केरळ : मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताच ईडीची मोठी कारवाई; पिनाराई विजयन यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापेमारी
केरळचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी केली.

Published : May 27, 2026 at 2:07 PM IST
तिरुवनंतपुरम : केरळचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काही मंत्र्यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी (27 मे) पहाटे छापेमारी केली. ही कारवाई कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड (CMRL) मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयन यांच्या भाड्याच्या घरासह राज्यातील एकूण 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
आरोप काय? : आरोपानुसार, CMRL या खासगी कंपनीनं 2018 ते 2019 दरम्यान विजयन यांची मुलगी टी. वीणा यांच्या एक्सालॉजिक सोल्यूशन्स या आयटी कंपनीला सुमारे 1.72 कोटी रुपयांचे बेकायदेशीर पेमेंट केलं. मात्र, या बदल्यात संबंधित आयटी कंपनीनं कोणतीही सेवा पुरवली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी केरळ उच्च न्यायालयानं CMRL ची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत ईडीची कारवाई रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. 'ईडी'नं 2024 मध्ये या आरोपांच्या चौकशीसाठी धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.
#WATCH | Thiruvananthapuram: Enforcement Directorate is conducting searches at 10 premises in Keralam, including the residences of former Chief Minister and present LoP Pinarayi Vijayan, in the Cochin Minerals and Rutile Limited (CMRL) case. pic.twitter.com/fmHZbftho0
— ANI (@ANI) May 27, 2026
विजयन यांच्या भाड्याच्या घरासह 12 ठिकाणी छापेमारी : 'ईडी'नं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या भाड्याच्या घरासह राज्यभरातील 12 ठिकाणी अचानक छापेमारी केली. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही मोठी कारवाई विजयन यांची मुलगी वीणा विजयन यांच्या एक्सालॉजिक या आयटी कंपनीशी आणि कोचीतील कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड (CMRL) कंपनीशी संबंधित कथित मासिक पेमेंट प्रकरणाच्या तपासाचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे.
तिरुवनंतपुरम आणि कोचीसह ईडीने माजी मंत्री तसेच विजयन यांचे जावई मोहम्मद रियास यांच्या कोझिकोड येथील निवासस्थानीही छापेमारी केली. या कारवाईमुळे केरळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ईडीच्या छापेमारीदरम्यान वीणा विजयन आणि कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड (CMRL) चे व्यवस्थापकीय संचालक शशिधरन कार्था यांची चौकशी करण्यात आली. कोची येथील CMRL च्या कॉर्पोरेट कार्यालयात तसेच कार्था यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तपास अधिकारी पोहोचले तेव्हा माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि त्यांची मुलगी वीणा विजयन तिरुवनंतपुरम येथील त्यांच्या घरी उपस्थित होते. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत डेटा आणि कागदपत्रे गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
#WATCH | Kannur: In the Cochin Minerals and Rutile Limited (CMRL) case, Enforcement Directorate (ED) is conducting searches at 10 premises in Keralam, including the residences of former Chief Minister and present LoP Pinarayi Vijayan. https://t.co/5KYJNnClr8 pic.twitter.com/nNu8sDcjMU
— ANI (@ANI) May 27, 2026
मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच कारवाई : मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच केंद्रीय यंत्रणांनी विरोधी पक्षनेत्यांवर सुरू केलेल्या या कठोर कारवाईमुळे केरळच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, केरळ उच्च न्यायालयाने ईडीला CMRL आणि एक्सालॉजिक यांच्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी पुढे सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. CMRL ने ईडीची कारवाई रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानं ती फेटाळून लावली. इतक्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची मनी लॉन्डरिंग कायद्यांतर्गत सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याचा ईडीचा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरला.

