ETV Bharat / bharat

भाजपा आमदार लाचखोरी प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात; कंत्राटदाराकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

लोकायुक्त पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमदार चंद्रू लमाणी यांनी एका कंत्राटदाराकडून 1 कोटी रुपयांचं कंत्राट मिळवून देण्यासाठी ११ लाख रुपये कमिशन मागितलं होतं.

आमदार डॉ चंद्रू लमाणी आणि लोकायुक्त अधिकारी रुग्णालयाजवळ
आमदार डॉ चंद्रू लमाणी आणि लोकायुक्त अधिकारी रुग्णालयाजवळ (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 21, 2026 at 6:49 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बेंगळुरू : भाजपासाठी मोठी पंचाईत करणारी शरमेची बातमी आहे. कर्नाटकातील पक्षाच्या आमदाराला कर्मचाऱ्यामार्फत ५ लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलं. शनिवारी लोकायुक्त पोलिसांनी त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांमार्फत एका कंत्राटदाराकडून ५ लाख रुपयांचे कमिशन स्वीकारताना पकडलं.

कंत्राटदार विजय पुजार यांच्या तक्रारीवरून लोकायुक्त पोलिसांनी लक्ष्मेश्वर शहरातील एका रुग्णालयात त्यांच्या मालकीच्या ठिकाणी पकडलं. आमदारांचे स्वीय सहाय्यक गुरु आणि मंजुनाथ यांनाही रोख रक्कम स्वीकारल्याबद्दल ताब्यात घेतलं आहे. आता तिघांचीही गदग येथील लोकायुक्त एसपी चौकशी करत आहेत. या प्रकरणी संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. तसंच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती लोकायुक्त पोलिसांच्याकडून देण्यात आली आहे.

लोकायुक्त पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पहिल्यांदाच आमदार झालेले आणि व्यवसायाने डॉक्टर असलेले आमदार चंद्रू लमाणी यांनी रस्ता आणि पुलाच्या रिटेन्शन वॉलच्या बांधकामाचं कंत्राट मिळवून देण्यासाठी पुजारकडून ११ लाख रुपयांचं कमिशन मागितल्याचं वृत्त आहे. हा करार १ कोटी रुपयांचा होता.

कमिशनच्या मागणीकडे दुर्लक्ष करून, कंत्राटदारानं लोकायुक्त पोलिसांकडे संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली, त्यानंतर सापळा रचण्यात आला. योजनेनुसार, पुजारने कमिशन देण्यास सहमती दर्शविली आणि लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला, तेव्हा ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता आमदाराच्या पीएला रुग्णालयात सुपूर्द करण्यात आला.

आमदार चंद्रू लमाणी हे कर्नाटकातील दुसरे विद्यमान भाजपा आमदार आहेत ज्यांना लोकायुक्त पोलिसांनी लाच घेताना रंगेहाथ पकडलंय. २००९ मध्ये, कोलार गोल्ड फील्ड्स (केजीएफ) चे तत्कालीन आमदार एन. संपांगी यांना जमिनीच्या वादात एका व्यावसायिकाकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. संपांगी यांना बेंगळुरूमधील विधिमंडळ सभागृहातून अटक करण्यात आली.

हेही वाचा...

  1. मंत्री नरहरी झिरवाळांच्या दालनात लिपिकाला लाच घेताना अटक; झिरवाळ म्हणाले, "चौकशीत माझं नाव आलं तर राजीनामा देईन"
  2. उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचार उघड, तीन अधिकारी अटकेत, भाजपाने केली मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी