हरियाणातील सार्वजनिक उद्यानांची सद्यस्थिती काय? चंदीगडसह राज्यातील प्रमुख शहरांचा ग्राउंड रिपोर्ट
'ईटीव्ही भारत'ने हरियाणातील उद्यानांची प्रत्यक्ष पाहणी केली. फरिदाबाद, कुरुक्षेत्र, हिसार आणि चंदीगड येथील उद्यानांची सद्यस्थिती काय आहे? याचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घ्या.

Published : May 31, 2026 at 9:02 AM IST
चंदीगड (हरियाणा) : हरियाणातील उद्यानं ‘ग्रीन लंग्स’, फिटनेस हब आणि कुटुंबांसाठी विरंगुळ्याची ठिकाणं म्हणून विकसित करण्यावर सरकार भर देत आहे. या उद्यानांच्या देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, प्रत्यक्ष पाहणीमध्ये सर्वत्र एकसारखं चित्र दिसत नाही. काही ठिकाणी उद्यानं स्वच्छ, हिरवीगार आणि सुस्थितीत असून चालण्यासाठी ट्रॅक, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि मुलांसाठी खेळण्यांची उत्तम व्यवस्था आहे. तर अनेक ठिकाणी देखभालीअभावी उद्यानं मोडकळीस आलेली दिसतात. तुटलेली खेळणी, खराब झालेली व्यायामाची साधनं, अस्वच्छ परिसर आणि वाढलेलं गवत यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हरियाणातील उद्यानांची वास्तविक स्थिती जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'नं विविध ठिकाणी जाऊन वास्तवाचा आढावा घेतला. या पाहणीत काही उद्यानांमध्ये उत्कृष्ट सुविधा आढळल्या, तर काही ठिकाणी दुर्लक्ष आणि अपुऱ्या देखभालीमुळे उद्यानांची दुरवस्था स्पष्टपणे दिसून आली. नागरिकांच्या मते, उद्यानं आरोग्यदायी जीवनशैलीसाठी महत्त्वाची असली तरी त्यांची नियमित देखभाल, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणं आवश्यक आहे. सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असला तरी त्याचा लाभ सर्व उद्यानांपर्यंत समान पद्धतीनं पोहोचत नसल्याचं या वास्तव या ग्राउंड रिपोर्टमधून समोर आलं.
फरीदाबादमधील उद्यानांची स्थिती
हरियाणातील फरीदाबाद शहरात सुमारे 500 लहान-मोठी उद्यानं आहेत. या उद्यानांची देखभाल महानगरपालिका आणि एफएमडीए (Faridabad Metropolitan Development Authority) यांच्यामार्फत केली जाते. काही उद्यानं अतिशय चांगल्या स्थितीत असून नागरिकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनली आहेत, तर काही उद्यानांची अवस्था मात्र अत्यंत खराब आहे.
फरीदाबादमधील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध उद्यानांपैकी एक म्हणजे सेक्टर-12 येथील टाउन पार्क. सुमारे 43 एकर क्षेत्रात पसरलेलं हे उद्यान इतकं सुंदर आणि सुस्थितीत आहे की ते आता पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं आहे. या उद्यानात मुलांसाठी आधुनिक झोपाळे आणि खेळण्यांची सुविधा उपलब्ध आहे. प्रौढांसाठी ओपन जिमची व्यवस्था करण्यात आली आहे. वाचनाची आवड असलेल्या नागरिकांसाठी डिजिटल ग्रंथालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वच्छ आणि आरामदायी बाकं, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच स्वच्छ शौचालयं उपलब्ध आहेत.
टाउन पार्कमध्ये एक विशेष बर्ड हाऊस (पक्षीगृह) उभारण्यात आलं असून इथं शेकडो पक्षी वास्तव्य करतात. त्यांच्या अन्न-पाण्याची योग्य व्यवस्था देखील करण्यात आली आहे. उद्यानातील आणखी एक आकर्षण म्हणजे सूर्यप्रकाशाच्या साहाय्यानं चालणारे अनोखे फ्लॉवर वॉच (फुलांचं घड्याळ).
