झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा मनालीत संशयास्पद मृत्यू, होमस्टेमध्ये आढळला वीर सोरेन यांचा मृतदेह
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे नातू वीर सोरेन यांचं अचानक निधन झालंय. हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथं ही घटना घडली. ते मित्रांसोबत फिरायला गेले होते.

Published : February 25, 2026 at 11:01 AM IST
कुल्लू: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या कुटुंबाकडून अतिशय दुःखद बातमी आली आहे. त्यांचा 19 वर्षांचा नातू वीर सोरेन यांचा हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. वीर सोरेन परदेशात शिक्षण घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, वीर सोरेन मंगळवारी (24 फेब्रुवारी) त्यांच्या मित्रांसह कुल्लूला फिरायला गेले होते. स्नो स्केटिंगचा आनंद घेतल्यानंतर ते होम स्टेमध्ये परतले. पण यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पोलिसांनी काय सांगितलं? : वास्तिवक, मनालीच्या एका होमस्टेमध्ये वीर सोरेन यांचा मृतदेह सापडला. ते आपल्या मित्रांसह पर्यटनासाठी मनालीला गेले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, वीर सोरेन आपल्या मित्रांसह सिमसा येथील एका होमस्टेमध्ये राहात होते. 23 फेब्रुवारी रोजी सर्व मित्र सोलंग आणि सेथन परिसराला फिरायला गेले होते. पण डोकं दुखत असल्यानं वीर मित्रांसोबत गेले नव्हते. सर्व मित्र रात्री सुमारे 12:30 वाजता होमस्टेमध्ये परतले. तेव्हा वीर सोरेन झोपलेले होते. मित्रांनी त्यांना उठवलं. पण त्यांनी डोक्यात वेदना होत असल्याचं सांगितलं. यानंतर मित्रांनी ऑनलाइन औषध मागवून दिलं, त्यानंतर ते पुन्हा झोपी गेले. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी सुमारे 2 वाजता खोलीतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. मित्रांनी आत पाहिलं असता वीर सोरेन बेडवरून खाली पडलेले आढळले.
'रुग्णालयात नेताना तोंडावाटे फेस आला' : वीर सोरेन यांना मित्रांनी तत्काळ मनालीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात नेताना त्याच्या तोंडातून फेस येत होता, असं मित्रांनी सांगितलं. डॉक्टरांनी रुग्णालयात दीर्घ वेळ CPR दिला, पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत. मनाली पोलिसांना रुग्णालयाकडून माहिती मिळाली आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासणीत मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमांचे व्रण आढळले नाहीत.
मनालीचे डीएसपी के. डी. शर्मा यांनी सांगितलं की, 'घटनेच्या सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जात आहे आणि अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समजेल. कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे आणि पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह त्यांना सुपूर्द केला जाईल.'

