ETV Bharat / bharat

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओंची घोषणा; माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी स्वीकारला पदभार

राम मंदिर ट्रस्टचे सीईओ म्हणून एअर मार्शल (निवृत्त) जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलीय. सीईओंच्या नियुक्तीसोबतच तीन नवीन विश्वस्तांचीही (ट्रस्टी) नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओंची घोषणा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 2, 2026 at 5:40 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अयोध्याः अयोध्या येथील 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'च्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (CEO) घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली ही प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली; ट्रस्टच्या बैठकीत 5585 अर्जांमधून निवडलेल्या तीन उमेदवारांच्या यादीतून नवीन सीईओंच्या नावाची घोषणा करण्यात आली. राम मंदिर ट्रस्टचे सीईओ म्हणून एअर मार्शल (निवृत्त) जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीईओंच्या नियुक्तीसोबतच तीन नवीन विश्वस्तांचीही (ट्रस्टी) नावे जाहीर करण्यात आली आहेत.

जितेंद्र मिश्रा हे सीईओपदासाठीच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक होते : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे जितेंद्र मिश्रा हे सीईओपदासाठीच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक होते. त्यांच्याव्यतिरिक्त माजी आयपीएस अधिकारी राजेश पांडे, माजी आयएएस अधिकारी दिनेश चंद्र आणि आयएएस अधिकारी योगेश्वर राम मिश्रा हेदेखील या शर्यतीत होते. माजी आयपीएस अधिकारी परेश सक्सेना हे देखील दावेदारांपैकी एक होते. मंदिराच्या देणग्यांच्या कथित गैरव्यवहारावरून निर्माण झालेला वादामुळे आठ जणांना अटक झाली होती आणि चंपत राय यांना सरचिटणीसपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि विश्वस्तांच्या तीन रिक्त जागा भरण्याबाबत चर्चा करण्यासाठी ट्रस्टची येथे बैठक झाली होती. या बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, स्वामी कमलनयन दास, प्रभारी सरचिटणीस डॉ. कृष्ण मोहन, विश्वस्त महंत दिनेन्द्र दास आणि खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ट्रस्टच्या धार्मिक कामकाज समितीचे सदस्य असलेल्या कमलनयन दास यांनी बैठकीपूर्वी सांगितले की, मंदिराचे कामकाज सुरळीत चालणे ही त्यांची प्राथमिकता आहे.

विश्वस्त म्हणून नियुक्ती : निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली यांच्या अध्यक्षतेखालील आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकान्त चतुर्वेदी व माजी शास्त्रज्ञ सुरेश हावरे यांचा समावेश असलेल्या शोध समितीने मंगळवारी आपला अंतिम अहवाल ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांच्याकडे सोपवला. समितीचे सचिव समीर पांडा यांच्या मते, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या संस्थेचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असलेले संस्थात्मक नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य, सचोटी आणि दूरदृष्टी या निकषांवर सखोल मूल्यमापन केल्यानंतर समितीने "तीन अत्यंत पात्र व्यावसायिकांची" शिफारस केली. सीईओंव्यतिरिक्त बुधवारी तीन नवीन विश्वस्तांचीही घोषणा करण्यात आली. महेश भागचंदका (दिल्ली), मदन मोहन पांडे (अयोध्या) आणि निर्मला यादव (शिकोहाबाद) यांच्यावर विश्वस्ताची जबाबदारी सोपवण्यात आली. महेश भागचंदका हे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत; ते राम मंदिर आंदोलनातील सर्वात प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेल्या दिवंगत अशोक सिंघल यांचे नातेवाईक आहेत.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महत्त्वाची भूमिका : 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान ते सक्रिय सेवेत होते. या मोहिमेच्या वेळी जितेंद्र मिश्रा 'वेस्टर्न कमांड'चे प्रमुख म्हणून कार्यरत होते. या नवीन जबाबदारीसह त्यांच्यासमोर मंदिराचे व्यवस्थापन आणि आर्थिक पारदर्शकता बळकट करण्याचे मोठे आव्हान आहे; कारण या वर्षाच्या सुरुवातीला देणगी चोरीच्या एका मोठ्या वादामुळे या बाबींवर परिणाम झाला होता.

11 आणि 12 ऑगस्ट रोजी अयोध्येत 16 उमेदवारांच्या अंतिम मुलाखती घेण्यात आल्या : CEO निवड प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित छाननी आणि प्रत्यक्ष (मॅन्युअल) मूल्यमापन यांचा एकत्रित वापर करण्यात आलाय. अर्जांची छाननी करण्यासाठी 600 गुणांची मूल्यमापन पद्धत वापरण्यात आली आणि सुरुवातीच्या छाननी प्रक्रियेत 3577 उमेदवार सहभागी झाले होते. 470 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची निवड पुढील टप्प्यासाठी करण्यात आली; त्यानंतर 108 उमेदवारांशी आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून संवाद साधण्यात आला आणि 11 आणि 12 ऑगस्ट रोजी अयोध्येत 16 उमेदवारांच्या अंतिम मुलाखती घेण्यात आल्या. या बैठकीत 'ट्रस्ट डीड'मधील (न्यासाच्या दस्तऐवजातील) सुधारणांचाही विचार केला गेलाय. या सुधारणांद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे (CEO) अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करणे, नवीन प्रशासकीय रचनेला संस्थात्मक स्वरूप देणे आणि ट्रस्टच्या विविध समित्यांशी समन्वय अधिक सुलभ करणे हे उद्देश साध्य केले जातील. तसेच या बैठकीत ट्रस्टच्या आर्थिक आणि प्रशासकीय बाबींवरही चर्चा अपेक्षित आहे; यामध्ये मंदिर देणगी प्रकरणाशी संबंधित बाबी आणि स्थानिक प्रशासनासोबतच्या सुरक्षा व्यवस्थेचा समन्वय यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता.

हेही वाचाः

नरेंद्र मोदी NGT च्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार; पर्यावरण आणि हवामानविषयक आव्हानांवर होणार चर्चा

मुंबईकडून शिका आपत्ती व्यवस्थापन! एका क्लिकवर यंत्रणा सक्रिय