काळीज पिळवटून टाकणारी घटना; असहाय्य बापानं रस्त्यावरच केले नवजात मुलीवर अंत्यसंस्कार, नेमकं प्रकरण काय?
सीहोर जिल्ह्यात एका बापानं आपल्या नवजात मुलीवर रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे.

Published : January 10, 2026 at 1:09 PM IST
सीहोर : मध्य प्रदेशातील सीहोर येथून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका असहाय्य बापाला रस्त्याच्या कडेला आपल्या नवजात मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. ही घटना 6 जानेवारीची असल्याचं सांगितलं जात असून या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यामुळे सीहोरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सीहोर-भेरुडा रोडवर घडलेल्या या घटनेत एक वडील आपल्या इतर मुलींसह एका नवजात बाळावर अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत.
नेमका प्रकार काय? : मिळालेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर रोजी संतोष जाट यांच्या पत्नी ममता जाट यांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 2 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास आईने बाळाला जन्म दिला. पण बाळाचं वजन केवळ 900 ग्रॅम असल्यानं त्याला ताबडतोब जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. अशा स्थितीत तिथं 5 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नवजात मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यूनंतर वडील संतोष जाट यांनी जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणा आणि अमानवीय वागणूक दिल्याचा आरोप केला आणि रुग्णालयासमोरील रस्त्यावर निदर्शन केलं.
'रुग्णालय प्रशासनाकडून वाईट वागणूक' : या प्रकरणाबद्दल विचारलं असता, संतोष जाट म्हणाले, "त्यांनी बाळ आजारी असल्याचा दावा करून अनेक दिवस आयसीयूमध्ये ठेवलं. नंतर त्यांनी सांगितलं की, ती मृत झाली आहे. त्यांनी अतिशय वाईट वागणूक दिली. माझ्या नवजात बाळाच्या मृत्यूनंतर मी रुग्णालयाकडे गाडी मागितली, पण गाडी उपलब्ध नव्हती. माझं घर 150 किमी अंतरावर आहे, म्हणून मी सीहोर-इच्छावर भेरुडा रोडवर तिच्यावर अंत्यसंस्कार केले."
रुग्णालय प्रशासनाचं स्पष्टीकरण : रुग्णालय व्यवस्थापनाच्या मते, गरोदर महिला संतोष जाट यांची पत्नी ममता हिला 30 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 2 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2:22 वाजता, तिनं प्री मॅच्युअर बाळाला जन्म दिला, ज्याचं वजन 900 ग्रॅम होतं, जे अत्यंत कमी होतं. बाळाला ताबडतोब जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर होती. 5 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला. यानंतर बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांविरुद्ध निदर्शनं केली.
कुटुंबाच्या आरोपांनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना नोटीस : या प्रकरणाबाबत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांशी (सीएमएचओ) बोलण्याचा आमच्या प्रतिनिधीनं प्रयत्न केला. परंतु त्यांनी फोन उचलला नाही. दरम्यान, रुग्णालयातील सूत्रांचं म्हणणं आहे की, डॉक्टरांविरुद्ध निषेध करण्यापूर्वी कुटुंबानं सिव्हिल सर्जन, आरएमओ, रुग्णालय व्यवस्थापक किंवा इतर कोणत्याही वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली नाही. मात्र, या प्रकरणात अनुचित वर्तन केल्याचा ठपका ठेवत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा
- मुंबईतून पंजाबला घरी गेलेल्या तरुणाचे मारेकऱ्यांनी केले तीन तुकडे; एक आढळला ड्रममध्ये
- ट्रॅफिक पोलिसांना साप दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न, मद्यधुंद रिक्षाचालकाचा भर रस्त्यात गोंधळ
- 'लग्नासाठी बिहारमध्ये वीस पंचवीस हजारात मुलगी मिळते'; कॅबिनेट मंत्री रेखा आर्य यांच्या पतीचं वादग्रस्त विधान, नंतर मागितली माफी

