बाउन्सरनं पत्नीच्या बहिणींवर केला गोळीबार; एकीचा जागीच तर दुसरीचा उपचारादरम्यान मृत्यू
गोळीबार करणारा जितेंद्र वर्मा हा बाउन्सर म्हणून काम करतो. त्याच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे.

Published : May 6, 2026 at 4:59 PM IST
रायपूर : रायपूर आयुक्तालयांतर्गत पांद्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोवा भागातील उषा प्राईड इथं गोळीबाराची घटना घडली. जितेंद्र वर्मा या व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या बहिणींवर गोळीबार केला. या घटनेत एका बहिणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या बहिणीचा रग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबार करणारा जितेंद्र वर्मा हा बाउन्सर म्हणून काम करतो. त्याच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. या घटनेबाबत पोलीस उपआयुक्त मयंक गुर्जर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "बाउन्सर जितेंद्र वर्मा याचा गेल्या अनेक महिन्यांपासून त्याची पत्नी खिलेश्वरी वर्मा हिच्यासोबत वाद सुरू होता. मंगळवारी दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर पत्नी मुलाला घेऊन आपली बहीण गीतांजली वर्मा हिच्या घरी गेली. तिथं मुलाला सोडलं आणि ती दुसऱ्या बहिणीच्या घरी गेली."
मुलाला भेटण्याचा आग्रह : "रात्री आरोपी जितेंद्र वर्मा यांनं आपल्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पत्नीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर रागानं त्यानं पिस्तूल घेतलं आणि तो पत्नीच्या बहिणीच्या घरी म्हणजे आपल्या मेहुणीच्या घरी गेला. त्यावेळी त्यानं आपल्या दोन मेहुण्या गीतांजली वर्मा आणि दुर्गेश्वरी वर्मा यांना मुलाला भेटण्याचा आग्रह धरला. मात्र, त्यांनी मुलगा घरी नसल्याचं सांगत त्याला निघून जाण्यास सांगितलं. यामुळं आरोपीला अधिकच राग आला आणि त्यानं अंदाधुंद गोळीबार सुरू केला," असं पोलीस उपआयुक्त मयंक गुर्जर यांनी सांगितलं.
एकीचा जागीच मृत्यू, तर उपचारादरम्यान दुसरीचा मृत्यू : एक गोळी गीतांजली वर्मा हिच्या कपाळात लागल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. दुसरी गोळी दुर्गेश्वरी वर्मा हिच्या पोटाला लागली. त्यामुळं तिला गंभीर अवस्थेत डीकेएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. पांद्री पोलीस ठाण्याचे प्रभारी हसन सिंग यांनीही या घटनेबाबत दुजोरा दिला. पोलिसांच्या माहितीनुसार, कौटुंबिक वाद आणि मुलाला भेटू न दिल्यामुळं आरोपीनं त्याच्या सासरच्या घरी गोळीबार केला. आरोपी बाउन्सरला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :

