ETV Bharat / bharat

भारतीयांनो परिस्थिती बिघडली लवकरात लवकर इराण सोडा, दुतावासाकडून मार्गदर्शक सूचना जारी

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव सातत्यानं वाढत आहे. अशा स्थितीत इराणमधील भारतीय दूतावासानं एक सूचना जारी केलीय, ज्यामध्ये भारतीयांना इराण सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Iran
इराणमध्ये निदर्शने (AP)
author img

By ANI

Published : February 23, 2026 at 5:09 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : इराणमधील बिघडत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना तो देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं उपलब्ध सर्व वाहतूक साधनांचा, तसेच व्यावसायिक विमानसेवेचा उपयोग करून तातडीनं इराणमधून बाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भारतीय दूतावासानं जारी केली अ‍ॅडव्हायजरी : तेहरानसह विविध भागांत नव्यानं सुरू झालेल्या आंदोलनांमुळे आणि इराणवर संभाव्य अमेरिकन लष्करी कारवाईच्या वाढत्या शक्यतेमुळे भारतीय दूतावासानं ही नवी मार्गदर्शक सूचना (अ‍ॅडव्हायजरी) जारी केली आहे. इराणमधील अनेक विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं असून, मागील महिन्यात आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कठोर कारवाईनंतर हे पहिलं मोठं आंदोलन आहे. जानेवारीतील अधिकृत अंदाजानुसार, विद्यार्थ्यांसह 10 हजारांहून अधिक भारतीय नागरिक इराणमध्ये वास्तव्यास आहेत.

'तत्काळ इराण सोडावं' : दूतावासानं 5 जानेवारी रोजी जारी केलेल्या सूचनेचा पुनरुच्चार करत म्हटलं आहे की, इराणमध्ये असलेले भारतीय नागरिक, विद्यार्थी, यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटकांनीयांन उपलब्ध सर्व वाहतूक साधनांचा वापर करून इराण सोडावं. तसेच सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींनी (PIO) दक्षता बाळगावी, आंदोलन किंवा मोर्चे सुरू असलेल्या भागांपासून दूर राहावं आणि दूतावासाशी सतत संपर्कात राहावं, असंही आवाहन करण्यात आलं आहे.

अ‍ॅडव्हायजरीमध्ये इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीयांनी आपले पासपोर्ट, ओळखपत्र तसेच प्रवास आणि स्थलांतराशी संबंधित कागदपत्रं नेहमी जवळ बाळगावीत, असेदेखील नमूद करण्यात आलं आहे. कोणतीही मदत आवश्यक असल्यास भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

  • +98 912 810 9115
  • +98 912 810 9109
  • +98 912 810 9102
  • +98 993 217 9359

याशिवाय, तुम्ही cons.tehran@mea.gov.in या ईमेलद्वारे देखील संपर्क साधू शकता.

इराणमधील परिस्थिती: जानेवारी 2026 मध्ये इराणमध्ये देशव्यापी निदर्शनांमध्ये हजारो लोक मारले गेले. अशा स्थितीत सरकारनं कठोर कारवाई केली. फेब्रुवारी 2026 मध्ये विद्यापीठं पुन्हा सुरू झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू केली. तेहरान, मशहाद आणि इतर शहरांमध्ये निदर्शने होत आहेत, ज्यामुळे सुरक्षा दलांशी संघर्ष सुरू झाला.

अमेरिका-इराण तणाव : अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत आहे. अमेरिकेचे लष्करी सैन्य या प्रदेशात जमा होत आहे आणि ट्रम्प प्रशासनाकडून संभाव्य हल्ल्यांची भीती आहे. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या हल्ल्यांच्या भीतीमुळे हा सल्ला देण्यात आला आहे.

मागील सूचना : 5 जानेवारी रोजी परराष्ट्र मंत्रालयानं अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. 14 जानेवारी रोजी दूतावासानं सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. आता, फेब्रुवारीमध्ये, परिस्थिती बिघडल्यामुळे 'तत्काळ इराण सोडा' असं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा