जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी'चे आंदोलन सुरूच, सोनम वांगचुक यांच्या रक्तातील साखरेची पातळी घटली
आंदोलक शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, परीक्षा पद्धतीत पारदर्शकता, पेपरफुटीसारख्या घटनांवर कठोर कारवाई आणि सरकारी भरतीमध्ये प्रामाणिकपणा व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याची मागणी करत आहेत.

Published : June 30, 2026 at 2:17 PM IST
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाचा आजचा अकरावा दिवस आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही याठिकाणी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांच्या मते, उपोषणामुळं सोनम वांगचुक यांच्या रक्तातील साखरेची पातळी 66 पर्यंत खाली आली आहे, जी सामान्यपेक्षा कमी आहे. यामुळं त्यांच्या आरोग्याबद्दल समर्थक आणि डॉक्टरांची चिंता वाढली आहे.
सोनम वांगचुंग यांच्या रक्तातील साखरेची पातळी घटली : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितलं की, "सोनम वांगचुक गेल्या तीन दिवसांपासून केवळ पाणी घेऊन उपोषण करत आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नियमितपणे लक्ष ठेवून आहेत. मंगळवारी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 66 नोंदवली गेली. डॉक्टर त्यांच्या नाडीचे ठोके, रक्तदाब आणि इतर महत्त्वाच्या शारीरिक लक्षणांवर सतत लक्ष ठेवून आहेत. जर त्यांची प्रकृती आणखी खालावली, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते."
आंदोलन अकराव्या दिवशीही सुरूच : जंतर-मंतर येथील आंदोलन सलग अकराव्या दिवशीही सुरू आहे. सकाळपासूनच मोठ्या संख्येनं विद्यार्थी, शिक्षक, तरुण, समाजसेवक आणि विविध संघटनांचे सदस्य आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. आंदोलकांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ शांततेनं घोषणाबाजी केली आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचं आवाहन सरकारला केलं आहे. कॉकरोच जनता पार्टीनं म्हटलं आहे की, हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्तीसाठी नसून देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि भावी पिढ्यांच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांसाठी आहे. त्यामुळं, या आंदोलनात सामील होण्याचे आणि त्याला पाठिंबा देण्याचे लोकांना सातत्यानं आवाहन केलं जात आहे.
शिक्षण आणि पर्यावरणासंदर्भात मागण्या : आंदोलक शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, परीक्षा पद्धतीत पारदर्शकता, पेपरफुटीसारख्या घटनांवर कठोर कारवाई आणि सरकारी भरतीमध्ये प्रामाणिकपणा व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याची मागणी करत आहेत. याव्यतिरिक्त, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल यांसारख्या मुद्द्यांवरही प्रकाश टाकला जात आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्यांच्या मते, देशाच्या विकासासाठी चांगले शिक्षण आणि सुरक्षित पर्यावरण दोन्ही आवश्यक आहेत. त्यांच्या मते, जर या मुद्द्यांवर वेळेवर गंभीर कारवाई केली नाही, तर भविष्यात तरुण आणि समाज या दोघांनाही त्रास होऊ शकतो.
लोकांकडून सतत मिळतोय पाठिंबा : दरम्यान, आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी विविध राज्यांतील लोक दररोज आंदोलनस्थळी येत आहेत. अनेक विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकही या आंदोलनात सामील होत आहेत. काही जण प्रतिकात्मक एकदिवसीय उपोषण करत आहेत, तर काही जण अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलकांच्या मते, वाढता पाठिंबा हे दर्शवतो की, शिक्षण आणि पर्यावरण यांसारखे मुद्दे राष्ट्रीय चिंतेचा विषय बनले आहेत. जोपर्यंत सरकार या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असं आंदोलकांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
- आयआयटी अभियंत्याकडून बनावट नोटांची छपाई, छापा टाकताच पोलीसही चक्रावले!
- महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी अटक; मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याच्या पत्नीला पाटण्यात ठोकल्या बेड्या
- 'ऑपरेशन अमिस्ताद': व्हेनेझुएलामध्ये मृतांचा आकडा 1700 च्या वर; भारताकडून मदतकार्यात वाढ
Conclusion:

