ETV Bharat / bharat

सायबर फसवणुकीच्या तक्रारींसाठी ‘सी-मित्रा’ हेल्प डेस्क, घरबसल्या दाखल करता येणार FIR

हैदराबाद पोलिसांनी ‘सी-मित्रा’ (C Mitra Help Desk) सेवा सुरू केली आहे. आता सायबर फसवणुकीची तक्रारी घरबसल्या करता येणार आहे.

'C-Mitra' Help Desk
‘सी-मित्रा’ हेल्प डेस्क (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 10, 2026 at 2:55 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : हैदराबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांना आता तक्रार नोंदवण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. ‘सी-मित्रा’ (C-Mitra) ही नवी सुविधा सुरू करण्यात आली असून, तिच्या माध्यमातून घरबसल्या FIR दाखल करता येणार आहे. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत कार्यरत असलेले 24 कर्मचाऱ्यांचे विशेष हेल्पडेस्क उभारण्यात आले आहे.

कोठे आहे कार्यालय? : ही ‘सी-मित्रा’ हेल्पडेस्क सुविधा बशीरबाग येथील सेंट्रल क्राईम स्टेशन (CCS) कार्यालयात सुरू करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त (CP) सज्जनार, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीनिवासुलू, तसेच डीसीपी अरविंद बाबू, अपूर्वा राव, चंद्रमोहन, गायकवाड वैभव रघुनाथ, रूपेश, वेंकटेश्वरलू, किरण खरे आणि एसीपी शिवामरुथी उपस्थित होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

झिरो FIR म्हणून केली जाणार नोंद : 3 लाखांपर्यंतच्या सायबर फसवणूक प्रकरणांची नोंद ‘सी-मित्रा’ येथे झिरो FIR म्हणून केली जाईल आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याकडं वर्ग केली जाईल. तसेच 3 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या प्रकरणांमध्ये थेट सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करता येईल.

पीडितांनी काय करावे? : पीडितांनी 1930 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा cybercrime.gov.in या वेबसाइटद्वारे तक्रार दाखल करावी. तक्रार प्राप्त झाल्यावर, सी-मित्रा टीम तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया समजावून सांगेल, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तक्रारीचा मसुदा तयार करेल आणि तो पीडिताच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवेल. पीडित हा फॉर्म प्रिंट करून, त्यावर सही करून 'सायबर मित्रा हेल्पडेस्क, स्टेशन हाऊस ऑफिसर, क्राइम पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त कार्यालय, बशीरबाग, हैदराबाद 500029 या पत्त्यावर पाठवू शकतात. तो स्टेशनबाहेरील ड्रॉप बॉक्समध्येही टाकला जाऊ शकतो.

बनावट कॉल्सपासून सावध रहा : सी-मित्राकडून येणारे कॉल केवळ अधिकृत हेल्पडेस्क फोननंबर 040-41893111 वरूनच येतील. व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवण्यासाठी फक्त 87126 मालिकेतील क्रमांकांचा वापर केला जाईल. पोलीस आयुक्तांनी सी-मित्राच्या नावाने येणाऱ्या बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला जनतेला दिला आहे.

हेही वाचा -

  1. सामान्य लोकांपासून ते मंत्री, अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप हॅक; तेलंगाणात केवायसी अपडेटच्या नावाखाली मोठी फसवणूक
  2. 58 कोटी लुटण्यासाठी उघडली साडेसहा हजार बँक खाती; सायबर भामट्यांकडून मुंबईत सर्वात मोठा डल्ला
  3. बंगळुरु 'आयटी हब' आता बनलंय 'सायबर गुन्हेगारांचं हब'