'ब्रिज मॅन ऑफ इंडिया' गिरीश भारद्वाज यांचं निधन, वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गिरीश भारद्वाज यांनी 300 हून अधिक हँगिंग फूटब्रिजेस उभारले. या यशामुळं त्यांना 'ब्रिज मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

Published : July 7, 2026 at 5:26 PM IST
दक्षिण कन्नड : 'ब्रिज मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री पुरस्कार विजेते गिरीश भारद्वाज यांचं मंगळवारी (7 जुलै) कर्नाटकातील सुलिया येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यामुळं गिरीश भारद्वाज यांना केव्हीजी (KVG) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मानवतावादी व्यक्ती गमावली - तहसीलदार : ग्रामीण भागातील लोकांसाठी ये-जा करण्यासाठी गिरीश भारद्वाज यांनी उभारलेले लटकते पूल हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि सामाजिक जाणिवेचे प्रतीक आहेत, असं सुलियाच्या तहसीलदार मंजुळा यांनी गिरीश भारद्वाज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, "ते एक असे दुर्मीळ व्यक्तिमत्त्व होतं, ज्यांनी आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी केला. देश त्यांच्या या सेवेची सदैव आठवण ठेवेल. त्यांच्या जाण्याने समाजाने एक महान अभियंता आणि मानवतावादी व्यक्ती गमावली आहे. दिवंगत आत्म्यास शांती लाभो आणि हे दुःख सहन करण्याचे बळ ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना देवो, अशी मी प्रार्थना करते."
हजारो लोकांचं जीवन बदलून टाकलं : गिरीश भारद्वाज हे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्याचे रहिवासी होते. अभियांत्रिकीचे पदवीधर असलेल्या गिरीश भारद्वाज यांनी मोठ्या कंपन्यांकडून मिळालेल्या आकर्षक नोकरीच्या संधी नाकारल्या आणि ग्रामीण जनतेला सक्षम करण्यासाठी कठोर परिश्रम घेतलं. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत प्रसिद्ध असलेले ते एक दुर्मीळ तांत्रिक तज्ज्ञ होते. त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि किफायतशीर पूल डिझाईननं हजारो लोकांचं जीवन बदलून टाकलं. ज्यामुळं लोकांना वर्षभर शाळा, रुग्णालये आणि बाजारपेठांमध्ये जाणं शक्य झालं.
'हँगिंग फूटब्रिज'ची डिझाईन आणि उभारणी : गिरीश भारद्वाज यांनी भारतातील विविध राज्यांमधील अशा शेकडो गावांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यास मदत केली, जी गावं इतर जगापासून तुटलेली होती; कारण तेथील नागरिकांकडे नद्या आणि कालवे ओलांडण्यासाठी पोहणं किंवा होड्यांचा वापर करणं यांशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. नागरिकांना एकमेकांशी सहजपणे जोडता, यावे यासाठी त्यांनी लटकत्या पादचारी पुलांची (Hanging Footbridges) डिझाईन आणि उभारणी केली. जलाशयांवर काँक्रीटचे मोठे पूल बांधण्याऐवजी गिरीश भारद्वाज यांच्या या डिझाईन आणि अंमलबजावणीमुळं विविध सरकारांची पैशांची बचत होण्यास मदत झाली. त्यांनी ग्रामीण भागासाठी स्थानिक साहित्याचा वापर करून अत्यंत कमी खर्चात सहजपणे उभारता येण्याजोगे पर्यावरणपूरक लटकते पादचारी पूल तयार केले, ज्यामुळे देशभरात एक क्रांती घडली.
'ब्रिज मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळख : मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर गिरीश भारद्वाज यांनी आपल्या वडिलांसोबत सुलिया इथं एक छोटेसं वर्कशॉप सुरू केलं. विशेष म्हणजे, त्यांचे अभियांत्रिकी ज्ञान केवळ लोखंडाच्या कामापुरतं मर्यादित नव्हतं. आपल्या परिसराची जाणीव आणि पायाभूत सुविधा न पोहोचलेल्या दुर्गम भागातील लोकांच्या समस्यांची त्यांना असलेली जाणीव यामुळं त्यांनी या गावकऱ्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी विविध डिझाईन आणि उपाययोजनांचा विचार करण्यास सुरुवात केली. गिरीश भारद्वाज यांनी आपला पहिला 'हँगिंग फूटब्रिज' उभारण्याचा प्रयोग स्वतःहून हाती घेतला आणि 1989 मध्ये सुलियामधील आरामबुरू इथं पायस्वनी नदीवर तो पूल बांधला. ही घटना त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्यांनी स्थानिक साहित्याचा वापर करून आणि मर्यादित बजेटमध्ये हा पूल उभारला. दरम्यान, हा पहिला पूल गिरीश भारद्वाज यांच्या प्रवासाची केवळ सुरुवात होती. त्यानंतर त्यांनी कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये 300 हून अधिक हँगिंग फूटब्रिजेस उभारले. या यशामुळं त्यांना 'ब्रिज मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
पुरस्कार आणि सन्मान : गिरीश भारद्वाज यांचं कार्य अत्यंत मोठं होतं, तरीही त्यांनी कधीच त्याचं प्रदर्शन केलं नाही. असं असलं तरी, लोकांना या देशाचा मुख्य प्रवाहाचा भाग बनण्यास मदत केल्याबद्दल जी एक अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात नितांत आदर आणि कृतज्ञतेची भावना होती. त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेची दखल घेत भारत सरकारनं 2017 मध्ये 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. तसंच म्हैसूर विद्यापीठासह अनेक संस्थांनी त्यांना मानद डॉक्टरेट देऊन गौरवलं होतं. दरम्यान, गिरीश भारद्वाज यांचं जीवन आता चित्रपट स्वरूपात मांडलं जाणार आहे. देशभरातील दुर्गम गावांमध्ये सुमारे 139 पूल उभारल्यामुळं 'ब्रिजमॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'सेतू बंधू' यांच्यावर आपण बायोपिक करणार असल्याची घोषणा संतोष कोडन्केरी यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :

