ETV Bharat / bharat

सिद्दीपेटमध्ये बालहृदयांना नव‘संजिवनी’! जन्मजात हृदयरोगी बालकांसाठी मोफत उपचार, असा साधा संपर्क

भारतामध्ये दरवर्षी सुमारे 3.5 लाख बालकं हृदयविकारांसह जन्माला येतात. त्यापैकी जवळपास एक लाख बालकांचा वेळेवर आणि परवडणारा उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होतो.

Child Heart Hospital
सिद्दीपेटमध्ये बालहृदयांना नव‘संजिवनी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 27, 2026 at 6:39 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

सिद्दीपेट : जिल्ह्यातील कोंडापाका इथं सुरू झालेल्या श्री सत्य साई संजीवनी सेंटर ऑफ चाईल्ड हार्ट केअर अ‍ॅण्ड रिसर्च या अत्याधुनिक रुग्णालयामुळे जन्मजात हृदयरोगांनी ग्रस्त असलेल्या चिमुकल्या जीवांना नवसंजीवनी मिळत आहे. जागतिक दर्जाचे उपचार पूर्णपणे मोफत देणारं हे केंद्र शेकडो कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरलं आहे. या रुग्णालयात आतापर्यंत भारतासह 14 देशांतील 233 बालकांवर यशस्वी ओपन-हार्ट शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर 103 बालकांवर अ‍ॅडव्हान्स्ड कार्डियाक इंटरव्हेन्शन्स (Advanced Cardiac Interventions) करण्यात आले आहेत. एकूण 336 बालकांचे प्राण वाचवण्यात यश आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास यांनी दिली.

सर्व उपचार पूर्णपणे मोफत : भारतामध्ये दरवर्षी सुमारे 3.5 लाख बालकं हृदयविकारांसह जन्माला येतात. त्यापैकी जवळपास एक लाख बालकांचा वेळेवर आणि परवडणारा उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. अशा कुटुंबांसाठी हे संजीवनी केंद्र वरदान ठरत आहे. या उपक्रमांतर्गत कोंडापाका (तेलंगणा) व्यतिरिक्त नया रायपूर, पलवल आणि नवी मुंबई या ठिकाणीदेखील रुग्णालयं स्थापन करण्यात आली आहेत. ही सर्व केंद्रे सत्य साई आरोग्य आणि शैक्षणिक ट्रस्ट (Sathya Sai Health and Educational Trust) द्वारे चालवली जातात. रुग्णालयात तपासणीपासून शस्त्रक्रिया, औषधं, अन्न व निवास व्यवस्था सर्व काही मोफत उपलब्ध आहे. उपचारादरम्यान बालकांसोबत पालकांनाही राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाते. स्वयंसेवक दुर्गम व आदिवासी भागांत वैद्यकीय शिबिरं घेऊन गंभीर हृदयरोगांनी ग्रस्त बालकांची ओळख पटवतात व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणतात.

आधुनिक सुविधा आणि तज्ञांची मदत : कोंडापाका येथील संजीवनी हार्ट रुग्णालयाचं उद्घाटन 23 नोव्हेंबर 2024 रोजी झालं. 100 खाटांचं हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि पूर्णपणे डिजिटल प्रयोगशाळेसह सुसज्ज आहे. इथं 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. रुग्णालयात अत्याधुनिक कॅथ लॅब (Catheterisation Laboratory) सुविधा उपलब्ध आहे. पारंपरिक मोठ्या छेदनाऐवजी या पद्धतीत हात किंवा पायातील रक्तवाहिनीतून कॅथेटर नावाची पातळ नळी हृदयापर्यंत पोहोचवून उपचार केले जातात. त्यामुळे वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरा होतो.

केवळ जन्मजात हृदयरोगांवर उपचार : या केंद्रात फक्त जन्मजात हृदयरोगांवर उपचार केले जातात. आईच्या गर्भात विकसित होणाऱ्या सुमारे 100 प्रकारच्या हृदयविकारांवर इथं शस्त्रक्रिया व उपचार केले जातात. हृदयातील छिद्रं, झडपांचे दोष, असामान्य रक्तप्रवाह, हृदयाची कमजोरी तसंच इतर जीवघेण्या विकारांवर या ठिकाणी विशेष उपचार उपलब्ध आहेत. नवजात बालकांपासून लहान मुलांपर्यंत अतिगंभीर रुग्णांनाही तज्ज्ञ उपचार दिले जातात.

संपर्क कसा साधावा? : उपचारासाठी इच्छुक पालकांनी 8010119000 या क्रमांकावर संपर्क साधून अपॉइंटमेंट घ्यावी किंवा 7075137733 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मेसेज पाठवावा. जागतिक दर्जाचे हृदयउपचार पूर्णपणे मोफत देत श्री सत्य साई संजीवनी बाल हृदयरोग आणि संशोधन केंद्र हे केवळ आजारांवर उपचार करत नाही, तर हजारो मुलांना निरोगी भविष्य देत आहे.

हेही वाचा