ETV Bharat / bharat

कर्नाटकातील कॅबिनेट मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा

शुक्रवारी बी. नागेंद्र यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी बंगळुरूमध्ये एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

karnataka minister b nagendra resigns from cabinet
कर्नाटकातील कॅबिनेट मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 28, 2026 at 7:27 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री बी. नागेंद्र यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बी. नागेंद्र हे कर्नाटकातील बेल्लारी ग्रामीणचे आमदार आहेत. ते राज्य सरकारमध्ये नियोजन आणि सांख्यिकी मंत्री होते. शुक्रवारी (28 ऑगस्ट) बी. नागेंद्र यांनी आपल्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी बंगळुरूमध्ये एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

स्वेच्छेनं मंत्रीपदाचा राजीनामा : "आज मी स्वेच्छेनं मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे," असं बी. नागेंद्र यांनी भावूक होत सांगितलं. तसंच त्यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केल्याचं सांगितलं. "देशातील एखाद्या आदिवासी व्यक्तीनं प्रगती करावी असं मनुवाद्यांना वाटत नव्हतं, म्हणूनच त्यांनी मला लक्ष्य केलं," असा आरोपही यावेळी बी. नागेंद्र यांनी केला. याचबरोबर, आमदारपदाचा राजीनामा देऊन 'जनता न्यायालयात' जाण्यास देखील आपण तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मनी लाँड्रिंगचे आरोप : दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात बी. नागेंद्र यांच्या पुनरागमनामुळं पूर्वी विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला होता. बी. नागेंद्र यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळं विरोधी पक्ष भाजपा आणि जनता दल (सेक्युलर) यांनी विरोध केला होता. कारण बी. नागेंद्र यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप आहेत, ज्यात महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातून जवळपास 90 कोटी रुपयांच्या कथित चोरीचा समावेश आहे. या प्रकरणाची माहिती सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी देखील दिला होता राजीनामा : बी. नागेंद्र यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळं विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सरकारवर निशाणा साधला होता. गेल्या सोमवारी आर. अशोक यांनी काँग्रेस सरकार बी. नागेंद्र यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विधानसभेत अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, मनी लाँड्रिंगच्या मुद्द्यावरून बी. नागेंद्र यांनी दोन वर्षांपूर्वी देखील मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

हेही वाचा :

  1. पश्चिम बंगालमध्ये होर्डिंग हटवण्यावरून वाद : अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओ'ब्रायन यांच्याविरोधात एफआयआर, 13 जणांना अटक
  2. नेपाळमधील पुरामुळे दिल्ली-काठमांडू 'भारत-नेपाळ मैत्री बस सेवा' स्थगित; डीटीसीने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
  3. रक्षाबंधनानिमित्त शाळकरी मुलींनी PM नरेंद्र मोदींना बांधली राखी!