दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू
गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसात बुधवारी संध्याकाळी रोहिणी सेक्टर-16 परिसरात एक मोठी दुर्घटना घडली.

Published : July 8, 2026 at 6:32 PM IST
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसात बुधवारी संध्याकाळी रोहिणी सेक्टर-16 परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. येथील बांधकाम सुरू असलेली एक पाच मजली इमारत अचानक कोसळली. या घटनेमुळं परिसरात घबराट पसरली आहे. तसंच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जवळच पार्क केलेल्या अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे.
बचाव आणि मदतकार्य सुरू : दिल्ली अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी ए. के. मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना रोहिणी सेक्टर-16 मधील एमसीडी शाळेजवळ घडली. दिल्ली अग्निशमन दलाला सव्वा चार वाजता या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच, अग्निशमन दलानं तत्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू केलं. सुरुवातीला, घटनास्थळी एक वॉटर टेंडर, दोन वॉटर बाऊझर, एक मल्टीपर्पज व्हेइकल आणि एक आयआरटी (IRT) पाठवण्यात आलं. एडीओ पारस आणि एसटीओ विशाल हे बचावकार्याचे नेतृत्व करत आहेत.
Delhi: A building collapsed in Sector 16 under the K.N. Katju police station area in Rohini district. More details are awaited. pic.twitter.com/pvnU8OfXQw
— IANS (@ians_india) July 8, 2026
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच, दिल्ली पोलीस, महानगरपालिका, दिल्ली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि इतर संबंधित संस्थांची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. सर्व संस्था एकत्रितपणे ढिगारा हटवण्याचे आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना वाचवण्याचं काम करत आहेत. या बचाव कार्यादरम्यान, ढिगारा हातानं तसंच अवजड यंत्रांच्या साहाय्यानं हटवला जात आहे, जेणेकरून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. स्थानिक रहिवासी देखील या मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करत आहेत.
काही क्षणांतच संपूर्ण इमारत ढिगाऱ्यात बदलली : प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, इमारत कोसळत असताना स्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला. ज्यामुळं लोक घाबरून बाहेर धावले. काही क्षणांतच संपूर्ण इमारत ढिगाऱ्यात बदलली. या दुर्घटनेमुळं आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसर सील केला आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
ढिगाऱ्याची सखोल पाहणी केल्यानंतरच किती लोक बाधित झाले आहेत, हे स्पष्ट होईल. तसंच इमारत कोसळण्याच्या कारणाचीही चौकशी केली जाईल, असं प्रशासनानं म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं पावसाच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनानं लोकांना बांधकाम सुरू असलेल्या आणि जीर्ण इमारतींच्या परिसरात अधिक सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा :

