडेल्स निर्माण होऊ शकतात," असंही शैलजा किरण म्हणाल्या.
नैतिक नेतृत्वावर भर देत, शैलजा किरण यांनी नमूद केलं की, नैतिकतेशिवाय मिळणारे यश अल्पजीवी असते. सचोटीमुळे विश्वास निर्माण होतो, विश्वासातून संबंध दृढ होतात आणि संबंधांतूनच संस्था व राष्ट्रे उभी राहतात. नेतृत्व हे तुमच्या हाताखाली किती लोक काम करतात यावरून मोजले जात नाही, तर तुमच्यामुळं किती लोकांचा विकास होतो, यावरून मोजले जाते. महान नेते केवळ अनुयायी नाही, तर आणखी नेते घडवतात, असंही शैलजा किरण यांनी सांगितलं.
याचबरोबर, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांना निर्भयपणे स्वप्ने पाहण्याचे, प्रामाणिकपणे काम करण्याचे, सतत शिकत राहण्याचे आणि आपल्या पालकांचा व शिक्षकांचा आदर करण्याचं आवाहन शैलजा किरण यांनी केलं. दरम्यान, कार्यक्रमावेळी 'नॅक'च्या (NAAC) कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रा. नागेश्वर राव तसंच 'चंद्र ग्रुप' आणि 'जीआरजी ट्रस्ट'च्या (GRG Trust) व्यवस्थापकीय संचालिका व संस्थापक विश्वस्त आणि 'सीआयआय'च्या (CII) 'ग्लोबल लीडरशिप कौन्सिल' व 'हायर एज्युकेशन कौन्सिल'च्या सह-अध्यक्षा नंदिनी रंगास्वामी या देखील उपस्थित होत्या.
हेही वाचा :
- PM नरेंद्र मोदी 4 दिवसीय परदेश दौऱ्यासाठी रवाना; म्हणाले, "दहशतवादमुक्त प्रदेशाचं स्वप्न साकार करणं, हे आमचं ध्येय"
- नेपाळ पूर अपडेट : अखेर महाराष्ट्रातील भाविकांचा परतीचा प्रवास सुरू; दोन विशेष रेल्वे बोगींची व्यवस्था
- मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेनंतर व्यासपीठाचं शुद्धीकरण; राहुल गांधी आक्रमक, भाजपा-आरएसएसवर साधला निशाणा

