महाराष्ट्र TET पेपरफुटी प्रकरण: मुख्य सूत्रधाराचा बिहारशी संबंध; अनेक राज्यांत पोलिसांचे छापे
भिवंडी पोलीस ठाण्यातील एक पथक या टोळीच्या सूत्रधारांचे आणि यात सामील असलेल्या 'सॉल्व्हर गँग'चे (पेपर सोडवून देणाऱ्या टोळीचे) आंतरराज्यीय जाळे उघडकीस आणण्यासाठी काम करीत आहे.


Published : June 29, 2026 at 4:51 PM IST
समस्तीपूर: महाराष्ट्र TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शन समोर आलंय. या हाय प्रोफाईल प्रकरणात बिहारशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई सुरू केलीय. भिवंडी पोलीस ठाण्यातील (महाराष्ट्र) एक पथक या टोळीच्या सूत्रधारांचे आणि यात सामील असलेल्या 'सॉल्व्हर गँग'चे (पेपर सोडवून देणाऱ्या टोळीचे) आंतरराज्यीय जाळे उघडकीस आणण्यासाठी काम करीत आहे. कथित मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी बिहार, हरियाणा, आग्रा आणि दिल्ली येथे छापे टाकले जात आहेत.
टोळीचा पर्दाफाश कसा झाला? : 27 जून रोजी भिवंडी पोलिसांचे उपायुक्त पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पोलिसांना 'शिक्षक पात्रता परीक्षा' (TET) प्रश्नपत्रिकेसाठी सुमारे 1.5 कोटी रुपयांचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस विभागाने त्वरित एक विशेष पथक तयार केले आणि सापळा रचला, ज्यामुळे या मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला. "या कारवाईत राजीव साव, आकाश कुमार आणि धीरज सिंग यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे चार संच जप्त करण्यात आले," अशी माहितीही पवन बनसोड यांनी दिलीय.
मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ताबाबत माहिती : अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पाटणा (बिहार) येथील रहिवासी असलेल्या राजीव शाह आणि आकाश कुमार (उर्फ सूरज सिंग) यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पोलिसांनी पानिपत (हरियाणा) येथील रहिवासी धीरज सिंग यालाही अटक केली. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत.
बिहार आणि इतर राज्यांत छापे : तिन्ही आरोपींच्या चौकशीतून पेपरफुटीमागील कथित मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याच्याबद्दल माहिती मिळाली. पोलीस त्याच्या अटकेसाठी सक्रिय प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलिसांचे एक पथक त्याला शोधण्यासाठी समस्तीपूर (बिहार) येथे छापे टाकत आहे.
विजेंद्र गुप्ता समस्तीपूरचा रहिवासी : बालेश्वर साह यांचा मुलगा असलेला विजेंद्र गुप्ता हा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरपूर गावाचा रहिवासी आहे. तो एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येतो. विजेंद्रचे इतर तीन भाऊ समस्तीपूरमधील स्थानिक 'मऊ' (Mau) बाजारपेठेत छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याचे वडील आणि भाऊ गावातच राहतात. सर्वात मोठा भाऊ बमबम साह हा माऊ बाजारपेठेत पिठाची गिरणी आणि मोहरीच्या तेलाचा कारखाना चालवतो. दुसरा भाऊ रामू साह त्याच बाजारपेठेत किराणा मालाचे छोटे दुकान चालवतो. तिसरा भाऊ जितेंद्र साह त्यांच्या घरासमोरच पिठाची गिरणी आणि तेल काढण्याचा व्यवसाय सांभाळतो.
समस्तीपूर ते बेगुसराय आणि त्यानंतर तुटलेला संपर्क : कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विजेंद्रचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. 2003 नंतर तो उच्च शिक्षणासाठी बेगुसरायला गेला. बेगुसरायला गेल्यानंतर त्याचा कुटुंबाशी असलेला संपर्क हळूहळू पूर्णपणे तुटला. तो अनेक वर्षांपासून गावी परतला नव्हता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. "माझा मुलगा पुढील शिक्षणासाठी जात असल्याचे सांगून घरून गेला होता. बाहेर तो नेमके काय काम करायचा, हे आम्हाला कधीच समजले नाही. पेपर फुटीसारख्या गंभीर घटनेत त्याचे नाव समोर आल्याने कुटुंब अत्यंत व्यथित आहे," असंही विजेंद्र गुप्ता यांचे वडील बालेश्वर साह म्हणालेत.
विजेंद्रची गुन्हेगारी पार्श्वभूमी : पोलीस नोंदींवरून असे दिसून येते की, विजेंद्र गुप्ताची गुन्हेगारी पार्श्वभूमी जुनी आहे. 2003 मध्ये त्याचे नाव एका हाय प्रोफाइल हत्या प्रकरणाशी जोडले गेले होते. त्यानंतर तो विविध राज्यांमध्ये परीक्षांमध्ये फेरफार करणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य बनला. पेपर फुटीच्या बेकायदेशीर धंद्याबाबत तपास यंत्रणांच्या नोंदींमध्ये त्याचे नाव यापूर्वीच आले होते.
अनेक राष्ट्रीय परीक्षांमध्ये सहभाग : बिहार शिक्षक भरती परीक्षा, ओडिशा स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) परीक्षा आणि NEET-UG यांसारख्या अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षांच्या पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये विजेंद्र गुप्ताचे नाव समोर आलंय. या प्रकरणांमध्ये त्याने मुख्य सूत्रधार म्हणून काम केले. त्याच्या सुनियोजित कार्यपद्धतीमुळे तपास यंत्रणाही थक्क झाल्या आहेत.
मुख्य आरोपी जामिनावर बाहेर होता : तपास अहवालानुसार, ओडिशा SSC पेपर फुटी प्रकरणात विजेंद्र गुप्ताला 28 जुलै 2023 रोजी पहिल्यांदा अधिकृतपणे अटक करण्यात आली होती. त्या गंभीर प्रकरणात त्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला होता आणि तो बाहेर होता. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काही काळातच महाराष्ट्र TET पेपर फुटी प्रकरणात त्याचे नाव समोर आले आहे.
हे प्रकरण कशाशी संबंधित आहे : हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र टीईटी (TET) 2026 शी संबंधित आहे. ही परीक्षा 28 जून रोजी होणार होती. 27 जून रोजी भिवंडी पोलिसांना अशी गुप्त माहिती मिळाली की, आरोपी दिल्लीहून थेट भिवंडीत प्रश्नपत्रिकांचे चार संच घेऊन आले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका खऱ्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली.
हेही वाचाः
लग्नाला दिला नकार, तरुणानं जेवणासाठी बोलावून गर्लफ्रेंडची केली हत्या
नोएडामध्ये इमारतीच्या 21 व्या मजल्यावर एसीच्या स्फोटामुळं लागली आग, कुटुंबाची सुखरूप सुटका