याशिवाय, उद्यानात अनेक सुंदर कारंजी, रंगीबेरंगी फुलांची बाग, हजारो हिरवीगार झाडं आणि मऊशार हिरवळ आहे, जी येणाऱ्या प्रत्येकाचं मन मोहून टाकते. उद्यानाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जातं, त्यामुळे परिसर नेहमीच स्वच्छ आणि आकर्षक दिसतो. टाउन पार्कमध्ये सुमारे 300 प्रेक्षकांची आसनव्यवस्था असलेलं एक खुल्या आकाशाखालील नाट्यगृह (ओपन थिएटर) देखील आहे. इथं नियमितपणे सांस्कृतिक कार्यक्रम, कला सादरीकरणं आणि विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. एकंदरीत, फरीदाबादमधील टाउन पार्क हे आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा उत्कृष्ट संगम असलेलं आदर्श उद्यान मानलं जातं.
- टाउन पार्कमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था : सेक्टर-12 मधील टाउन पार्कमध्ये सुमारे 350 फूट उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला असून तो उद्यानाच्या सौंदर्यात भर घालतो. इथं सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. पार्क परिसरात दिवस-रात्र सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी तैनात असतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पार्कच्या बाहेर कायमस्वरूपी पीसीआर वाहनही तैनात ठेवलं जातं. उत्तम सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरणामुळे टाउन पार्क आता लोकप्रिय पिकनिक स्पॉट बनले आहे. फक्त फरीदाबादच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यांमधूनही अनेक पर्यटक आणि नागरिक येथे भेट देण्यासाठी येतात.
- सेक्टर-10 मधील उद्यानांची दुरवस्था : मात्र, फरीदाबादमधील सर्वच उद्यानांची स्थिती समाधानकारक नाही. शहरातील पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेक्टर-10 येथील उद्यानाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या उद्यानात नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या ओपन जिममधील बहुतांश व्यायामाची उपकरणं तुटलेल्या अवस्थेत आहेत. मुलांसाठी बसवलेले झोपाळेही मोडकळीस आले असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. उद्यानातील मैदान उंच-सखल असून त्याची योग्य देखभाल होत नसल्याचं दिसून येतं.
याशिवाय, इथं पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही तसेच सुरक्षेची कोणतीही प्रभावी व्यवस्था नाही. पार्कचं मुख्य प्रवेशद्वारही तुटलेल्या अवस्थेत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही प्रशासनानं या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

कुरुक्षेत्रातील ताऊ देवीलाल उद्यानाची काय अवस्था आहे?
फरीदाबादप्रमाणेच कुरुक्षेत्रमधील ताऊ देवीलाल पार्कची परिस्थितीही काहीशी विरोधाभासी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 लगत असलेल्या या उद्यानाचा एक भाग आकर्षक आणि सुस्थितीत आहे, तर दुसरा भाग विकासाच्या प्रतीक्षेत आहे.
गेल्या 6 महिन्यांपासून लाखो रुपयांच्या खर्चातून उभारलेले कारंजे बंद पडले आहे. उद्यानातील एका भागात कचऱ्याचे ढीग साचले असून काही कचरापेट्याही तुटलेल्या अवस्थेत आहेत. पार्कबाहेरील खाद्यपदार्थ विक्री केंद्रे देखभालीअभावी आता जवळपास भग्नावस्थेत पोहोचली आहेत.
मात्र, उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळील भागात हिरवीगार झाडं, स्वच्छ परिसर, आकर्षक बाकं आणि सुबक हिरवळ पाहायला मिळते. हा भाग पर्यटकांना आकर्षित करतो. त्यामुळे उद्यानाचा पुढील भाग चांगल्या स्थितीत असला तरी मागील भाग अद्याप विकास आणि देखभालीच्या प्रतीक्षेत असल्याचं चित्र दिसून येतं. एकूणच, हरियाणातील अनेक उद्यानांमध्ये सुविधा आणि देखभालीबाबत मोठी विषमता दिसून येत असून प्रशासनानं दुर्लक्षित उद्यानांकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हिसारमधील उद्यानांचा रिॲलिटी चेक; ताऊ देवीलाल टाउन पार्क आणि जिंदल पार्क नागरिकांचं आकर्षण
हरियाणातील हिसार शहरात 5 प्रमुख उद्यानं असून त्यापैकी ताऊ देवीलाल टाउन पार्क हे सर्वांत मोठं आणि सर्वाधिक लोकप्रिय उद्यान मानलं जातं. आधुनिक सुविधा, आकर्षक रचना आणि उत्कृष्ट देखभालीमुळे हे उद्यान नागरिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
- ताऊ देवीलाल टाउन पार्कची वैशिष्ट्ये : ताऊ देवीलाल टाउन पार्कमध्ये नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उद्यानाचं सर्वात मोठे आकर्षण म्हणजे काचेपासून तयार करण्यात आलेला स्काय ब्रिज. या पुलावरून चालताना पर्यटकांना उद्यानातील सुंदर तलावाचे विहंगम दृश्य पाहता येतं. याशिवाय, उद्यानात आकर्षक संगीतबद्ध कारंजी उभारण्यात आली आहेत. फिरण्यासाठी प्रशस्त आणि सुबक ट्रॅक तयार करण्यात आले असून संपूर्ण परिसरात विविध प्रकारची फुलं आणि शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. हे उद्यान हुडा विभागाच्या अखत्यारित असून त्याची नियमित देखभाल केली जाते.
जिंदल पार्कचीही उत्कृष्ट देखभाल
- हिसारमध्ये जिंदल समूहाकडून व्यवस्थापित करण्यात येणारी तीन उद्यानं देखील आहेत. या तिन्ही उद्यानांची स्वच्छता, हरित सौंदर्य आणि देखभाल उल्लेखनीय असल्याचं दिसून येतं. जिंदल टॉवर पार्क हे त्यापैकी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. इथं उभारण्यात आलेल्या उंच टॉवरवर चढून संपूर्ण हिसार शहराचं विहंगम दृश्य पाहता येतं. हीच या उद्यानाची सर्वात मोठी ओळख मानली जाते. हिरव्यागार वातावरणामुळे इथं येणारे नागरिक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणावर छायाचित्रे व सेल्फी काढताना दिसतात.
- दुसरं जिंदल पार्क जिंदल सिटी परिसरात असून तेही आकर्षक पद्धतीनं विकसित करण्यात आलं आहे. शहरातील अनेक नागरिक सकाळच्या आणि सायंकाळच्या फेरफटक्यासाठी या उद्यानाला पसंती देतात.
- तिसरं जिंदल पार्क मिल गेट परिसरात आहे. हा भाग तुलनेनं मागास मानला जात असला तरी उद्यानाची देखभाल आणि सौंदर्यीकरण अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आलं आहे. इथं फिरण्यासाठी चांगले ट्रॅक, स्वच्छ परिसर आणि हिरवाईची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या तिन्ही उद्यानांची देखभाल जिंदल कंपनीकडून नियमितपणे केली जाते. त्यामुळे उद्यानांमधील सुविधा आणि स्वच्छता कायम राखली जाते.
हिसारमधील ताऊ देवीलाल टाउन पार्कसह जिंदल समूहाची तिन्ही उद्यानं आणि इतर प्रमुख उद्यानं एकूणच चांगल्या स्थितीत असल्याचं दिसून येतं. नियमित देखभाल, स्वच्छता आणि आधुनिक सुविधांमुळे ही उद्यानं नागरिकांसाठी विरंगुळा, व्यायाम आणि पर्यटनाची उत्तम ठिकाणं बनली आहेत.
हिसारमधील उद्यानांची स्थिती तुलनेनं चांगली; मधुबन पार्क आणि इतर उद्यानं नागरिकांचं आकर्षण
हरियाणातील हिसार शहरातील उद्यानांची स्थिती एकूणच समाधानकारक असल्याचं दिसून येतं. शहरातील सर्वांत जुनं उद्यान मधुबन पार्क हे चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठाजवळ स्थित आहे. हे उद्यान नगर निगमच्या अधीन असून येथे नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत.
मधुबन पार्कमध्ये मुलांसाठी झोपाळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी या ठिकाणी छोटं प्राणीसंग्रहालय होतं, मात्र ते आता बंद करण्यात आलं आहे. उद्यानात विविध प्रकारच्या फुलांची झाडं आणि हिरवळ पाहायला मिळते. याशिवाय, उद्यानाच्या शेजारी महावीर स्टेडियम असल्यामुळे या परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
इतर उद्यानांच्या तुलनेत मधुबन पार्कची देखभाल काहीशी कमी असल्याचं दिसून येतं. तरीही इथं मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत आणि काही कमतरतांवर सध्या काम सुरू असल्याचं सांगितलं जातं. शहरातील इतर कॉलन्यांमध्ये असलेल्या लहान उद्यानांचीही देखभाल नियमितपणे केली जात आहे आणि काही ठिकाणी दुरुस्तीची कामं सुरू आहेत.
चंदीगडमधील उद्यानांचं रिॲलिटी चेक
दरम्यान, चंदीगड शहरातील उद्यानांचीही पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सेक्टर-1 येथील प्रसिद्ध रॉक गार्डनचा समावेश आहे. रॉक गार्डन हे ‘वेस्ट टू वंडर’ या संकल्पनेवर आधारित जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेलं उद्यान आहे. हे उद्यान नेक चंद सैनी यांनी 1957 साली विकसित केलं असून ते सुमारे 40 एकर क्षेत्रात पसरलेलं आहे. रिॲलिटी चेकदरम्यान रॉक गार्डनमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छ वॉशरूम, उत्कृष्ट साफसफाई आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था यांसारख्या सुविधा समाधानकारक असल्याचं आढळलं.

रॉक गार्डनची प्रमुख वैशिष्ट्ये
- रॉक गार्डन हे औद्योगिक आणि घरगुती कचऱ्याचा पुनर्वापर करून तयार करण्यात आलेलं एक अनोखं उद्यान आहे. इथं फुटलेल्या बांगड्या, सिंक, टाइल्स, बाटल्या आणि मातीची भांडी यांसारख्या टाकून दिलेल्या वस्तूंचा वापर करून कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत.
- या उद्यानात हजारो शिल्पं असून ती प्रामुख्यानं मानव, प्राणी आणि नर्तकांचं दर्शन घडवतात. उद्यानाची रचना चक्रव्यूहासारखी असून त्यात अरुंद मार्ग, कमानीदार पूल, कृत्रिम धबधबे आणि ओपन थिएटर यांचा समावेश आहे.
- रॉक गार्डन हे पुनर्वापर आणि पर्यावरण संरक्षणाचं उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं. त्यामुळे ते केवळ पर्यटनस्थळ नसून शाश्वत विकासाचा एक आदर्श नमुना म्हणूनही ओळखलं जातं.
रोज गार्डन उत्कृष्ट, तर जपानी गार्डनची दुरवस्था : चंदीगड शहरातील उद्यानं त्यांच्या सौंदर्यामुळे आणि हरित वातावरणामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करतात. विशेषतः सेक्टर-१६ येथील झाकीर हुसेन रोज गार्डन हे आशियातील सर्वात मोठं गुलाब उद्यान मानलं जातं. तसेच शहरातील इतर उद्यानेही त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत.
- झाकीर हुसेन रोज गार्डनची भव्यता : सुमारे 30 एकर क्षेत्रात पसरलेल्या या उद्यानात हजारो प्रकारचे गुलाब पाहायला मिळतात. हे उद्यान अत्यंत चांगल्या प्रकारे देखभाल केलेलं असून इथं फिरण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सकाळ-संध्याकाळ इथं मोठ्या संख्येनं नागरिक वॉकिंग, धावणं आणि व्यायामासाठी येतात. परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर या उद्यानाला भेट देतात, त्यामुळे हे उद्यान चंदीगडच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक बनलं आहे.
