आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप
पतीनं हुंड्याची मागणी करून मुलीचा छळ केल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केला आहे.

Published : December 2, 2025 at 4:03 PM IST
ताडेपल्ली (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीनं लग्नाच्या काही महिन्यांनंतर आत्महत्या केली. दरम्यान, पतीनं हुंड्याची मागणी करून मुलीचा छळ केल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली इथं राहणाऱ्या वरिष्ठ आयएएस अधिकारी चिन्नारामुडू यांची मुलगी माधुरी साहितीबाई (27) हिनं रविवारी रात्री तिच्या खोलीच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
मार्च 2025 मध्ये माधुरी साहितीबाई हिचं नांद्याल जिल्ह्यातील बेतनाचरा मंडळातील बुग्गनापल्ली थांडा येथील रहिवासी राजेश नायडू याच्यासोबत लग्न झालं होतं. हे लग्न आंतरजातीय होतं. माधुरीनं जेव्हा आपल्या आई-वडिलांना सांगितलं की, तिचा पती लग्नाच्या तिसऱ्या महिन्यापासून तिचा छळ करत आहे. तेव्हा स्थानिक पोलिसांच्या मदतीनं दोन महिन्यांपूर्वी आई-वडिलांनी माधुरीला ताडेपल्ली येथील आपल्या घरी आणण्यात आलं. तेव्हापासून माधुरी आपल्या आई-वडिलांसोबत घरी राहत होती.
माधुरी हिनं रविवारी रात्री तिच्या खोलीच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह मंगलागिरी एम्समध्ये दाखल केला. दरम्यान, पतीनं हुंड्याची मागणी करून माधुरीचा छळ केल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. तसंच आई लक्ष्मीबाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप : चिन्नारामुडू यांनी माध्यमांना सांगितलं की, "राजेश नायडू यानं आम्हाला नोकरीचं आमिष दाखवलं आणि आमच्या मुलीची महानंदीमध्ये नोंदणी करून घेतली. वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत आमच्या मुलीचं पुन्हा लग्न करण्याचं आश्वासन देऊन आम्ही तिला त्याच्यासोबत पाठवलं. या काळात राजेश यानं जास्त हुंड्याची मागणी करून तिचा छळ केला. त्यानं तिला जीवे मारण्याची धमकी दिली. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा आमच्या मुलीनं सांगितलं की, तिला आम्हाला फोन करायचा असला तरी तिला तिच्या पतीची परवानगी घ्यावी लागेल आणि ती तिथं राहू शकत नाही, तेव्हा आम्ही तिला घरी आणलं. ती आल्यापासून आमच्या मुलीला काळजी वाटत होती की, तिचा पती तिला परत घेऊन जाणार नाही."
टीप : आत्महत्या हा उपाय नाही : जर तुम्हाला आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल, किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर तुमचं ऐकण्यासाठी नेहमीच कोणीतरी आहे. स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन 9152987821 वर कॉल करा. (सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध).
हेही वाचा :

