'कॉकरोच जनता पार्टी'चे आंदोलन सुरूच, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस, 6.9 किलो वजन घटले
सोमवारी सकाळी प्रसिद्ध झालेल्या वैद्यकीय आरोग्य अहवालानुसार, सोनम वांगचुंग यांचे एकूण 6.9 किलोग्रॅम वजन कमी झालं आहे.

Published : July 6, 2026 at 3:48 PM IST
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाचा आजचा 17 वा दिवस आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुंग यांनीही याठिकाणी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. दरम्यान, सलग नऊ दिवस उपोषण सुरू असल्यामुळं सोनम वांगचुंग यांची तब्येत खालावली आहे.
6.9 किलो वजन घटले : सोमवारी सकाळी प्रसिद्ध झालेल्या वैद्यकीय आरोग्य अहवालानुसार, सोनम वांगचुंग यांचे एकूण 6.9 किलोग्रॅम वजन कमी झालं आहे. डॉक्टर त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून असून, नियमित आरोग्य तपासण्या केल्या जात आहेत. आरोग्यविषयक माहितीनुसार, सोनम वांगचुक यांचा रक्तदाब (BP) 107/67, तर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण 72 mg/dL इतकं नोंदवण्यात आलं आहे. वैद्यकीय पथकाच्या म्हणण्यानुसार, उपोषणादरम्यान डॉक्टर त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात आहे, जेणेकरून त्यांची प्रकृती खालावल्यास त्वरित पावलं उचलली जाऊ शकतील. सध्या त्यांनी आपलं उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिजीत दीपके महाराष्ट्रासाठी रवाना : दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके सोमवारी सकाळी आपल्या मूळ गावी छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) इथं रवाना झाले. निघण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी सोनम वांगचुक यांच्यासोबत विजयता दहिया यांना जंतर मंतर येथील आंदोलनस्थळी सोडलं. आंदोलनाच्या आयोजकांचं म्हणणं आहे की, अभिजीत दीपके यांच्या तात्पुरत्या अनुपस्थितीनंतरही आंदोलन आणि उपोषणाचे उपक्रम नेहमीप्रमाणे सुरूच राहतील.
आंदोलन पूर्णपणे शांततेत, आयोजकांचा दावा : सोमवारी सकाळी जंतर मंतर इथं लोकांची उपस्थिती कमी होती. आंदोलकांच्या मते, सकाळी गर्दी सहसा कमी असते, परंतु दिवस जसजसा पुढं जातो, तसतशी समर्थक, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिकांची उपस्थिती वाढते. तसंच आयोजकांचा दावा आहे की, आंदोलन पूर्णपणे शांततेत सुरू आहे आणि येत्या काही दिवसांतही ते सुरूच राहील. जोपर्यंत आमच्या मागण्यांवर गांभीर्यानं विचार केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असंही आयोजकांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :

