ETV Bharat / bharat

अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्यानं घुसखोरी केल्याचं वृत्त खोटं आणि निराधार : भारतीय लष्कर

रुणाचल प्रदेशात चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीनं (पीएलए) अतिक्रमण करून तळ उभारल्याच्या प्रसारमाध्यमांमधील काही वृत्तांचं भारतीय लष्करानं खंडन केलं.

Indian Army
भारतीय लष्कर (File Photo - ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 30, 2026 at 3:37 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : चिनी सैन्यानं भारतीय हद्दीत लष्करी तळ उभारल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात आला होता. यावर भारतीय लष्करानं भाष्य केलं आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेशात चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीनं (पीएलए) अतिक्रमण करून तळ उभारल्याच्या प्रसारमाध्यमांमधील काही वृत्तांचं भारतीय लष्करानं सोमवारी खंडन केलं. तसंच अशी वृत्त खोटी आणि निराधार असल्याचं म्हटलं आहे.

भारतीय लष्करानं सांगितलं की, "अरुणाचल प्रदेशात चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीनं (पीएलए) अलीकडेच अतिक्रमण करून तळ उभारल्याचं काही माध्यमांतील वृत्त आम्ही पाहिलं आहे. ही वृत्ते खोटी आणि निराधार आहेत." दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात गेल्या महिन्यात बीजिंग इथं भारत-चीन सीमा प्रकरणांवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्यप्रणालीची (WMCC) 35 वी बैठक झाली. परराष्ट्र मंत्रालयानं नंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ही चर्चा रचनात्मक आणि भविष्याभिमुख होती.

याचबरोबर, दोन्ही बाजूंनी भारत-चीन सीमावर्ती भागातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि सीमावर्ती भागात शांतता व सुव्यवस्था राखण्यात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं, ज्यामुळं द्विपक्षीय संबंध हळूहळू सामान्य होण्यास हातभार लागला आहे. दोन्ही बाजूंनी सीमांकन, सीमा व्यवस्थापन, यंत्रणांची स्थापना आणि सीमापार सहकार्य यासंबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा केली. भारतीय बाजूनं सीमापार नद्यांवरील पुढील तज्ज्ञ स्तरावरील यंत्रणेची बैठक लवकरात लवकर घेण्याच्या गरजेवर भर दिला. आज सेवानिवृत्त होत असलेले लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, "चीन सीमेवरील परिस्थिती स्थिर आहे. मात्र, ती अद्याप संवेदनशील आहे, त्याकडे सतत निरीक्षण करणं आवश्यक आहे. तसंच गैरसमज टाळण्यासाठी आणि नियमित सीमा समस्यांचं निराकरण करण्यासाठी दोन्ही लष्कर दरवर्षी 1100 हून अधिक भू-स्तरीय चर्चा करतात," असंही ते म्हणाले.

एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, "सैन्यमाघारीच्या करारामुळं जमिनीवरील स्थिरता सुधारण्यास लक्षणीय मदत झाली आहे आणि दोन्ही बाजू एकमेकांच्या चिंतांना अधिक प्रतिसाद देत असल्याचं दिसून येत आहे. तसंच संपूर्ण परिस्थिती सुस्थापित प्रणालींद्वारे हाताळली जात आहे. जेव्हा कधी एलएसीबद्दलच्या भिन्न धारणांमुळं स्थानिक समस्या निर्माण होतात, तेव्हा त्या मिलिट्री-टू-मिलिट्री चर्चा, हॉटलाइन, फ्लॅग मीटिंग्ज आणि कमांडर-स्तरीय चर्चेद्वारे सोडवल्या जातात. या प्रणालींमुळं सीमावर्ती भागांमध्ये स्थिरता सुनिश्चित करण्यास आणि गस्त घालणं व इतर स्थानिक संवाद यांसारख्या नियमित उपक्रमांना सुलभ करण्यास मदत झाली आहे."

पुढं जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं की, "भारतीय लष्कराचे प्राधान्यक्रम स्पष्ट आहेत. पहिले म्हणजे, आपण LAC वर शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. दुसरे म्हणजे, आम्ही संवाद आणि स्थापित यंत्रणांद्वारे स्थानिक प्रश्न सोडवू इच्छितो. तिसरे म्हणजे, कोणत्याही संभाव्य धोक्याला रोखण्यासाठी आम्ही एक मजबूत आणि विश्वासार्ह तैनाती स्थिती कायम ठेवण्यास कटिबद्ध आहोत. याचबरोबर, आम्ही उत्तर सीमेवर पायाभूत सुविधा, दळणवळण, निगराणी क्षमता आणि एकूणच ऑपरेशनल सज्जता अधिक मजबूत करत राहू."

हेही वाचा :

  1. आयआयटी अभियंत्याकडून बनावट नोटांची छपाई, छापा टाकताच पोलीसही चक्रावले!
  2. महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी अटक; मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याच्या पत्नीला पाटण्यात ठोकल्या बेड्या
  3. 'ऑपरेशन अमिस्ताद': व्हेनेझुएलामध्ये मृतांचा आकडा 1700 च्या वर; भारताकडून मदतकार्यात वाढ