मुझफ्फरनगरमध्ये अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई; 72 हजार कॅप्सूल अन् 549 इंजेक्शन्स जप्त
आरोपींकडून मोठ्या प्रमाणात ट्रॅमाडोल कॅप्सूल, अमली पदार्थांची इंजेक्शन्स आणि तस्करीसाठी वापरण्यात येणारी एक बलेनो कार जप्त करण्यात आली.

Published : August 26, 2026 at 7:20 PM IST
मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील अमली पदार्थ विरोधी मोहीम 'ऑपरेशन सवेरा' अंतर्गत सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. एका कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन संशयित अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. तसंच आरोपींकडून मोठ्या प्रमाणात ट्रॅमाडोल कॅप्सूल, अमली पदार्थांची इंजेक्शन्स आणि तस्करीसाठी वापरण्यात येणारी एक बलेनो कार जप्त करण्यात आली.
सिव्हिल लाइन्स पोलिसांची मोठी कारवाई : पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींकडून 72 हजार ट्रॅमाडोल कॅप्सूल, 549 इंजेक्शन्स आणि तस्करीसाठी वापरली जाणारी नंबर प्लेट नसलेली एक बलेनो कार जप्त करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाणे मॉल रोडवर तपासणी करण्यात येत होती. यावेळी एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत तीन संशयितांना अटक केली.
72 हजार कॅप्सूल, 549 इंजेक्शन्स जप्त : कारवाईदरम्यान स्पॅस्मोविल कंपनीच्या 48 हजार तपकिरी आणि 24 हजार निळ्या ट्रॅमाडोल कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. या कॅप्सूलची एकूण संख्या 72 हजार होती. याव्यतिरिक्त, इव्हिल कंपनीची 50 आणि पेंटासिल कंपनीची 499 इंजेक्शन्स अशी एकूण 549 इंजेक्शन्स देखील सापडली आहेत. जप्त केलेल्या या औषधांचे अंदाजित मूल्य सुमारे 6 लाख 65 हजार आहे. तसंच पोलिसांनी घटनास्थळावरून नंबर प्लेट नसलेली एक बलेनो कारही जप्त केली आहे.
आरोपींची ओळख पटली : अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख दीपक (रा. तीर्थ कॉलनी, खतौली, मूळचा कुतुबपूर, छप्पर पोलीस ठाणे), कलीम (रा. बधौली, खरखोडा पोलीस ठाणे, मेरठ) आणि जुनैद (रा. लोहिया नगर, मेरठ) अशी पटली आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान, आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, ते हापूर येथील एका रहिवाशाच्या संपर्कात होते आणि त्याच्याकडून कॅप्सूल व इंजेक्शन खरेदी करून मागणीनुसार जास्त दरानं पुरवत होते.
पोलिसांकडून गुन्हा दाखल : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काही लोक नशेसाठी या अमली पदार्थांचा वापर करतात. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण अमली पदार्थ नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी पोलीस आरोपींचा सर्व बाजूने तपास करत आहेत. दरम्यान, एसएसपी संजय कुमार वर्मा यांनी ही कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाला 20 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिलं आहे.
हेही वाचा :