- इतर थीम गार्डन्सही आकर्षक : सेक्टर-3 मधील बोगनवेलिया गार्डन रंगीबेरंगी फुलांमुळे विशेष आकर्षण ठरतं. सेक्टर-36 मधील गार्डन ऑफ फ्रेग्रन्स सुगंधी वनस्पतींसाठी ओळखलं जातं. त्याच परिसरातील हिबिस्कस गार्डन विविध प्रकारच्या जास्वंदीच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. सेक्टर-35 मधील टोपियरी पार्क विशेषतः मुलांमध्ये लोकप्रिय आहे. इथं झाडाझुडपांना विविध प्राण्यांच्या आकारात कापून आकर्षक शिल्पे तयार करण्यात आली आहेत.
- जपानी गार्डनची दुरवस्था : दुसरीकडे, चंदीगडमधील जापानी गार्डनची स्थिती मात्र चिंताजनक झाली आहे. जपानी संस्कृतीवर आधारित या उद्यानात पॅगोडा टॉवर, धबधबे, जलाशय, मेडिटेशन सेंटर, बुद्धांचा पुतळा आणि गोल्डन बांबू यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली होती.
या उद्यानातील दोन्ही भागांना सुंदर बोगद्यानं जोडलेलं आहे, ज्यामध्ये जपानी चित्रकला देखील करण्यात आली आहे. मात्र सध्या उद्यानातील अनेक भागांची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी पडझड झाल्याचं दिसून येतं. कारंजे बंद पडले आहेत आणि जलाशय कोरडे पडले आहेत, त्यामुळे येथील सौंदर्य कमी झालं आहे.
प्रशासनाचं स्पष्टीकरण आणि दुरुस्तीचं प्रयत्न : येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी हे उद्यान अत्यंत शांत आणि सुंदर होतं, मात्र आता अनेक भागांची देखभाल नीट होत नाही. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, उद्यानाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत आणि सध्या 5 ते 8 कर्मचारी इथं कार्यरत आहेत. भविष्यात हे उद्यान दिव्यांगांसाठी सुलभ करण्यासाठी रॅम्प आणि इतर सुविधा जोडण्याचा विचार सुरू आहे.
चंदीगड महानगरपालिकेचे महापौर सौरभ जोशी यांनी सांगितलं की, बजेटच्या मर्यादांमुळे काही अडचणी येत आहेत, तरीही दुरुस्तीचे काम सुरू आहे. शहरातील विविध सार्वजनिक स्थळांसाठी मिळणारं बजेट विभागून वापरलं जातं. त्यांनी आश्वासन दिलं की उर्वरित कमतरता लवकरच दूर केल्या जातील. एकूणच, चंदीगडमधील काही उद्यानं अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित असली तरी काही उद्यानांना तातडीनं देखभाल आणि सुधारणा आवश्यक असल्याचं चित्र दिसून येतं.
हरियाणातील उद्यानांच्या देखभालीची जबाबदारी विविध संस्थांकडे :
हरियाणा राज्यातील उद्यानांच्या देखभालीची जबाबदारी विविध शासकीय संस्था तसेच रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन्स (आरडब्ल्यूए) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्यातील पार्क व्यवस्थापनासाठी हरियाणा शहरी विकास प्राधिकरण (एचएसवीपी), त्याचा अभियांत्रिकी विभाग, हॉर्टिकल्चर विभाग, महानगर विकास प्राधिकरण (एमडीए), नगर निगम आणि स्थानिक आरडब्ल्यूए कार्यरत आहेत.
या सर्व संस्थांना उद्यानांच्या देखभाल, दुरुस्ती आणि आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी दरवर्षी लाखो ते कोट्यवधी रुपयांचं बजेट मंजूर केलं जाते. प्रत्येक पार्कसाठी प्रति चौरस फूट दरानुसार निधी वितरित केला जातो. तसेच कामकाजासाठी टेंडर प्रक्रिया राबवून खासगी एजन्सींनाही काम दिलं जाते.
दोन पद्धतींनी होते उद्यानांचं मेंटेनन्स
एचएसवीपीच्या इंजिनिअरिंग विंगचे अधीक्षक अभियंता अशोक राणा यांच्या माहितीनुसार, उद्यानांची देखभाल दोन प्रमुख पद्धतींनी केली जाते.
