असाही लळा! पाळीव श्वानाच्या आजारपणामुळे दोन बहिणींची आत्महत्या, श्वानाचाही मृत्यू
पाळीव जर्मन शेफर्ड टोनीच्या आजारपणामुळे लखनऊमधील दोन बहिणींनी आत्महत्या केली होती, आता त्या श्वानाचाही मृत्यू झाला आहे.

Published : December 27, 2025 at 6:39 PM IST
लखनऊ : श्वानांची इमानदारी जगात प्रसिद्ध आहे. त्यांच्या इमानदारीच्या अनेक कथा आणि वदंता प्रसिद्ध आहेत. मात्र त्याच श्वानाच्याबद्दल अतिव प्रेमापोटी कुणी आत्महत्या करेल का... हो, अशी घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडली आहे. माणूस आणि श्वानाच्या भावनिक बंधाची अशी एक विचित्र कहाणी समोर आली आहे. लखनऊच्या पारा भागातील दोन बहिणींनी २४ डिसेंबरला आत्महत्या केली कारण त्यांचा प्रिय पाळीव श्वान टोनी (जर्मन शेफर्ड) आजारातून बरा होत नव्हता.
त्या बहिणींना श्वानाचे दुःख सहन होत नव्हते, म्हणून त्यांनी स्वतःचे जीवन संपवले. टोनी, मुका श्वान देखील ते सहन करू शकला नाही आणि घटनेच्या तीन दिवसांनी शनिवारी त्याचाही मृत्यू झाला. त्यांचा नऊ वर्षांचा सहवास कायमचा संपला.
आपल्या मालकाचे प्राण गेल्यानंतर मान टाकणाऱ्या श्वानांच्या कथा राजा महाराजांच्या काळात घडल्याची उदाहरणं आहेत. मात्र आधुनिक काळात माणूस आणि मुक्या प्राण्यामधील भावनिक बंधाची ही कहाणी लखनऊच्या पारा परिसरातील जलालपूर गावातील आहे. या गावातील रहिवासी राधा (२७) आणि जिया (२४) यांनी २४ डिसेंबरला केवळ त्यांचा पाळीव श्वान टोनी गंभीर आजारी असल्याने आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी, बहिणींनी त्यांच्या आई गुलाब देवी यांना सांगितलेले शेवटचे शब्द होते, "आम्ही मेल्यानंतर टोनीला घराबाहेर काढू नका; त्याच्यावर उपचार करा." कुटुंब त्यांच्या मुलींच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी टोनीवर उपचार करत होते, परंतु पोटाच्या गंभीर आजारामुळे आणि त्याच्या मालकिणीला गमावल्याच्या दुःखामुळे, टोनीनंही प्राण सोडले
पारा पोलीस स्टेशन हद्दीतील जलालपूर गावातील प्रत्येकाला या घटनेने धक्का बसला आहे. ज्याप्रमाणे कुटुंबाने राधा आणि जिया यांचे अंतिम संस्कार केले, त्याचप्रमाणे आता टोनीचे अंत्यसंस्कार त्याच पद्धतीने केले जातील.
आई गुलाब देवी यांनी सांगितलं की, राधा आणि जिया नऊ वर्षांपूर्वी टोनीला घरी घेऊन आल्या होत्या, जेव्हा तो फक्त एक महिन्याचा होता. दोन्ही बहिणींनी त्याला स्वतःच्या मुलांसारखं वागवलं. तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेहमीच त्यांच्यासोबत असायचा. गेल्या महिन्याभरात टोनीची प्रकृती खालावली. सर्व उपचार करूनही जेव्हा तो बरा झाला नाही, तेव्हा त्या बहिणी खूप नैराश्यात गेल्या आणि त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
पोस्टमार्टमनंतर दोन्ही बहिणींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत, असं निरीक्षक पारा सुरेश सिंह यांनी सांगितलं. या घटनेचं मुख्य कारण पाळीव प्राण्याबद्दलची त्यांची अतिरेकी ओढ आणि त्याच्या आजाराबद्दलचे दुःख हे उघड झालं आहे.
टीप - आत्महत्या हा उपाय नाही : जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल, किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच कोणीतरी आहे. स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा आयकॉल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन 9152987821 वर कॉल करा (सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध).
हेही वाचा...

