ETV Bharat / bharat

'कॉकरोच जनता पार्टी'ला लगेच दिलासा नाही; केंद्र सरकार आणि 'एक्स'ला पाठवली नोटीस

अभिजीत दीपके यांनी वकील नकुल गांधी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Delhi HC
दिल्ली उच्च न्यायालय (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2026 at 3:10 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयानं 'कॉकरोच जनता पार्टी'चे (सीजेपी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'एक्स' अकाऊंट लगेच पूर्ववत करण्याचे आदेश देण्यास नकार दिला आहे. तसंच यासंदर्भात केंद्र सरकार आणि एक्सला नोटीस बजावली आहे. दरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दीपके यांनी आपलं 'एक्स'चे अकाऊंट ब्लॉक करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 जुलै रोजी होणार आहे. अभिजित दीपके हे सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये वास्तव्यास आहेत.

सरकारची बाजू ऐकल्यानंतरच निर्णय : 'एक्स' अकाऊंट पुन्हा सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय सरकारची बाजू ऐकल्यानंतरच दिला जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र, 'एक्स'चे अकाऊंट ब्लॉक करणाऱ्या आदेशाचा फेरविचार करण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. फेरविचार समितीनं दर दोन महिन्यांनी अकाऊंट ब्लॉक करण्याच्या आदेशाच्या सर्व पैलूंची तपासणी करणं आवश्यक आहे. तसंच फेरविचार समितीचा निर्णय न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश देखील न्यायालयानं दिले आहेत. दरम्यान, अभिजीत दीपके यांनी वकील नकुल गांधी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अकाऊंट ब्लॉक : गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या 'एक्स'चं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं होतं. गुप्तचर विभागानं राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव 'एक्स'चं अकाऊंट ब्लॉक करण्याची शिफारस केली. त्यानंतर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं 'एक्स'ला 'कॉकरोच जनता पार्टी'चे अकाऊंट ब्लॉक करण्याचा आदेश दिला.

सरन्यायाधीशांनी केली होती टिप्पणी : दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी टिप्पणी केली होती की, बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे आहेत. त्यांनी नमूद केलं होतं की, काही तरुणांना रोजगार मिळत नाही किंवा व्यवसायात स्थान मिळत नाही. त्यामुळं ते मीडिया, सोशल मीडिया, आरटीआय कार्यकर्ते किंवा इतर प्रकारचे कार्यकर्ते बनतात आणि संपूर्ण व्यवस्थेवर हल्ला करतात. दरम्यान, ही टिप्पणी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलानं वरिष्ठ वकिलाचा दर्जा मिळावा, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान करण्यात आली होती. यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी' अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्यंगात्मक ऑनलाइन चळवळ म्हणून उदयास आली आहे.

सरन्यायाधीशांकडून स्पष्टीकरण : सरन्यायाधीशांनी नंतर या प्रकरणावर स्पष्टीकरण देखील दिलं होतं. आपल्या स्पष्टीकरणात सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं होतं की,"एका क्षुल्लक खटल्याच्या सुनावणीदरम्यान माध्यमांच्या एका गटानं माझ्या तोंडी वक्तव्याचा विपर्यास केल्याचं वाचून मला दुःख झालं. मी विशेषतः अशा लोकांवर टीका केली होती, जे बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारे कायद्यासारख्या व्यवसायात शिरले होते. तसंच सरन्यायाधीशांनी असंही म्हटलं होतं की, "अशा व्यक्तींनी मीडिया, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही घुसखोरी केली आहे, ज्यामुळं ते परजीवी बनले आहेत." दरम्यान, या वक्तव्यानंतर, 'कॉकरोच जनता पार्टी' नावाची एक ऑनलाइन चळवळ सुरू झाली. या चळवळीनं सोशल मीडियावर झपाट्यानं लोकप्रियता मिळवली आणि झुरळांबद्दल असंख्य मीम्स व गाणी तयार झाली.

हेही वाचा :

  1. मुलांची खेळायची जागा हरवतेय! ओडिशातील सार्वजनिक उद्यानांची स्थिती काय? भुवनेश्वर, कटकसह महत्त्वाच्या शहरांचा ग्राउंड रिपोर्ट
  2. नीट फेरपरीक्षा : प्रश्नपत्रिका वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्याच्या हालचाली, विमानानं पोहचणार प्रश्नपत्रिका?
  3. ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई, निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह यांना अटक!