- पहिल्या पद्धतीत, विभागाकडून टेंडर मागवून एजन्सींना पार्कची देखभाल आणि सुरक्षेचं काम दिलं जातं.
- दुसऱ्या पद्धतीत, नागरिक किंवा आरडब्ल्यूए यांच्या सहभागातून देखभाल केली जाते. हरियाणा सरकारच्या धोरणानुसार, जर कोणती संस्था किंवा व्यक्ती उद्यानाची देखभाल करण्यास इच्छुक असेल, तर त्यांना प्रति चौरस फूट 3.60 रुपये दराने निधी दिला जातो.
अशोक राणा यांनी सांगितलं की, हरियाणा शहरी विकास प्राधिकरणानं राज्यभरात सुमारे 400 सेक्टर विकसित केले आहेत. सध्या यापैकी काही सेक्टर स्थानिक नगर संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. एचएसवीपी सध्या सुमारे 80 ते 85 सेक्टरची देखभाल करत असून त्यात रस्ते, वीज व्यवस्था आणि उद्यानं यांचा समावेश आहे.

- उद्यानांसाठी सुमारे 50 कोटींचं बजेट : ईडीसी अंतर्गत येणारे काही पार्क विकास प्राधिकरणांकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत, ज्यात पंचकूला, सोनीपत, फरीदाबाद आणि गुरुग्रामचा समावेश आहे. सध्या एचएसवीपीकडे सुमारे 100 उद्यानांची देखभाल आहे, ज्यासाठी जवळपास 50 कोटी रुपयांचं वार्षिक बजेट मिळतं. या निधीतून केवळ उद्यानांचीच नव्हे तर ग्रीन बेल्ट, रस्त्यांच्या कडेला झाडं लावणं आणि डिवायडिंग रोडवरील हरितीकरणाची कामंही केली जातात.
अशोक राणा यांनी स्पष्ट केलं की, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कामांसाठी बजेटची मागणी केली जाते आणि त्यानुसार उद्यानांच्या देखभालीची प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे राज्यातील उद्यानांचे व्यवस्थापन विविध स्तरांवर समन्वयातून चालतं.
- PMDA आणि महानगरपालिकेची भूमिका : हरियाणातील विविध महानगर विकास प्राधिकरणं (MDA) आणि महापालिका राज्यातील उद्यानांच्या देखभाल आणि व्यवस्थापनासाठी दरमहा तसेच वार्षिक स्तरावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. यामध्ये पंचकूला मेट्रोपोलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (PMDA), फरीदाबाद मेट्रोपोलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (FMDA), गुरुग्राम मेट्रोपोलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (GMDA) यांसारख्या संस्थांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या संस्थांकडून उद्यानांच्या देखभालीसाठी दरमहा आणि वार्षिक स्तरावर लाखो ते कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. हा निधी वेळोवेळी गरजेनुसार कमी-जास्त होत असतो.
- पंचकूला महापालिकेकडे 222 उद्यानं : पंचकूला महापालिकेकेच्या अखत्यारित सुमारे 222 उद्यानं आहेत. या सर्व उद्यानांच्या देखभालीसाठी पार्क डेव्हलपमेंट कमिटींना दरमहा सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचा निधी दिला जातो. हरियाणातील इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारे उद्यानांच्या देखभालीसाठी स्वतंत्र निधी वितरित केला जातो.
- हरियाणातील उद्यानांसाठी SOP : हरियाणामध्ये उद्यानांच्या देखभालीसाठी मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) तयार करण्यात आली आहे. पंचकूला येथील अधीक्षक अभियंता अशोक राणा यांच्या माहितीनुसार, उद्यानांची देखभाल ही राइट टू सर्व्हिस कायद्याअंतर्गत अनिवार्य सेवा मानली जाते.
