ETV Bharat / bharat

इंधन दरवाढीचं सत्र सुरुच; आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर 42 रुपयांनी महाग

दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडर्सच्या किमती 42 रुपयांनी तर कोलकातामध्ये 53.50 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत.

Commercial LPG Cylinders
संग्रहित- गॅस सिलिंडर (Source- IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 1, 2026 at 9:52 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद: सरकारी तेल कंपन्यांनी 1 जून 2026 रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या किमतीत सुमारे 42 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या नवीन किमतीची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे.

देशाची राजधानीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत 42 रुपयांनी वाढून 3113.50 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत सुमारे 53.50 रुपयांनी वाढली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत 3255.50 रुपये झाली आहे. कंपन्यांनी 5 किलोच्या लहान गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढविल्या आहेत. या सिलिंडरच्या किमतीत सुमारे 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी, दिल्लीतील ग्राहकांना आता या सिलिंडरसाठी सुमारे 821.50 रुपये मोजावे लागणार आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट् आणि ढाब्यामधील जेवण आता अधिक महाग होणार आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यांचे दर पूर्वीप्रमाणे स्थिर आहेत.

एका महिन्यानंतर किमतीत पुन्हा बदल- गॅस कंपन्यांनी अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारणा केली आहे. यापूर्वी, गेल्या महिन्याच्या (मे) 1 तारखेला नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत. त्यावेळी, कंपन्यांनी सिलिंडरच्या किमती वाढविल्या होत्या.

यापूर्वीच सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या वितरणासंदर्भात नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांनुसार, 'डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड' (वितरण प्रमाणीकरण कोड) प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार, गॅस सिलिंडर तुमच्या घरी पोहोचवला जाईल, तेव्हा वितरण कर्मचारी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला 'वन-टाइम पासवर्ड' (OTP) विचारतील. तुम्ही हा OTP सांगितल्यानंतरच सिलिंडरची डिलिव्हरी होणार आहे. गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

सातत्यानं व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ- चालू वर्षात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती सातत्यानं वाढत आहे. जानेवारीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1691.50 रुपये इतकी होती. फेब्रुवारीमध्ये सार्वजनिक कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 49 रुपयांची वाढ केली. त्यानंतर, मार्चमध्ये 115 रुपयांची वाढ करण्यात आली. एप्रिलमध्ये यात आणखी 195.50 रुपयांची वाढ झाली. गेल्या महिन्यात मेमध्ये कंपन्यांनी एकाच वेळी किमतीत सुमारे 993 रुपयांची प्रचंड वाढ केली. मध्यपूर्वेत इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध सुरू असल्यानं त्याचा देशातील इंधनाच्या दरावर परिणाम झाला आहे. डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईत भर पडली आहे.

हेही वाचा-