ETV Bharat / bharat

मोठा दहशतवादी कट उघड! दिल्ली पोलिसांची तामिळनाडूमध्ये कारवाई, 6 जणांना अटक

छापेमारीदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 8 मोबाईल फोन आणि 16 सिमकार्ड जप्त केले आहेत. या उपकरणांचा वापर सोशल मीडियावर भडकाऊ मजकूर पोस्ट करण्यासाठी केला जात होता.

Delhi Police Busts Module Supporting Terrorist Organizations
दिल्ली पोलिसांची तामिळनाडूमध्ये कारवाई (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 22, 2026 at 6:46 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एका मॉड्यूलचा भांडाफोड करत 6 जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ पोस्ट आणि इतर मजकूर शेअर करत होते. तसेच संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी होते. अटक करण्यात आलेल्यांची नावं मिजानुर रहमान, मोहम्मद शबत, उमर, मोहम्मद लिटन, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल अशी आहेत.

तामिळनाडूत झाली कारवाई : ही कारवाई तमिळनाडू राज्यात करण्यात आली. उथुकुली परिसरातून दोघांना, पल्लादम येथून तिघांना आणि तिरुमुरुगनपूंडी भागातून एकाला अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, सर्व आरोपी वस्त्र उद्योगात काम करत होते आणि बनावट आधार कार्डच्या साहाय्यानं आपली ओळख लपवून राहत होते.

संशयीत आरोपींकडून 8 मोबाईल फोन आणि 16 सिमकार्ड जप्त : छापेमारीदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 8 मोबाईल फोन आणि 16 सिमकार्ड जप्त केले आहेत. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर सोशल मीडियावर भडकाऊ आणि दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ मजकूर पोस्ट करण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच प्राथमिक तपासात आरोपींनी देशातील विविध शहरांची रेकी केल्याचे संकेतदेखील मिळाले आहेत.

राजधानी दिल्लीत 'फ्री काश्मीर'चे पोस्टर लावण्यात आल्याच्या घटनेचे धागेदोरेही या नेटवर्कशी संबंधित असू शकतात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सर्व आरोपींना रेल्वेनं दिल्लीला आणण्यात येत असून त्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाचा तपास सुरू असून या नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं ही कारवाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा