ETV Bharat / bharat

ट्रक आणि ट्रॅव्हल बसमध्ये भीषण धडक : दिल्ली मुंबई महामार्गावरील अपघातात 8 प्रवाशांवर काळाचा घाला

खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तब्बल 8 प्रवासी ठार झाले आहेत. ही घटना दिल्ली मुंबई महामार्गावर आज पहाटे घडली आहे.

8 KILLED ON DELHI MUMBAI EXPRESSWAY
जळणारी बस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 1, 2026 at 10:29 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

जयपूर : ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात तब्बल 8 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बुधवारी पहाटे धनावाड इथल्या 'झिरो पॉईंट'जवळ घडली. ही बस ऋषिकेशहून इंदूरकडं जाणारी बस समोर जाणाऱ्या ट्रकला धडकल्यानंतर आग लागली. त्यामुळे बसमधील 6 प्रवासी होरपळून तर दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. या बसमधील 29 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत बचावकार्य केलं, अशी माहिती पोलीस अधीक्षक पियुष दीक्षित यांनी दिलाी.

बस चालकाला डुलकी लागल्यामुळे घडला अपघात : दौसाचे पोलीस अधीक्षक पियुष दीक्षित यांनी घटनास्थळाची पाहणी करुन बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, "जखमी झालेल्या 29 जणांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून त्यांच्यावर दौसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी नऊ जणांची ओळख पटली आहे. प्राथमिक तपासावरून बस चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा. मात्र, नेमक्या कारणाचा सविस्तर तपास सुरू आहे."

बसचा समोरील भाग पूर्णपणे झाला चक्काचूर : दौसाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेंद्र फौजदार यांनी सांगितलं, की, "ही घटना पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. आतापर्यंत सहा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात हलवण्यात आले आहेत. किरकोळ दुखापत झालेल्या प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. जखमींना अद्याप मृतांबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. बसमध्ये 39 हून अधिक प्रवासी होते. या अपघातात ट्रकचा चालक आणि मदतनीस देखील जखमी झाले आहेत." ही धडक इतकी जोरदार होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्यानं त्वरित आग लागली. बसमध्ये अडकलेले सहा प्रवासी घटनास्थळीच जळून खाक झाले, तर अन्य दोघांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाला. अपघाताची बातमी मिळताच जिल्हा पोलीस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं," अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

अपघातानंतर मदत कार्याबाबत गंभीर प्रश्न : या भीषण अपघातानंतर मदतकार्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की, पोलीस आणि एक्सप्रेसवे व्यवस्थापनाला त्वरित माहिती देऊनही अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यासाठी जवळपास एक तास लागला. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की, जर बचावकार्य त्वरित सुरू झालं असतं, तर बसमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांचे प्राण वाचवता आले असते. मदतीची वाट पाहत असताना प्रवासी बसमध्येच अडकून पडले. परिणामी 6 जणांचा जळून मृत्यू झाला, असा दावा त्यांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात हलवले आहेत, तर जखमींवर उपचार सुरू आहेत. प्रशासन या अपघाताच्या सर्व पैलूंची चौकशी करत आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोशल माध्यमांवरुन या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं. दौसा येथील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या या रस्ते अपघातात प्राणहानी झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं. मृतांच्या आत्म्यास ईश्वराच्या चरणी स्थान मिळावं आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबांना हे असीम दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या. दौसाचे खासदार मुरारीलाल मीना यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केलं.

हेही वाचा :

  1. सांगलीत भीषण अपघात! कराड-तासगाव मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स बस झाडावर चालक अन् क्लीनरचा जागीच मृत्यू
  2. हरिद्वारमध्ये भीषण रस्ते अपघात! रोडवेज बस आणि पिकअप ट्रकची धडक; 3 जण ठार, 4 जखमी
  3. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रकला कारची धडक एकाच कुटुंबातील पाच जण ठार