ETV Bharat / bharat

जिओ पेमेंट्स बँकेकडून NH-48 वरील मनोहरपुरा टोल प्लाझावर बॅरिअर-फ्री टोलिंग प्रणाली सुरू

दिल्ली-जयपूर महामार्गावरील प्रवास आता टोल प्लाझावर न थांबता करता येणार आहे. जिओ पेमेंट्स बँक मल्टी-लेन फ्री फ्लो टोलिंग सेवा देत आहे.

NH-48 वरील मनोहरपुरा टोल प्लाझा
NH-48 वरील मनोहरपुरा टोल प्लाझा (NHAI X handle)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 2, 2026 at 7:16 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील जिओ पेमेंट्स बँक लिमिटेड (JPBL) ने राजस्थानातील राष्ट्रीय महामार्ग-48 (NH-48) वरील मनोहरपुरा टोल प्लाझावर FASTag आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) तंत्रज्ञानावर आधारित मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोलिंग प्रणाली सुरू केली आहे. या नव्या व्यवस्थेमुळे वाहनांना टोल प्लाझावर न थांबता सहज प्रवास करता येणार असून वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे.

जिओ पेमेंट्स बँक लिमिटेड ही जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (JFSL) ची उपकंपनी आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) ने जिओ पेमेंट्स बँकेला भारतातील पायलट मल्टी-लेन फ्री फ्लो टोलिंग प्रकल्पासाठी करार दिला होता. या कराराअंतर्गत गुरुग्राम-जयपूर मार्गावरील शाहजहांपूर आणि मनोहरपुरा टोल प्लाझांवरील टोल प्रक्रिया व्यवस्थापनाची जबाबदारी बँकेकडे सोपविण्यात आली आहे.

मनोहरपुरा टोल प्लाझावर या सेवेला सुरुवात होणे ही जिओ पेमेंट्स बँकेसाठी महत्त्वाची कामगिरी असून स्मार्ट आणि आधुनिक पायाभूत सुविधांशी निगडित डिजिटल आर्थिक सेवा प्रभावीपणे राबविण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे. दिल्ली-जयपूर या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील मनोहरपुरा टोल प्लाझा आता पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, दरवर्षी सुमारे ८८ लाख वाहनांची टोल प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय हाताळण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.

या मार्गावर जिओ पेमेंट्स बँक शाहजहांपूर ते मनोहरपुरा सुमारे 100 किलोमीटर आणि मनोहरपुरा ते दौलतपूर ३४ किलोमीटर अशा सलग कॉरिडॉरवरील टोल व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहे. मल्टी-लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली ही भारतातील राष्ट्रीय महामार्गांवर बॅरिअरविरहित आणि अखंड वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रणालीमध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे वाहनाची ओळख, त्याचे वर्गीकरण आणि टोल शुल्क आकारणी वाहनाच्या नियमित वेगातच केली जाते. परिणामी वाहनांना थांबण्याची किंवा वेग कमी करण्याची आवश्यकता राहत नाही.

या प्रणालीमुळे प्रवासाचा वेळ कमी होणे, इंधनाची बचत, वाहनांचा अधिक कार्यक्षम वापर आणि मालवाहतुकीचा वेग वाढणे असे अनेक आर्थिक लाभ अपेक्षित आहेत. त्यामुळे लॉजिस्टिक्स खर्च कमी होऊन देशाची स्पर्धात्मक क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासालाही चालना मिळेल. जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद ईश्वरन म्हणाले, “मनोहरपुरा टोल प्लाझावर मल्टी-लेन फ्री फ्लो टोलिंग सेवेला सुरुवात होणे हा जिओ पेमेंट्स बँकेसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे भारतातील डिजिटल मोबिलिटी पेमेंट्स क्षेत्रात आमची भूमिका अधिक बळकट होईल. देशातील महामार्ग वेगाने डिजिटल होत असताना प्रवाशांचा अनुभव अधिक सहज आणि सुरक्षित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टोलिंग उपाय उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.” ते पुढे म्हणाले, “बॅरिअर-फ्री टोलिंगमुळे वाहने न थांबता प्रवास करू शकतील, वाहतूक कोंडी कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि मालवाहतूक अधिक वेगवान व कार्यक्षम बनेल. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन देशाची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.”

या प्रकल्पाच्या संकल्पनेपासून अंमलबजावणी आणि संचालनापर्यंत जिओ पेमेंट्स बँकेने जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड यांच्या सहकार्याने काम केले आहे. या प्रकल्पात जिओ प्लॅटफॉर्म्सने मुख्य प्रकल्प व्यवस्थापकाची भूमिका बजावली असून टेक्सिडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी आवश्यक सॉफ्टवेअर प्रणाली आणि अत्याधुनिक तांत्रिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.

जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि बिझनेस युनिट प्रमुख (Transportation, Traffic & Tolling) म्हणाले, “भारतामध्ये मल्टी-लेन फ्री फ्लो टोलिंगची सुरुवात ही केवळ नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार नसून देशाच्या वाहतूक व्यवस्थेतील मोठा बदल आहे. डिजिटलदृष्ट्या सक्षम, अधिक कार्यक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक परिवहन व्यवस्था उभारण्याच्या भारत सरकारच्या उद्दिष्टाला ही प्रणाली बळ देईल.”

ते पुढे म्हणाले, “भारत आता बॅरिअर-फ्री टोलिंग आणि भविष्यात ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) आधारित ‘जितका वापर तितके शुल्क’ (Pay-per-use) या रोड प्राइसिंग मॉडेलकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत डिजिटल कनेक्टिव्हिटी, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि सुरक्षित पेमेंट प्लॅटफॉर्म यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिओचे देशव्यापी डिजिटल नेटवर्क, क्लाउड आणि एज कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्लॅटफॉर्म आणि नव्या पिढीतील उपकरणांच्या बळावर हा बदल यशस्वी करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.”

या प्रकल्पामुळे जिओ पेमेंट्स बँक आणि तिची भागीदार यंत्रणा देशभरात बॅरिअर-फ्री टोलिंग प्रणाली आणि भविष्यातील GNSS आधारित रोड प्राइसिंग उपक्रमांच्या विस्तारासाठी सक्षम झाली आहे. यामुळे भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना बळकटी मिळण्यासह अधिक सुरक्षित, स्मार्ट, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम परिवहन व्यवस्था विकसित होण्यास मदत होईल.

हेही वाचा...

  1. जियो कॉल एजंट: फोन कॉलमध्येच AI चा जादूई साथीदार
  2. जियो ओटीटी पास भारतात लॉंच: 15 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, 1000+ लाइव्ह टीव्ही चॅनेल्स आणि 30 जीबी डेटासह फक्त 200रुपयात!