तामिळनाडूमध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई, 38 सरकारी कार्यालयांवर छापे, कोट्यवधी रुपये जप्त
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीनुसार, 38 सरकारी कार्यालयांवर एकाच दिवसात टाकलेल्या या छाप्यामुळं संपूर्ण तामिळनाडूमध्ये खळबळ उडाली आहे.

Published : August 28, 2026 at 1:51 PM IST
|Updated : August 28, 2026 at 2:47 PM IST
चेन्नई : तामिळनाडूमध्ये टीव्हीके सरकार आल्यापासून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. अशात आता भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. तामिळनाडूतील दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयानं राज्यभरातील अनेक सरकारी कार्यालयांवर छापे टाकले. या कारवाईत 1 कोटी 18 लाख 14 हजार 608 रुपये किमतीचे बेहिशेबी रोख आणि ऑनलाइन व्यवहार जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, संबंधित सरकारी कार्यालयांमध्ये ही रक्कम सापडण्यामागील कारण आणि पार्श्वभूमीचीही चौकशी केली जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीनुसार, 38 सरकारी कार्यालयांवर एकाच दिवसात टाकलेल्या या छाप्यामुळं संपूर्ण तामिळनाडूमध्ये खळबळ उडाली आहे.
38 सरकारी कार्यालयांवर अचानक छापे : दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयानं काल (27 ऑगस्ट) चेन्नई, कांचीपुरम, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, वेल्लोर, तिरुपत्तूर, त्रिची, अरियालूर, करूर, पुडुक्कोट्टई, तिरुवन्नामलाई, कल्लाकुरीची, कुड्डालोर, थेनी, दिंडीगुल, मदुराई, कोईम्बतूर, सालेम, निलगिरी, थुथुकुडी, तेनकासी आणि रामनाथपुरम या जिल्ह्यांतील 38 सरकारी कार्यालयांवर अचानक छापे टाकले. यामध्ये विशेषतः अधिकाऱ्यांनी नोंदणी कार्यालये, तालुका कार्यालये, प्रादेशिक विकास कार्यालये, शहर आणि महानगरपालिका कार्यालये, विद्युत विभाग आणि इतर सरकारी विभागांमध्ये एकाच वेळी तपासणी केली.
कार्यालयांमध्ये शोधमोहीम : चेन्नईतील गिंडी आणि पल्लवरम येथील मुख्य विद्युत निरीक्षकांच्या कार्यालयांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. त्याचप्रमाणे, तिरुप्पूर जिल्ह्यातील पल्लाडम उप-नोंदणी कार्यालय, तिरुवनमलाई येथील आरणी नगरपालिका कार्यालय, तिरुपत्तूर येथील मदनूर गट विकास कार्यालय, कल्लाकुरिची येथील ऋषिवंतियम गट विकास कार्यालय आणि तेनकासी येथील कडयनल्लूर गट विकास कार्यालय इथंही शोधमोहीम राबवण्यात आली. याव्यतिरिक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिरुनेलवेली उप-नोंदणी कार्यालय आणि औषधनिर्माण विभागाच्या सहायक संचालकांच्या कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयांवर छापे टाकले.
गूगल पेद्वारे ऑनलाईन व्यवहार : छाप्यादरम्यान, अधिकाऱ्यांनी कार्यालयांमधील कागदपत्रे, रोख रक्कम आणि रोख व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये विविध कार्यालयांमधून 28 हजार 661 रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि 89 लाख 89 हजार 663 रुपयांचे गूगल पे (G-Pay) व्यवहार उघडकीस आले. अशाप्रकारे एकूण 1 कोटी 18 लाख 14 हजार 608 रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली आहे. खासकरून, चेन्नईतील गिंडी येथील शासकीय मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालयात 31 लाख 52 हजार 661 रुपये, त्रिची येथील थेन्नूर विद्युत देखभाल कार्यालयात 13 लाख 58 हजार रुपये आणि अरियालूर तालुका कार्यालयात 7 लाख 24 हजार 500 रुपयांचे ऑनलाईन व्यवहार आढळून आले.
हेही वाचा :