उद्यान देखभालीचे प्रमुख नियम
अशोक राणा यांनी उद्यान व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाचं मानक स्पष्ट केले आहेत:
- गवताची देखभाल (Grass Maintenance): गवताची कापणी दर एक ते दोन आठवड्यांनी करणं आवश्यक आहे. पावसाळ्यात वनस्पतींची वाढ जलद होत असल्यानं दर 7 दिवसांनी कापणी आवश्यक ठरते. साधारणपणे 15 दिवसांत एकदा कापणी केली तरी हरकत नाही.
- पाणी देणे (Watering): हिवाळ्यात एक ते दोन आठवड्यांनी पाणी देणं पुरेसे असतं. मात्र उन्हाळ्यात दर एक दिवसाआड पाणी देणं आवश्यक आहे.
- झाडांची छाटणी (Pruning of Trees): झाडांची छाटणी नियमितपणे केली जाते. वाढ जास्त असल्यामुळे साधारण दोन ते तीन महिन्यांत एकदा छाटणी आवश्यक ठरतं.
- खतांचा वापर (Fertilizer): गवत आणि झाडांसाठी दर तीन महिन्यांनी खत देणं आवश्यक असतं, जेणेकरून हरित परिसर टिकून राहतो.
- झुडुपांची छाटणी : हरियाणातील उद्यानांच्या देखभालीत विविध तांत्रिक आणि व्यवस्थापकीय प्रक्रिया नियमितपणे राबवल्या जातात. उद्यानांमधील झुडुपं आणि लहान रोपांची छाटणी दर महिन्याला केली जाते. ही प्रक्रिया प्रामुख्यानं कमी उंचीच्या, सुमारे 3 ते 4 फूटांपेक्षा जास्त न वाढणाऱ्या सजावटी (ऑर्नामेंटल) वनस्पतींसाठी केली जाते. या वनस्पतींचा उपयोग मुख्यतः सौंदर्यवृद्धी, सुगंध आणि परिसराच्या रचनेत सुधारणा करण्यासाठी केला जातो. यामध्ये फुलझाडं, पानझाडं, झुडपं, वृक्ष आणि गवत यांचा समावेश असतो. अशा वनस्पतींना बागेतील शोभेचे घटक मानले जाते, जे परिसर अधिक आकर्षक बनवतात.

तक्रारींचं निवारण 7 ते 10 दिवसांत : सुपरिटेंड इंजिनिअर अशोक राणा यांच्या माहितीनुसार, राइट टू सर्व्हिस कायद्याअंतर्गत उद्यानांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर जलद कारवाई केली जाते. कोणतीही तक्रार मिळाल्यास 7 ते 10 दिवसांच्या आत त्यावर कार्यवाही करून संबंधित तक्रारदाराचं समाधान केलं जातं.
देखभालीतील आव्हानं आणि वास्तव : एकूणच पाहता, 'ईटीव्ही भारत'च्या रिॲलिटी चेकमधून हे स्पष्ट झालं आहे की हरियाणातील उद्यानांचं स्वरूप सुधारण्यासाठी केवळ आर्थिक बजेट पुरेसं नाही, तर प्रशासनाची इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वाची आहे. चंदीगड आणि हिसारमधील काही उद्यानं चांगलं उदाहरण सादर करत असली, तरी फरीदाबाद आणि कुरुक्षेत्रमधील काही उद्यानांची अवस्था चिंताजनक आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
नागरिकांचीही जबाबदारी महत्त्वाची : या समस्येसाठी केवळ प्रशासनालाच दोष देणं योग्य ठरणार नाही, असंही या रिअॅलिटी चेकमध्ये नमूद करण्यात आलं आहे. उद्यानांचं नुकसान होण्यात नागरिकांचीही काही प्रमाणात भूमिका असल्याचं वास्तव समोर आलं आहे.
सरकार उद्यानं विकसित करू शकते, मात्र त्यांची स्वच्छता राखणं, कचरा न टाकणं, झाडे आणि सार्वजनिक संपत्तीचं संरक्षण करणं ही नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे. जोपर्यंत ही जबाबदारी पाळली जात नाही, तोपर्यंत कोणतंही शहर खऱ्या अर्थानं स्मार्ट बनू शकत नाही.
हेही वाचा...

